माझा पिवळेपणाकडे प्रवास - ४

यापूर्वी : माझा पिवळेपणाकडे प्रवास -३ 

"पहायला येणारं कुणी असेल,
तरच आजारपणाला अर्थ आहे..
कोणीच बघायला येणार नसेल,
तर बायपासही व्यर्थ आहे.." (माशाल्लाह!! वाह वाह!)

नंतर सोनोग्राफी (यात म्हणे यकृत किती सुजलं आहे ते बघतात. मला तर काही दिसलं नाही बुवा. फक्त पोटात अर्ध्या तासापूर्वी खाल्लेल्या पोह्यांसारखं काहीतरी दिसलं.) , परत एकदा रक्त लघवी तपासणी इ. झाली. (एक रक्त लघवी तपासणी = कमीतकमी चारशे रुपयांचा खिमा हा हिशोब आता माहिती झाल्याने फुगणारा बिलाचा आकडा डोळ्यासमोर दिसत होता.) 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही' तसं 'तपासणीचे भाव सोसल्याशिवाय रोगीपण येत नाही' हे मात्र खरं! सोनोग्राफीसाठी चाकाच्या खुर्चीवरुन खाली नेलं तेव्हा खूपच विचीत्र वाटत होतं.

आता मोठे डॉ. तपासणीला आले. त्यांनी बालडॉक्टराने आदल्या रात्री केलेल्या तपासण्या परत केल्या. डॉ. कूल दिसले. 'पचेल ते आणि जास्त तिखट मसालेदार नसेल ते काहीही खा. पूर्वी काविळ झाल्यावर ताक भाकरीच खा, तेल तूप खाऊ नका इतकी कडक पथ्ये होती. आता मॉडर्न मेडीसीनमुळे तितकेसे कडक राहिलेले नाही पथ्यपाणी.' (मला ऐकून अर्थातच आनंद झाला कारण आता मी खाली कँटीनमध्ये पण खाऊ शकणार होते. घरच्यांनी मेहनत करून डबे दिलेच, पण नाश्त्याचा प्रश्न तरी सुटला.) मग खाली जाऊन इडल्या खाल्ल्या. अर्थात इडल्या हा पदार्थ पचायला हलका मध्ये मोडत नाही हे माहिती होते, पण 'साबूदाणा खिचडी ,वडे, सामोसे, इडली' हे पर्याय असतील तर इडलीच बरी! काल परवापर्यंत 'या पोटाने दगड सुद्धा पचवेन.खाण्याने किंवा पाणी बदलल्याने आजारी पडण्याइतकी लेचीपेची नाही मी' अशा फुकटच्या बढाया मी मारत होते. पण एकेका आजाराची पण काळवेळ असते. हे म्हणजे 'विनातिकीट यात्रा गुन्हा नाही, आणि त्याचा तुम्हाला काहीच त्रास होत नाही, पण अर्थातच जोपर्यंत तुम्ही पकडले जात नाही तोपर्यंत' तसे झाले. कधी पावसाळ्यात नळाला येणारे मातकट पाणी थेट पचवीन, आणि कधी एका बाहेरच्या पाणीपुरीचे निमीत्त पण आजाराला पुरे होईल. आता पाळत बस तीन महिने पथ्यं आणि पी उकळलेलं पाणी!

भ्रमणध्वनी वाजला. ऑफिसातील भैया सहकाऱ्याचा फोन होता. 'तू काल पाठवलेला प्रोग्राम चालत नाही.'फाईल नॉट फाउंड' म्हणतो.'
मी मनातल्या मनात आनंदले. चला, म्हणजे आता स्वतः फोन करुन सांगायला नको. तसे आम्ही प्रसिद्धीपराडमुख (स्वगत : मला माहिती आहे या शब्दातल्या 'ड' ऐवजी 'न्ग' उच्चार असलेले ड सारखे दिसणारे अक्षर असते ते. पण ते मला आता सापडत नाहिये.) बरं का!
'अरे बाबा मी ऍडमिट आहे. मला सलाईन लागले आहे.' (सलाईन लागणे ही आजारपणातील जास्त 'व्हि आय पी' अवस्था आहे असा माझा समज.)
'आँ? कालपर्यंत ठिक होतीस ना?'
'हो पण आता इथे आहे. आपल्या साहेबांना पण नक्की सांग.' (स्वगत : नेहमी कचेरीतल्या बातम्यांची करतो तशी या बातमीची पण हा भैय्या चांगली 'पब्लिक शिट्टी' करून देईल अशी आशा.)

एका सलाईननंतर ब्रेकमध्ये खात असताना मोठ्या बंगाली साहेबाचा फोन आला.
'मला कळलं तुला ऍडमिट केलं आहे. काविळ कशी झाली?रस्त्यावरचं काही खाल्लंस का?'
'माहिती नाही हो साहेब. झाली खरी.'
'की सिगारेटी जास्त ओढतेस?'
'हॅ हॅ हॅ ! गुड जोक! नाही हो, मी फक्त दहाच ओढते दिवसातून.' (स्वगत : स्वतः सिगारेटचं धुराडं आहेस म्हणून इतरांना पण त्याच पारड्यात तोलतोस होय रे सायबा?)
'काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे होऊन कामावर या.'
'हो सर. आय विल ट्राय माय बेस्ट. थँक यू.' (स्वगत : इथे मला एवढा मोठा ताजाताजा बाऊ झालाय आणि कोण तो वेडा चष्मेवाला सारखा काम काम करतोय? घर उन्हात बांधा रे त्याचं!)

