आमलेट

  • ४-५ अंडी, कांदे, मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो, तेल, लोणी, थोडे दूध
  • हवं असल्यास चीज़, टोस्ट, केचप वगैरे
१५ मिनिटे
२ जणांचे दिले आहे

आम्लेट हा पटकन होणारा आणि पोटाला दमदार असा अतिशय सोपा पदार्थ आहे. जे लोक अगदी पूर्ण शाकाहारी आहेत त्यांनी साधारण अशाच कृतीचे टोमॅटो आम्लेट खावे, त्यात अंड्याऐवजी डाळीचे पीठ भिजवून वापरावे.  शिजवताना दोहोमधला वेळाचा फरक ध्यानात घ्यावा.

कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो कापून वेगवेगळे ठेवावे.  मिरच्या सर्वत्र पाहिजे असतील तर त्या बारिक कापाच्या चिराव्या.  नुसत्या स्वादासाठी हव्या असतील तर त्या उभ्या चिराव्या.

एका मध्यम आकाराच्या भांड्यामध्ये अंडी फोडावी.  त्यांत कवचाचा चुरा पडत नाही याची काळजी घ्यावी.  चवीला मीठ आणि ३-४ चमचे दूध घालून ते काट्याने फेसून घ्यावे जितके चांगले फेसाल तितके मऊ गुबगुबीत (फ्लफी) आम्लेट होते.(काट्यानेच सगळ्यात चांगले फेसले जाते.)

फेसलेल्या अंड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि मिरच्या जर सर्वत्र हव्या असतील तर, घालून परत नीट मिसळावे.

तापायला तवा ठेवून त्यावर थोडे तेल सगळीकडे पसरावे.  तेल फार गरम होऊ देऊ नये.  आम्लेटचे रहस्य शिजवताना तव्याचे तपमान नियंत्रणावर (फार जास्त वा कमी होऊ न देण्यात) आहे.  तापलेल्या तव्यावर थोडे लोणी पण घालावे.  लोणी हे स्वादासाठी वापरायचे.  तेल पण मोजकेच वापरायचे, तव्याला चिकटून न रहाण्यापुरते.

[वरील दोन्ही कृती एकमेका बरोबरच कराव्या म्हणजे अंडी फेसून झाल्यानंतर लगेच गरम तव्यावर टाकता आली पाहिजेत.  त्यामुळे दोन आम्लेट करायची असतील तर निम्मी अंडी फोडून पहिले आम्लेट करावे, मग तीच कृति दुसर्‍या आम्लेट साठी करावी.  दोन आम्लेटच्यामध्ये तवा अगदी स्वच्छ पुसून परत दुसरे तेल/लोणी टाकावे.]

गरम तव्यावर फेसलेली अंडी सर्वत्र नीट गोल पसरावीत. तळाला अंडे शिजू लागले की त्यावर कापलेले टोमॅटो आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या नीट पसरून घालाव्या.  लगेच झाकण ठेवावे. मंद विस्तव ठेवावा.  तपमानाबद्दल वर लिहिलेच आहे.  साधारण दीड-दोन मिनिटाने झाकण काढून कडेला थोडे तेल/लोणी सोडावे. अलगद उलटून दुसर्‍या बाजूला पहिल्याच्या अर्धावेळ झाकण न ठेवता शिजवले की आम्लेट तयार झाले.  चीज़ वापरणार असाल तर ते टोमॅटो बरोबर पसरावे, पण मग ते उलटू नये.  मंद विस्तवावर झाकणासह जास्त वेळ शिजवावे.

अंडी शिजायला फार नाजूक असतात.  थोड्या अनुभवाने, आपल्या चुलीच्या अंदाजाने नेमका किती वेळ द्यायचा हे समजते.

केचप आणि टोस्ट सहीत ज्याला पाहिजे तसे मग ते खाणे.

करून बघा आणि सांगा कसे झाले ते. 

(जेवणात खरोखर जग जगते मानणारा) सुभाष

नाहीत.

स्वानुभव