पाच-सात मिनिटावर पाळणाघर

निघालो जरा घाई गडबडीतच.
गार्गीची छोटी बॅग, बदलायचे कपडे, पाण्याची बाटली अश्या गोष्टींची खातरजमा करून घेत निघालो. आज अनु चा नोकरी साठी इंटरव्ह्यू होता. त्यामुळे पावणेदोन वर्षाच्या गार्गी ला मी पाळणा घरात सोडणार होतो. पटापट आवरून गार्गीला तिच्या सीट मध्ये ठेवले. बेल्टस लावले. अनु येऊन बसताच निघालो. गाडीने पाच-सात मिनिटावर पाळणाघर. छान सकाळचं सोनेरी ऊन पडलं होतं.

आता पर्यंत अनु ने गार्गीला पाळणा घरात सोडले होते. ती पण पहिल्या वेळेला सोडताना अस्वस्थ झाली होती. आज माझा पहिलाच दिवस होता. अनु किती वेळात बॉक्स हील स्टेशनला पोहोचू, पत्ता घेतला आहे की नाही या गोष्टींवर बोलत होती. शिवाय 'अरे इतकं काही नाही, फक्त निरोप घेण्याची वेळ अगदी माफक ठेव' असं काही बाही सांगत होती. मी जमेल तसं तिला 'हो ला हो' करत होतो. मनात अस्वस्थता माजली होती. व्हाईटहॉर्स रोड वरून जाताना गार्गी चं पाळणा घर दिसत होतं. गार्गी मजेत बसली बसली होती कुठलं तरी गाणं म्हणत. आरशात माझे डोळे तिला दिसतांच चेहऱ्यावर हसू आलं. मला तिला पाळणा घरात सोडायचं अजूनच वाईट वाटायला लागलं. बॉक्स हील स्टेशनच्या पार्किंग मध्ये अनुला सोडलं. गाडी परत वळवून व्हाईटहॉर्स रोड च्या पाळणाघरा जवळ आणली. अजूनही गार्गी मजेत होती पण तिला 'ती पाटी' दिसल्यावर तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले आहेत हे माझ्या लक्षात आले.

तेवढ्यात अजून एक चिनी आजी तिच्या नातवाला सोडायला आली. त्या पोराने मोट्ठे भोकाड पसरले. गार्गी चा चेहरा अगदीच पडून गेला होता. मग मी त्या मुलाला आधी जाऊ दिले. तरी पण गार्गी ने मला घट्ट मिठी मारली होती ती अजिबात सैल केली नव्हती. बहुदा तिला अजूनही आशा होती की बाबा तिला सोडून जाणार नाही. पाळणा घराची चार दारं उघडून मी आत जायला लागलो. मघाचा मुलगा रडायचा थांबला होता. पण डोळ्यांत पाणी होतं. गार्गी 'मला नक्को, मला नक्को, मला नक्को, चल चल असं दाराकडे बोट दाखवून म्हणत होती. पण तो कठोर क्षण आलाच होता.

मी मनातल्या मनात 'आता वेळ लावायचा नाही हा क्षण अगदी छोटा ठेवायचा आहे' अशी उजळणी करत होतो. आता गार्गी ला पक्के कळले होते की बाबा सोडून जाणार आहे. तिने मोट्ठे रडे सुरू केले होते. पाळणा घरातली मुलगी तिला घेऊ पाहत होती पण गार्गी मला पक्की चिकटून बसली होती. परत परत माझ्याकडे काहीश्या अविश्वासाने आणि काहीश्या आशेने पाहत होती. डोळ्यातले पाणी आता गालांवरून पाणी वाहत होतं. मला मनातल्या मनात कसंतरीच वाटत होतं. तरीपण मी निग्रहाने मी ती ला सांगितले की मी आता जातो आहे, पण थोड्यावेळात परत येईन. मनात वाटत होतं की इथेच थांबावं. पण एका क्षणी झटकन तिला पाळणा घरातल्या मुली कडे देऊन बाहेर आलो. तिचा मोट्ठ्याने रडायचा आवाज येत होता. मी जरा थांबलो. एका मिनिटात रडण्याचा आवाज थांबून गेला. मी हळूच डोकावून पाहिलं तर ती इतर अजून कोण कोण इथे आहेत हे पाहत होती.

मी जड पावलांनी चालत एक एक दार उघडत बाहेर पडलो. मला अनुने पहिल्यांदा गार्गी ला सोडले तेव्हा फोन केला होता ते शब्द आठवले 'निनाद, फार अवघड आहे रे हे सोडून येणे... आपल्याला ठेवायलाच पाहिजे का रे तिला इथे?'. तेव्हा मी मारे जोरात म्हणालो होतो 'हो आता तिला पण मित्र मैत्रिणी मिळायलाच हव्या आहेत वगैरे वगैरे' आणि आता?.

गाडी काढली, एक वळण घेऊन विमनस्कपणे रस्त्याला लागलो.

काचेतून येणारं ऊन आता टोचऱं वाटत होतं.

-निनाद