साहेबाने 'खोली क्र.' इ. तपशील न विचारल्याने कचेरीतील साहेब लोक मला बघायला येण्याची आशा आता मी सोडून दिली आणि दूरचित्रवाणी संचाकडे लक्ष वळवले. आज पोगोवर 'मिस्टर बीन' बघता येणार होतं. नेहमी घरी म्हणजे 'या सुखां ऽऽ नो ऽऽ या ऽऽऽ' च्या बहुमतामुळे पोगो लागतच नाही.झी कॅफेवर 'फ्रेंडस' हिस्टरीवर होम्स. कार्टून नेटवर्कवर 'टॉम अँड जेरी'.एकंदरीत सलाईन सोडलं तर बाकी पेशंटपण बऱ्यापैकी खुशालचेंडू होतं. 

बाबा घरी जाऊन आई ड्यूटीवर आली. मला 'आज दमले आहे. आज नाही येत माहेरी.' असं सांगून घरी लोळत आणि गोष्टीची पुस्तकं वाचत घालवलेले अनेक शनिवार आठवले आणि स्वत:ची लाज वाटली. खरंतर मी खूप गंभीर अवस्थेत वगैरे अजिबात नव्हते. चालती फिरती होते.खोलीत काही लागलं तर बोलावायला घंटा होती. हाताशी फोन होता.खिशात गरजेपुरते पैसे होते.टेबलावर मुबलक खाण्याचा साठा होता. पण नवरोबा, माहेर आणि सासर दोघांनीही या आजारपणात पेशंटची खूप काळजी घेतली. आपल्या माणसांची किंमत कठीण वेळीच कळते. एरवी आपली माणसं बऱ्याचदा गृहीत धरली जातात.

आईला चहा हवा होता. आमच्या खोलीच्या बाहेरच चहायंत्र होतं. पण त्यात घालण्याचं टोकन मात्र तिथे नव्हतं. चौकशी केल्यावर कळलं की टोकने फक्त तळमजल्यावरच विकत मिळतात. भले शाब्बास! प्रत्येक मजल्यावर चहाकॉफीयंत्र ठेवण्याचा उद्देश रोगी आणि नातेवाईकांना जास्त धावाधाव न करता जवळ चहाकॉफी मिळावी हा आहे ना? मग टोकन घेण्यासाठी चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर जायचं आणि परत तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर येऊन चहाकॉफी प्यायची?? तरी आई उत्साहाने २ टोकने घेऊन आली. दुसरे टोकन वापरताना ते यंत्रात अडकले आणि यंत्र बंद ! जर्मनीत असताना अशीच मी एकदा शीतपेय यंत्रात नाण्याऐवजी पाच युरोची नोट घातली होती. तिकडली काही यंत्रं नोटा टाकल्यावर उरलेले सुटे देतात हो परत! पण हे यंत्र 'खाईन तर नाणी नाहीतर पाजेन चांगलंच पाणी' होतं. पण नोट अडकली आणि मग आम्हाला ती चिमट्याने ओढून काढावी लागली होती.यंत्रं चालतात तोपर्यंत 'सूतासारखी सरळ', पण त्यांचं काही बिनसलं की मग 'भूत'!   

संध्याकाळी छोट्या मराठी साहेबाचा फोन आला.
'कशा आहात? मी आणि बायको येणार होतो बघायला, पण माझे ना डोळे आले आहेत.'
'ओके. ओके. नो प्रॉब्लेम.'
हाहाहा..म्हणजे आता कोणीच येणार नाही बघायला. असो. बघायला मराठी साहेब आले असते तर 'मिलो ना तुम तो हम घबराये ऽऽ (हपिसात आमच्या अपरोक्ष काही नविन कट शिजतो का या भितीने) , मिलो तो आँ ऽऽ ख चुराये ऽऽ(डोळे येऊ नये म्हणून हो!), हमे क्या हो गया है ऽऽ' म्हणावं लागलं असतं. जाऊदे. 'शायद हमारेही रिलेशन मेंटेनन्स मे कुछ कमी रह गयी' म्हणत मी उद्विग्नपणे सुस्कारा सोडला.

सूर्य उगवला. दुसऱ्या दिवशी पण सूर्याने पाणी तापवून दिले नाही. 'भाऊ' औषधे आणायची चिठ्ठी घेऊन आला. बाबा प्राणायाम करत होते. म्हणून मी चपला घालून आणि पुस्तक बदलायला घेऊन निघाले तर तो मद्रासी प्राणी म्हणाला, 'आप नही जानेका मेडीसीन लेने.'
'क्यों?आय ऍम नॉट बेड रिडन. और अगर मै निचे नाश्ता करने जा सकती हूं, लायब्ररी जा सकती हूं, तो मेडीसीन लाने क्यों नाही?'
'वो बाकी चलेगा. लेकिन ये अलौड नै है' हे पालुपद परत आळवून तो गेला.

आणलेली शांपू पिशवी बरीच जुनी असल्याने 'मृत' झालेली होती. नवरोबांना फोन केला. 'येताना एक शांपू पिशवी घेऊन ये.मला उद्या केस धुवायचेत.'
'काहीतरी नाटकं !! तिथे कोण तुला बघायला येणार आहे का? का पार्टी आहे?' (हाहाहा! याला म्हणजे बायकांचं काही कळतच नाही. मला म्हणजे कसं 'पेशंट विथ क्लीन फेस अँड वेल सेट हेअर' रहायचं आहे.)
'अरे पण केस खराब झाले आहेत.उद्या रविवार आहे.'
'असू दे, काही फरक पडत नाही. घरी आल्यावर पाहिजे तितके केस धू.तिथे आणि सर्दी वगैरे झाली तर?' (काळजी करतो नवरोबा! म्हणून बोलत असतो.राहूदे तर राहूदे.)

आता इस्पितळात चांगलाच जम बसला होता. मिळणारं लक्ष माझ्या 'स्वयं' ला चांगलंच सुखावत होतं.