तो बाहेर पडणार इतक्यात डी.के. नी हाक मारली... राज एकदम थांबला आणि डी.के. काय बोलतात याची वाट पाहू लागला.
"राज, आपले ऑफिस तर ९ वाजता सुरू होते मग आता पावणे आठ वाजाता तू कुठे निघाला आहेस?" - डी.के.
"शाल्वीला एअरपोर्टवर सोडायला" - राजने डी.कें.वर बॉम्बच टाकला. सुवर्णाताईसुद्धा राजकडे विस्मयाने पाहतंच बसल्या. तो पूर्ण तयारी करून निघाला होता.. आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असाच निर्धार करून तो बाहेर पडला होता.
"राज, तू काय बोलतो आहेस ते कळतंय का तुला? या विषयावर आपले एकदा बोलणे झाले आहे... मला परत परत तेच सांगायला लावू नको. त्या मिडलक्लास मुलीसाठी तू आज माझ्याशी भांडायला निघालास... या.. या डी.के. सरपोतदारशी... ??? तू जायचे नाहीस.. it's an order!!" - डी.के. खूप चिडले होते..
"Then I refuse to take this order.. बाबा, बस्स! खूप झालं.. आजपर्यंत मी तुम्ही सांगितलेत त्याप्रमाणेच वागत आलो. तुम्ही सांगितलं तेच केलं. १२वी नंतर मला हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते पण तुम्ही म्हणालात म्हणून सिव्हिल इंजिनिअर झालो.. तुम्ही म्हणालात 'आकाशगंगा' जॉईन कर म्हणून तेच केलं..कधीही माझ्या मनाप्रमाणे मला वागू दिलं नाहीत. नेहमी तुमच्या छत्राखाली राहीलो... मला बाहेर पडूच दिलं नाहीत. तुम्ही नेहमी पैशाच्या मागे धावत राहिलात.. काय मिळवलंत? फक्त पैसा आणि नाव हेच. तुम्हाला कोणीही जीवाभावाचा मित्र नाही. एक आई सोडली तर बिना मोबदला तुमच्यासाठी झटणारा माणूस मी आजपर्यंत पाहिलेला नाही. आज आई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती म्हणून हे आकाशगंगा नावाच विश्व तुम्ही निर्माण करू शकलात. तुम्ही तिच्याशी ही कामाशिवाय बोलत नाही. तिचा कधीतरी विचार केलात का? तुमच्या या स्वभावामुळे जे नातेवाईक होते ते ही आपल्यापासून लांब गेले.. अर्थात त्यांची उणीव तुम्हाला कधीच भासली नाही. लहानपणी कोंकणात आजोबांच्याकडे जायचं म्हणून किती वेळा रडलो पण 'काय आहे त्या भिकारड्या कोंकणात' म्हणून तुम्ही कधी जाऊच दिलं नाहीत. युरोप हिंडायला पाठवलंत मला पण शाळेच्या सहलीला जायसाठी मी हजारवेळा रडलो असेन... बाबा.. माझं बालपण तुमच्या या पैशाच्या झगमगाटात...करपून गेलं हो! पण आता नाही, बाबा. मी तुमच्या छायेतून आता बाहेर पडणार..कारण मोठ्या व्रुक्षाच्या छायेत लहान रोपे कोमेजून जातात.. हा निसर्गाचा नियमच आहे. मला कोमेजून नाही जायचं मला माझ्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे." बोलता बोलता राजच्या डोळ्यात पाणी आले. सुवर्णाताईंचे ही डोळे भरून आले. राजचा प्रत्येक शब्द डी.कें. च्या काळजात कट्यारीसारखा घुसत होता.
"आज मी शाल्वीला मागणी घालणार आहे. ती 'हो' म्हणाली तर माझ्याइतका श्रीमंत या जगात दुसरा कोणी नसेल... तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. आई, मी येतो.." असे म्हणून राज पाठीमागे वळूनही न पाहता घरातून बाहेर पडला.
"या शाल्वीचे फ्लाईट किती वाजता आहे?" - डी.के.
"१२ का १२.३० वाजता आहे असे म्हणत होता राज." - सुवर्णाताईंनी उत्तर दिले आणि त्या आत निघून गेल्या. त्या परत बाहेर आल्या तेव्हा डी.के. कोणाशी तरी फोनवर बोलत होते.
"भैरवसिंग, लक्षात ठेव, ती दोघं एअरपोर्टपर्यंत पोहोचता कामा नयेत. वाटेतच काम तमाम झाले पाहिजे. राजच्या गाडीचा नंबर लक्षात ठेव..एम.एच.१ डि. ५३५४. कामात कुठ्ल्याहीप्रकारचा हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही." डी.के.
