छुपे तुझे हे मनसुबे फुलण्याचे

आमच्या अंगणातल्या चेरीच्या झाडा, तुझ्या निष्पर्ण छायेखाली बसुन मी तुझ्याशी हे हितगुज करते आहे. वसंताची चाहुल देणार्‍या आल्हाददायी वार्‍याच्या झुळुकीवर तुझ्या वाळलेल्या फांद्या डोलताहेत. त्या फांद्यांवरून खाली नजर घसरली की खालच्या गुलाबांची कोवळी पालवी उन्हात लकाकताना तुला दिसत असणार. त्याच्या पलिकडे पिवळी धम्मं फुललेली डॅफोडिल्सही ही तुला दिसत असणार. गेल्या वर्षाअखेरही जेव्हा विशेष थंडी पडली नाही, तेव्हा फोरसिथियाचे बिंग तर अवेळीच फुटले होते. तू पण झाला होतास का रे तेव्हा ऋतुबावरा? मनातल्या मनात तरी?
आता तुला या सुतार, कार्डिनल पक्षांची घरटी बांधायची लगबगही दिसत असणार. तुझ्या अंगावरच्या वाळक्या काटक्या बघून कोण्णीसुद्धा तुझ्यावर घरटं बांधायचा विचार करणार नाही.
गेल्या वर्षी लावलेली लेडी बॅंक्स गुलाबाची ती इवलीशी वेलही भराभर आपला विस्तार वाढवते आहे. ब्लू बेरीचे रोपही कळ्यांनी गजबजून गेले आहे. तू मात्रं तसाच वाळका, मिटलेला. फुलणं जणू तुझ्या गावीच नाही....
पण मला माहित आहेत तुझे छुपे मनसुबे. असंच जगाला गाफिल ठेवायच, आणि अचानक एक दिवस असंख्य कळ्यांचा मोहोर घेऊन अवतरायचं अंगणात. बघता बघता शेकडो फुलं काही तासातच फुलवायची किमया दाखवायची. मग तू आमच्या बागेची शान बनणार. येणारे जाणारे तुझ्याकडे आ-वासून बघणार. आमची बाग अख्ख्या वेटाळात म्हणजे नेबरहुडमधे सगळ्यात देखणी बाग होणार काही दिवस.
मात्रं हे वैभव जसं अचानक तू चढवणार तसंच अचानक उतरवणारही. काय रे? बोचतात का तुला स्वतःचीच फुलं? इतकी नाजुक, शुभ्रं फुलं - पण जेमतेम दोन आठवड्यातच त्यांचा सडा पाडणार खाली. मग तू पांघरणार हिरव्या पानांचा शालू. तो मात्रं रहाणार अंगावर कडाक्याची थंडीपडेस्तोवर.
यंदा तुझ्या फांद्या अगदी जमिनीला टेकतील की काय इतक्या झुकल्या आहेत. तू फुललास की छत्रीसारख्या तुझ्या आकारामूळे जणु आकाशातल्या तारकाच जमिनीवर उतरल्याचा भास होणार आहे... - आत्ता तू कितीही नाटक केलंस तरी तो दिवस फार दूर नाही. .....कदाचित उद्या, परवा किंवा पुढच्या आठवड्यात....