संवयी

माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल.
                           सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर. जाग आल्यावर पटकन उठणारे, कधी न संपणारी ५ मिनिटांची सवलत मागणारे तर कांही उठवल्यावर शहामृगासारखी उशीत मान खुपसून बसणारे.
                          एकदा उठल्यावर तर नाना तऱ्हा ! दांत घासणारे, न घासणारे. पोट म्हणजे पाण्याचे पिंप असावे असे पाणी पिणारे. चहाशिवाय पुढचे कुठलेच काम न होणारे. वर्तमानपत्र न मिळाल्यास अस्वस्थ होणारे. कधी एकदा आंघोळ करतोय असे वाटण्यापासून ते आंघोळ ही एक शिक्षा आहे असे मानणारे. प्रातर्विधीमधे सुद्धा मिंटोका काम घंटेमे पासून ते जुम्मे के जुम्मेपर्यंत अनेक प्रकार आहेत. पण त्यापेक्षा आपण अधिक चांगल्या विषयाकडे म्हणजे जेवणाकडे वळू या.
                           उदरभरणापासून ते चाखत माखत खाणाऱ्या खवैयांपर्यंत अनेक नमुने बघायला मिळतात. माणूस खातो किती यापेक्षा तो कसे खातो यावरुन त्याच्या स्वभाववैशिष्ठ्यांबद्दल बरेच आडाखे बांधता येतात. कांहीजण व्यवस्थित नीटसपणे जेवतात तर बरेचसे आपल्याबरोबर किडामुंगीलाही जेवू घालतात, चेहेऱ्यालाही भरवतात आणि शेवटी तर त्यांचे ताट बघायला लागू नये म्हणून आजुबाजूचे लवकरच आवरते घेतात.
                           लहानपणी आपण चालायला लागलो की सर्वांना किती आनंद होतो! त्या लुटुलुटू  चालण्याचे पुढे अनेक वैचित्र्यपूर्ण चालींमधे रुपांतर होते. शिस्तीत चालणे, डुलत डुलत चालणे, पोंक काढून चालणे, वाघ मागे लागल्यासारखे चालणे, रस्ता आपल्याच बापाचा असल्याप्रमाणे चालणे, उडत उडत चालणे असे सर्वसाधारण प्रकार तर बघायला मिळतातच पण वाटेत येणारी प्रत्येक वस्तु ठोकरणे, समोरुन येणाऱ्यास मुंगीस मुंगीने भिडावे तसे कडमडणे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनाच हूल देणे असेही प्रकार पहावयास मिळतात.
                           बोलणे ही एक कला आहे. पण बोलताना ज्या विविध लकबी आपण पहातो त्याही मजेदार असतात. राजधानीच्या वेगापासून ते बैलगाडीच्या वेगाने बोलणाऱ्या व्यक्ति असतात. सहज बोलणे, नाटकी बोलणे, नारोशंकराच्या घंटेसारखे मोठ्या आवाजांत बोलणे, कायम तिरकसच बोलणे, दुसऱ्याला बोलूच न देणे हे मुख्य प्रकार तर बोलत असताना तोंडाच्या, ओठांच्या विचित्र हालचाली, हातवारे करणे, डोळे मिचकावणे हे प्रकारही दृष्टीस पडतात.
                          हंसण्याच्या संवयींचे तर असंख्य प्रकार! गडगडाटी हंसणे, चोरटे हंसणे, फिसकन हंसणे, खिंकाळणे, बायकी आवाजात हंसणे, हिस्टेरिकल हंसणे याबरोबरच अजिबात आवाज न करता हंसणे, ओठ वाकडे करुन छदमी हंसणे, काही सेकंदापुरते स्मित करुन लगेच गंभीर होणे, डोळ्यात पाणी येईपर्यंत हंसणे असे प्रकार तर खरेच पण डोळ्यांत पाणी असताना खोटे खोटे हंसणे ही कला विशेष!
                          या सवयींपेक्षा वेगळ्या आणि खास भारतीय संवयी म्हणजे चारचौघांसमोर नाकात बोटे घालणे, नखे कुरतडणे, पचकन थुंकणे, खाकरुन बेडके काढणे, शिंकरणे आणि रस्त्याच्या कडेलाच विधि करणे. लोकांना किळस वाटणाऱ्या संवयींचे उदात्तीकरण करणारेही कधी दिसतात. शरीराच्या कुठल्याही द्वारातून बाहेर वायु सोडताना " हरि ओम" म्हणणारी माणसे अन्य कुठल्या देशात भेटणार ?
   शेवटी जाता जाता सांगायची खास संवय म्हणजे टीका करण्याची! आपल्या देशात तर तो जन्मसिद्ध हक्क आहे. येताजाता आजुबाजूच्या परिस्थितीवर, राजकारणावर, क्रिकेटवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्यांवर, एकूणच सर्व व्यवस्थेवर टीका करत रहायचे पण उपाय सांगायचा नाही. कुठल्याही कामात विघ्न मात्र आणायचे. हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !!

                                                                                              केवाका