"आता पोटच्या पोराला मारायाला त्या गुंडाला, भैरवसिंगला पाठवताय....काय चाललंय काय हे तुमचं? राजच्या केसाला जरी धक्का लागला ना तर खबरदार.......!" सुवर्णाताई पोटतिडकीने बोलत होत्या. कारण भैरवसिंग हा डी.कें.चा पदरी बाळगलेला गुंड होता हे त्यांना माहीत होते.
"तुम्ही जरा शांत बसा.. काहीही बडबडू नका".. डी.के. उठले आणि घरातल्या वाचनालयात जाऊन बसले.
राज शाल्वीला घ्यायला तिच्या घरी आला.
"तू तयार आहेस ना.. चल." - राज.
"अरे, पण आपल्याला आधी माझ्या आत्याकडे जायचे आहे. मी काल तिथे स्वेटर विसरले आहे तो जाताजाता घेऊन जाऊ, चालेल? प्लीज....." - शाल्वी.
"ओ.के. चल" - राजने ओ.के. म्हंटले पण तो मनातून तो नाराज झाला होता. आधीच इथे वेळ कमी आहे त्यात आता ही आत्या कशाला?? पण राज काही बोलला नाही.
आत्याकडून स्वेटर घेऊन एअरपोर्ट च्या रस्याला लागेपर्यंत ९.०० वाजले होते. शाल्वीला १०.०० वाजता रिपोर्टिंग करायचे होते. राजला तिच्याशी कसा विषय काढावा हे समजत नव्हते. याच विचारात तो कार चालवत होता. कारण आता शाल्वी गेली तर किमान आणखी २ वर्षे तरी येणार नव्हती परत. आणि आणखी २ वर्ष तिच्याशिवाय जगण्याची राजची इच्छा नव्हती. असा विचार करतच त्याने गाडी धारावी रोडवर घेतली. आणि.. त्याला अचानक समोर रस्तावर गाड्यांची रांग लागलेली दिसली. वाळू भरून निघालेला मोठा ट्रक रस्त्यावर चक्क आडवा पडला होता.. त्यातील सगळी वाळू रस्त्यावर सांडली होती. तिथली माणसे ती वाळू परत गोळा करण्याचा प्रयत्न करत होती. राजने घड्याळात पाहिले.. १०.०० वाजले होते. राज गाडी दुसऱ्या रस्त्याने नेण्यासाठी मागे घेऊ लागला तर मागे ही गाड्यांची मोठ्ठीच्या मोठ्ठी रांग लागलेली होती. हलणेही शक्य नव्हते. त्यात आणखी भर म्हणून की काय, राजच्या मागच्या कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे दार निसटले आणि सगळ्या कोंबड्या भुर्रभुर्र उडून बाहेर पडल्या. सगळीकडे 'कॉक-कॉक' असा आवाज करत पळू लागल्या. गाड्यांच्या मधून, खालून... जिथे वाट दिसेल तिकडे पळू लागल्या. त्यांना पकडण्यासाठी त्या टेम्पोचा चालक सैरावैरा पळू लागला. त्याची तारांबळ पाहताच धारावीतली काही छोटी मुले त्याच्या मदतीला आली. सगळीकडे पळापळ सुरु झाली. काही गाड्यांचे चालकही त्याला मदत करू लागले. या सगळ्या गोंधळात १०.४५ वाजले..... इतक्यात 'फाट' असा मोठा आवाज झाला.. राजच्या गाडीच्या समोर असणार्या गाडीचे टायर फुटून त्यातील व्हॉलट्यूब राजच्या गाडीच्या हेडलाईट वर येऊन आपटली.. लाईट फुटला.. राज खाली उतरला. तो त्या समोरच्या गाडीच्या चालकाशी भांडू लागला.. पण टायर फुटले ही त्याची चूक निश्चित नव्हती.. हे लक्षात आल्यामुळे परत गाडीत येऊन बसला.
"राज, हे ट्रॅफिक लवकर सुरळीत होईल असे मला वाटत नाही, मी इथेच उतरते.. चालत पुढे जाऊन टॅक्सी करते, नाहीतर माझं फ्लाईट मिस होईल" - शाल्वी अस्वस्थ होत म्हणाली आणि राजने काही बोलायच्या आत उतरून सामान घेऊन चालू लागली. ती त्या गाड्यांमधून वाट काढत जाऊ लागली. ती गाड्यांच्या पाठीमागे दिसेनाशी होईपर्यंत राज तिच्याकडे हताश होऊन पाहत बसला.
