आमची प्रेरणा चित्तरंजन यांची अप्रतिम गझल आनंदाने
जाता-जाता हसून जावे आनंदाने१
तोंड वाकडे करून जावे आनंदाने
स्मशानातले मुडदे सारे जिवंत व्हावे
जादूटोणा करून जावे आनंदाने
जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
किटक नाशकं मारून जावे आनंदाने
तुझ्या तनूने पृथ्वी गोलासमान व्हावे
वजन वाढुनी, सुजून जावे आनंदाने
घरी पोचणे अशक्य व्हावे प्यालावरती
रस्त्यावरती पसरून२ जावे आनंदाने
मिळालाच तर अश्या ठिकाणी मार मिळावा
कुणालाच ते दिसू न जावे आनंदाने
मार कुठे मज किती मिळाला स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने
दोन घडींच्या भेटीसाठी जाण्या सुद्धा
मेकप थोडा करून जावे आनंदाने
वेळ मार खाण्याची येईल "केशा" तेव्हा
जिवलग गोळा करून जावे आनंदाने
— केशवसुमार
१."आनंदाने" हा शब्द फक्त क्रियाविशेषण रुपांत वाचवा आणि नाम रूपांत वाचून गैरसमज करून घेउ नये.
२.पसरणे- (१) पडणे, पडून रहणे (२) लोळणे किंवा झोपणे