माझा पिवळेपणाकडे प्रवास-१

"आई गं!!"
रस्त्यावरच्या एका खड्ड्यातून दुचाकी कडमडली आणि मी पोटात कळ येऊन कळवळले.
"खड्डे अपनी जगह है, रास्ते अपनी जगह है ऽऽ". पण मग आजच पोटात ही अशी कळ का उठावी? माझ्या तर्कशुद्ध मनाने तीनचार निश्कर्ष काढले:
अ). खड्डा कालपेक्षा जास्त खोल झाला आहे.
ब). दुचाकीचे शॉक ऍबसॉर्बर बदलायला हवेत.
क). पोट खरंच दुखतं आहे.


परत एकदा जिना चढताना 'आई गं!!' ने खात्री झाली की पर्याय क) हा सही जवाब आहे. जेव्हा दुपारचं खाणंही पचलं नाही तेव्हा विकीपिडीया उघडला. एकंदरीत लक्षणांवरुन मला १). मूत्रपिंड खडा अथवा २). स्वादुपिंडाचा कर्करोग(??) असावा असा अंदाज बांधून कामाला लागले. आज होता मंगळवार. मंगळवारी आजारी पडून रजा घेण्याची माझी फारशी इच्छा नसते. आजार पण कसा, गुरुवार, शुक्रवारी किंवा सोमवारी वगैरे आला की मस्त मोठी सुट्टी मिळते. मंगळवारी आजारी पडून परत गुरुवारी ठणठणीत आणि गुरु शुक्र अनिच्छेने काम करत बसावे लागते.


दिवस रेटून दुचाकीवर घरी जाताना माझ्या मनात करुण चित्रं तरळायला लागली. मला 'लिम्फोसर्कोमा ऑफ इन्टेस्टाइन' असेल तर? घरी ,शेजारी आणि कचेरीत लोक कसले हादरतील ना? हळहळतील. 'बिचारी! चांगली होती हो. तरुण वयातच गेली.' म्हणतील. आपण पण 'आनंद' सारखं आनंदी रहायचा प्रयत्न केला पाहिजे आता. बापरे, पण हे कर्करोग म्हणजे ते रेडिओथेरपी, टक्कल इ. लचांड येणार ना? आई गं! नाही, पोटात दुखतं म्हणजे अपेंडिक्स असू शकेल. ते फुटतं बिटतं ना म्हणे?


मनातल्या करुण विचारांशी मी इतकी एकरुप होऊन गेले की एक दोन अश्रू नाकावरुन ओघळून तोंडात गेले आणि मागून एक पल्सर मोठा भोंगा वाजवत वैतागून पुढे गेली. एरवी मी घरी असताना रडले वगैरे तर शक्यतो अश्रू चमच्यात गोळा करुन ठेवते. (सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात लिहीलं आहे 'अश्रूंमधे पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. एक चमचा अश्रू एक लिटरभर पाणी शुद्ध करतात.' कधी पाणी शुद्ध करुन पाहिलं नाही,पण चमच्यात गोळा मात्र करुन ठेवत असते.) पण अश्रू प्यायला म्हणजे अगदीच काहीतरी लागतात. गाण्यात म्हणायला ठिक आहे हो, 'आसूओंको पी गयीऽऽ' वगैरे.


घरी येऊन पतीराजांना माझी शंका बोलून दाखवली. 'हॅ, काहीतरीच काय? आता जाऊच डॉक्टरांकडे.' आम्ही आमच्या ज्येष्ठ डॉक्टरीणबाईंकडे गेलो. तपासणी इ. झाली. 'किती दिवस होतंय असं?' 'साधारण एक आठवडा असेल.' 'मग आधी का नाही आलात?' 'ऍसिडीटी असेल असं वाटलं. काही काळजी करण्यासारखं नाही ना?' माझा आवाज दाटू लागला. (मला सांगतील का आत्ता? का नंतर माझ्या नवऱ्याला बोलावून सांगतील 'इनको अब दवाओं की नही,दुवाओं की जरुरत है.') पतीराज म्हणाले, 'डॉक्टर, आमच्या घरातल्या बायकांना नेहमी स्वत:ला काहीतरी मोठा आजार झालाय असं का वाटत असतं हो?'
'तसंच असतं हो. प्रत्येकाला स्वत:ला 'कॅन्सर' हवा असतो.ग्लॅमरस आजार.' डॉक्टर हसून म्हणाल्या.'तुम्ही रक्त लघवी तपासून परवा सकाळी त्यांचा निकाल माझ्याकडे घेऊन या.' मी घाईत म्हणाले, 'बरं चालेल. परवा सकाळी नाही जमलं तर शनिवारी नक्की येऊ.' डॉक्टरीणबाई अधिकारवाणीने म्हणाल्या, 'परवाच जमवा.शनिवारपर्यंत थांबू नका.' (गेल्याच आठवड्यात मी त्यांना 'मला खोकल्यासाठी शक्यतो ऍलोपॅथिक औषधं घ्यायची नाहीत' सांगितल्याने त्यांनी मला बाहेर काढले होते. पण आमच्या या डॉक्टर एकदम प्रामाणिक आणि चांगल्या आहेत.म्हणजे आता परवा सकाळचं जमवावं लागेल.)


दुसऱ्या दिवशी मार्केटयार्डाच्या भाऊगर्दीतून गाडी चालवून ती पॅथॉलॉजी प्रयोगशाळा शोधली. सगळ्या पॅथॉलॉजी प्रयोगशाळा अशा जुन्या आणि लिफ्ट नसलेल्या इमारतीत का असतात काय माहित! रक्त आणि लघवी तपासायला सहाशे रुपये लागतात हे ऐकून पोटात नव्या दमाने कळ उठली.


आजारपण आणि सफरचंद यांचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. सारखं 'ऍन ऍप्पल अ डे, कीप्स डॉक्टर अवे' ऐकल्याने असेल. (आमच्या काही मैत्रिणी म्हणतात, 'इफ डॉक्टर इज हॅण्डसम, थ्रो द ऍप्पल अवे!') पण आमच्या कचेरीच्या इथे म्हणजे सफरचंदं भलती म्हणजे भलतीच महाग होती. स्थानमहात्म्य! ढोले पाटील रस्त्यावर सगळंच 'हायफाय'. म्हणून सफरचंद रद्द करुन दोन पेरू घेतले आणि रोजच्या कामाला लागले.


संध्याकाळी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेतून निकाल मिळाले. जास्त काही कळले नाही पण बऱ्याच ठिकाणी आकड्यांखाली पेनाने रेघा करुन ठेवल्या होत्या. 'चला, बऱ्याच दिवसात खरोखर आजारी पडून आजारपणाची रजा घेतली नव्हती! बघू आता, हा आजार २-३ रजा पदरात पाडतो का ते!' म्हणून मी घरी आले. आज संध्याकाळी बाहेर जेवायला जायचा बेत होता. 'अहाहा! कित्येक दिवसांनी व्हेज हॉट पॅन खायला मिळणार आज!जमलं तर तंदूरी आलू पण खाऊ.' आमची स्वारी मनात मांडे खात होती. डॉक्टरीणबाईंना भेट देऊन नंतर बाहेर खायला जायचे ठरले.