पाटी माझ्या आयुष्याची

पाटी माझ्या आयुष्याची कोरी राहुन गेली
लिहिलेली अक्षरे आसवांसोबत वाहुन गेली ।ध्रु।

फांदीवरुनी फूल गळाले झोताने वाऱ्याच्या
बागेच्या ना वाऱ्याच्या, ना माथी दोष कुणाच्या
एक सुगंधी झुळुक तेवढी मागे राहुन गेली
पाटी माझ्या आयुष्याची कोरी राहुन गेली ।१।

वाऱ्यावरती घर माझे, ना कुठेच थारा मजला
वाट सापडेना मज, न कळे कुठे जायचे मजला
सहप्रवाश्याची सोबत तर स्वप्नच राहुन गेली
पाटी माझ्या आयुष्याची कोरी राहुन गेली ।२।

प्रकाशते सुख दुःखातुन, दुःखातच मार्ग सुखाचा
वेदनेतुनी जन्म होतसे येथे ज्याचा त्याचा
सुखी माणसे ती, जी दुःखे हसून साहुन गेली
पाटी माझ्या आयुष्याची कोरी राहुन गेली ।३।

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.

५. पुढे कोणत्या गाण्याचे भाषांतर करू ते व्यनि तून कळवा. (येथे नको. नाहीतर आधीच उत्तर फुटेल  )