शाल्वी चालत असताना तिला अचानक कोणीतरी आपला पाठलाग करतंय असे वाटले. तिने पाहिले तर एक गुंड तिचा पाठलाग करत होता. ती भरभर चालू लागली.. तो ही भरभर मागे येऊ लागला. अचानक तो तिला आडवा आला आणि त्याने तिचा हात पकडला. जोरात हिसका देऊन तिने आपला हात सोडवला आणि ती उलटी राजच्या दिशेने पळू लागली. हातातले सामान सांभाळत ती जीवानिशी पळत होती. राजची गाडी नजरेच्या टप्प्यांत आल्यावर तिला जरा बरे वाटले... ती तशीच पळत येऊन पटकन गाडीत बसली. शाल्वी घाबरलेली होती. घामाघूम झाली होती.
"शाल्वी, काय झालं? इतकी का घाबरली आहेस?" - राज
"अरे, एक गुंड मागे लागला होता, त्याने माझा हात धरला होता, मोठ्या मुश्किलीने आले पळून.. ए, तो बघ तोच तो गुंड..." शाल्वीला तो गुंड समोरच दिसला. तो ती गाडीत बसल्याचे बघून निघून गेला.
"अरे, हा तर भैरवसिंगचा भाऊ, समरसिंग..." राजने त्याला ओळखले. पण तो शाल्वीला काही बोलला नाही.
"शाल्वी, चल मी तुला सोडायला येतो टॅक्सीपर्यंत." - राज.
'नको रे बाबा, तो परत आला तर काय करायचं.. तो कसला होता ते पाहिलंस ना?.. मी नाही आता गाडीतून खाली उतरणार.." - शाल्वी. राज काहीच बोलला नाही. नाही म्हटले तरी त्याचे मन थोडे सुखावले होते.
बघता बघता ११. ४५ वाजले. ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेण्यात आला. त्या कोंबड्या बहुतेक पळूनच गेल्या.. ज्या सापडल्या त्या , त्या चालकाने परत टेम्पोत भरल्या.... सगळे ट्रॅफिक सुरळीत चालू व्हायला १२.२० वाजले.
राज आता खूप वेगाने गाडी चालवत होता. पण तरीही एअरपोर्टला पोहोचायला त्यांना १२.४० झाले. दोघे पळतच आत काउंटरवर गेले.... प.... ण.... शाल्वीचे फ्लाईट चुकले होते. आणि दुसरे फ्लाईट रात्री १२.३० वाजता असल्याचे तिथे त्यांना समजले. दोघेही परत गाडीत येऊन बसले. थोडा वेळ असाच गेला.
"शाल्वी, एक गोष्ट तुला विचारायची होती...." - राजने डायरेक्ट विषयाला सुरुवात केली.
"काय रे? - शाल्वी.
"माझ्याशी लग्न करशील?" शर्टच्या खिशात ठेवलेली अंगठी तिच्यापुढे धरत तो म्हणाला आणि नकार च मिळणार या भितीने त्याने डोळे मिटून घेतले.
"मी.....ऽ अं.... हो.. हो." शाल्वी. तिचा विश्वासच बसत नव्हता.
"नाही,........ अं.. हो.. काय... खरंच....ओह गॉड....!!!" राजचा आनंद ओसंडून वहात होता. त्याने तिचा हात हातात घेऊन ती अंगठी अलगद तिच्या बोटात सरकवली आणि त्याचे लक्ष समोर गेले. तो गुंड त्याला त्या दोघांच्याकडे बघत निघून जाताना दिसला.
डी.के. , नाडकर्णींसोबत चर्चा करत दिवाणखान्यात बसले होते. त्यांचा सेलफोन वाजला. "हॅलो, हा बोल, काम झालं? गुड! तुमचा मोबदला तुम्हाला लवकरच मिळेल." डी.कें. नी फोन बंद केला. इतक्यात घरचा फोन वाजू लागला, "अहो, तुमच्या लेकाचा फोन आहे घ्या" असे डी.कें. नी सुवर्णाताईंना हाक मारून सांगितले.
"नाडकर्णी, आम्ही तुम्हाला नेहमी म्हणतो ना, की पैशाने काहीही विकत घेता येतं म्हणून...." - डी.के.
"हो, सर पण ....." नाडकर्णी.
"अहो, आज आम्ही एक........ एक ट्रॅफिकजाम विकत घेतला.....!!!!!!!" -डी.के. खळखळून हसू लागले...
---------------------------
या कथेमध्ये काही चुकले असल्यास क्षमस्व. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.