हिंदीची "बाधा" व इंग्रजीचा उतारा

मराठी माणसांना हिंदीची बाधा झाली आहे. बाधा झालेला माणूस ज्याप्रमाणे स्वत्व विसरून बाधणाऱ्या पिशाच्च्याच्या तंत्राने वागतो त्याप्रमाणे मराठी माणूस स्व-भाषा विसरून नकळत हिंदीचा अनावश्यक वापर करीत असतो. यावर उतारा म्हणजे मराठी भाषिकांना इंग्रजी शिकण्यास प्रेरित करणे.  


मराठी समाजांत हिंदी ही मुख्यत: करमणुकीच्या माध्यमांतून झिरपते. ती सहज उचलण्यासारखी असल्यामुळे रोजच्या व्यवहारांत मराठीची जागा सहज घेऊ शकते. तिचा उपयोग भारतांतही सर्व राज्यांत होत नाही; काहीशा मागासलेल्या राज्यांपुरताच तो मर्यादित आहे. तिच्यापासून मराठी माणसांना व्यावहारिक फायदा काहीच नाही.


याउलट इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती कष्टसाध्य असल्यामुळे सहजासहजी मराठीची जागा घेऊ शकणार नाही. आणि जरी काही माणसांच्या बाबतींत तसे झाले तरी त्यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. जागतिकीकरणाच्या काळांत त्यांचा फायदाच होईल. कारण, ती जगांतील पुढारलेल्या राष्ट्रांत संपर्कासाठी उपयोगी पडणारी आहे.


मराठी भाषा हिंदीच्या पुरांत वाहून जाऊ नये असे वाटत असेल तर ज्या मराठी भाषिकांना आपल्याला इंग्रजी येते असा आत्मविश्वास असेल त्या प्रत्येकाने आपल्या संपर्कांत येणाऱ्या एकातरी इच्छुक मराठी माणसाला इंग्रजी शिकवून त्याच्यांतही स्वत: सारखाच आत्मविश्वास निर्माण करावा.