माझा पिवळेपणाकडे प्रवास - ५

यापूर्वी: माझा पिवळेपणाकडे प्रवास - ४
आता इस्पितळात चांगलाच जम बसला होता. मिळणारं लक्ष माझ्या 'स्वयं' ला चांगलंच सुखावत होतं.

आज रविवार रात्र. बघायला कचेरीतील लोक आले नाहीत. पण नातेवाईक मात्र येऊन गेले. त्यामुळे आजारपणाला अगदी चार नाही तरी निदान सव्वादोन अडिच चांद लागले.

खालच्या उपहारगृहामधील जेवण खाली जाऊन नवरोबाबरोबर जेवत होते रोज. इस्पितळातले उपहारगृह म्हणजे तीन निराळ्या संस्कृतींची मिसळण असते. पहिले म्हणजे रोग्याबरोबर आलेले आणि थोडे चिंताग्रस्त रोग्यांचे नातेवाईक, दुसरे म्हणजे जेवताना पण अगम्य वैद्यकीय भाषेत रोग्यांविषयी चर्चा करणारे डॉक्टर डॉक्टरीणी, आणि तिसरे म्हणजे या आजाराच्या छायेत असूनही रंगीबेरंगी फुलपाखराचे जीवन जगणारे आणि हसणारे खिदळणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे 'भावी' डॉक्टर-डॉक्टरीणी. मी इस्पितळांच्या उपहारगृहांमध्ये आधी पण एकदोनदा खाल्ले आहे, पण आज पहिल्यांदाच रोग्याच्या 'परस्पेक्टीव्ह' ने खात असल्याने हे निरीक्षण चालू होते.

जेवणानंतर खालच्या मजल्यावर बाकावर बसलो होतो. तिथेच खाली एक वृद्ध माणूस आणि बाई शेजारी वळकटी ठेऊन फरशीवर पांघरुण पसरुन झोपले होते.
'ते खाली का झोपलेत रे?'
'वर कॉमन वॉर्डमध्ये कोणीतरी ऍडमिट असेल.दूरगावाहून आले असतील.'
माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. कोणीतरी जवळचा नातेवाईक अनेक दिवसांपासून आजारी..गावात सोयी नाहीत. कुठूनतरी कसातरी पैसा जमवून लगेच शहरात येऊन त्याला जनरल वॉर्डात ऍडमिट केलं..आणि या महागड्या शहरात रात्रीपुरता निवारा परवडणार कसा? म्हणून बाहेरच पॅसेजमध्ये झोपायचं..उद्याच्या दिसाची आणि औषधांच्या खर्चाची चिंता करत..

मला परत एकदा स्वतःची लाज वाटली. आज मी महान बनून स्वतःच्या आजारपणावर विनोद करतेय..'बघा मी माझं आजारपण पण किती शूरपणे घेते' अशा अप्रत्यक्ष फुशारक्या मारतेय..कारण आजूबाजूला प्रेम, काळजी करणारी आणि जपणारी माणसं आहेत..सुदैवाने गाठीशी चार पैसे आहेत..वैद्यकीय खर्चाचा काही भाग देणारी कचेरी आहे..पण हे सर्व नसतं तर मी इतकी निवांत खाजगी खोलीत ऍडमिट झाले असते? इतक्या महागडया तपासण्या करू शकले असते? की काविळीच्या आयुर्वेदीक किंवा घरगुती औषधावर घरीच विश्रांती घेतली असती? पैसा गाठीशी असला की साधा सर्दी खोकला पण 'ऍलर्जी' बनून गोळ्या आणि हवापालट मागतो..पण 'पडू आजारी मौज वाटे भारी' हे खरंच खरं आहे का? आज आपण चालते फिरते आहोत..गंभीर आजारी नाही..म्हणून हे आजारपण मनाला आणि 'स्वयं' ला सुखावतंय का?

नाही, हे बदलायलाच हवं. 'पडू आजारी मौज वाटे भारी' ही वृत्ती जवळ फिरकताही कामा नये. आजारी पडून इतरांच्या 'अटेन्शन' चं सुख घेण्यापेक्षा स्वतःची नीट काळजी घेऊन जवळच्या सर्वांचाच त्रास कमी करणं हीच खरी मौज. या महागाईच्या दिवसात आजारी पडणं यासारखा गंभीर गुन्हा दुसरा नाही..

सोमवार सकाळ. भल्या पहाटे रक्त घेतलं. मग एक सलाईन आणि खाल्ल्यावर परत रक्त घेतलं. स्वगतः काय माणसं आहेत का ड्रॅक्युले?सारखे काय रक्त घेतात? काल पण घेतलं ना? त्यात डाव्या हाताच्या सलाईनच्या सुईचे उजव्या हातात स्थलांतर झाल्याने परत एकदोनदा 'टुचुक' झाले होते. आजारपणाचे 'विश्रांती' हे घी सोडल्यास बाकी सर्व 'बडगे' आता दिसू लागले होते! त्यात रोज सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच अशा घाऊक प्रमाणात गोळ्या खाव्या लागत होत्या. 'ऍलोपॅथिक औषधे शक्यतो घेणार नाही' या माझ्या नेहमीच्या बाण्याचा कचरा झाला होता.

मोठे डॉ. आले.
'वा वा.चांगली दिसते आहे तब्येत. पिवळेपणापण कमी झाला आहे. तुम्हाला आज जायला काही हरकत नाही.'
'पण आज तर घरचे सगळे कामावर गेले. आता दुपारी मी कशी जाऊ? बिबवेवाडीपर्यंत रिक्षा करावी लागेल मला आणि आईबाबांना.'
'तसा सर्व कागदपत्रं तयार होईपर्यंत दिड तास जाईलच. तितक्यात तुम्ही व्यवस्था करा.'

अरे बापरे. व्यवस्था करा काय? भर दुपारी हिंजेवाडीतून माझा नवरा काय तीन बस बदलून वेळेत येणार आहे का? आणि नवरा नामक 'बँक' जवळ नसेल तर पैशाचे काय? आईबाबा भरतील म्हणा तात्पुरते, पण त्यांच्याकडे वाहन नाही. आता जवळ पैसे काढायला कार्ड पण नसेल. आणि मोठ्या हौसेने घरुन मागवून घेतलेले पाच कपडे, नातेवाईकांनी हौसेने जमवलेला फळांचा ढिग, माझी प्रसाधने, काल मैत्रिणीने दिलेला सुंदर निशीगंधाचा गुच्छ आणि मी आणि आईबाबा इतकं सगळं रिक्षात तरी मावणार आहे का?

मी नवरोबाला फोन केला आणि कल्पना दिली. 'नक्की कळलं की सांग मी लगेच निघतो' म्हणाला. मीपण फिल्मी पद्धतीने 'हमारे पास पैसे नही है, ये पुष्कराजकी अंगठी रख लो' म्हणायची तयारी ठेवली!!  पण सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ झाली तरी सुटायची चिन्हं दिसली नाहीत. बहीणीला विचारल्यावर कळले की रक्त तपासणीवरुन अजून एक दिवस थांबायचा निर्णय झाला आहे. आता मला परतीचे वेध लागले होते!