झडलेत कधीचे कुंतल अन् उजाड झाला बगिचा
मी उगीच या डोक्यावर गंगावन लावत नाही
सदऱ्यावर माझ्या असते पानाची तांबुल नक्षी
पण बायकोस माझ्या ती केव्हा ही भावत नाही
ही बघून काया माझी, वदला तो भोचक शिंपी
विजार-पैरण सोडा,मी तंबूंत ही मावत नाही
दाराच्या पाठीमागे ही बघणाऱ्याची गर्दी
तरी बरे दारी मी तसली पाटीही लावत नाही
बापाच्या डोक्याला मी नित्याचा झालोय ताप
मी हुशार इतका त्याच्या हाताला गावत नाही
मी पडतो-उठतो पडतो पण पुन्हा तिथे तडफडतो
मी साधे गाढव आहे कोणी ऐरावत नाही
या गुत्त्यांमध्ये कितिदा मी पाणीच केवळ पितो
अन् नशा तरी होते हे आंटीला भावत नाही
हा पिडतो "केशव" लोका लिहून विडंबने असली
लिहिलेले कोणी सुंदर ह्या मेल्या पहावत नाही
-केशवसुमार.