बाळ! या नारळाला धक्का लावू नकोस बरे!

'बाळ! या नारळाला धक्का लावू नकोस बरे!' ही दिवाकरांची छटाही विसंगती या दिवाकरांच्या आवडत्या विषयावरच आधारित आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या कात्रीत सापडलेला सामान्य माणूस - त्याला वास्तवाचे थोडेसे भानही आहे आणि वास्तवाला सामोरे जाण्याची भीतीही. देखणे बाह्यरुप आणि सडके अंतरंग हे माणसाचे एक रुपकही म्हणता येईल. 'वेणू' हे त्या काळातले मुलीचे नाव, 'झाले!, बेटा, झालेच तर, वेडी पोर! ..' अशा शब्दांचा वापर यांनी  या छटेला जिवंतपणा आणला आहे.

".... बाळ वेणूबाई! असे काय बरे वेड्यासारखे करावे? हे बघ, हा नारळ कि नाही, फोडण्याकरिता देव्हाऱ्यात ठेवलेला नाही! याला रोज सकाळी गंध, अक्षता, फुले वाहून याची पूजा करायची! - पूजा कशाला करायची? वेडी पोर!ऐक मी काय सांगतो ते. एके दिवशी रात्री काय झाले, - आपल्या बागेत बंगल्याशेजारी नारळाचे झाड आहे ते? - त्या झाडाखाली श्रीरामचंद्र, लक्ष्मण - सीतामाईबरोबर गोष्टी सांगत बसलेले तुझ्या पणजोबांना स्वप्नात दिसले! सकाळी ते जे उठून पाहतात तो आपला एक नारळ त्या झाडाखाली पडलेला! झाले! देवाचा प्रसाद म्हणून पणजोबांनी तो घरी आणला, त्याची सालपटे काढली. मग देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली! रोज त्या नारळाची पूजा करावयाची असा त्यांनी आपला नेम चालवला. पुढे देवाच्या दयेने त्यांना पुष्कळ पैसा मिळाल्यावर, त्यांनी याला चांगला सोन्याने मढविला! बघ, कशी खऱ्या नारळाच्या शेंडीसारखी जरीची शेंडी आहे ती! झालेच तर ही मखमलीची पिशवी, त्याला बसायला मऊ मऊ गादी - पाहिलीस ना कशी छानदार आहे ती! - काय? काय म्हटलेस? या नारळात - या जरीने, सोन्याने मढवलेल्या नारळात - गोड गोड पाणी! - चांगले खोबरे असेल? हं: हं: वेडी रे वेडी! बेटा वेणूबाई! या नारळात आता कोठून खोबरे व पाणी असायला? पणजोबांना ज्या  वेळेस तो झाडाखाली सापडला त्या वेळेस त्याच्यात खोबरे आणि पाणी असेल! त्या गोष्टीला जवळ जवळ आता दोनशे वर्षे व्हायला आली! आता या नारळातले पाणीही नाहीसे झाले आहे व खोबरेही नाहीसे झाले आहे! - मग यात आहे तरी काय? बेटा, कवटी सोन्याची, शेंडी जरीची, पण आत कि नाही, सडलेली, कुजकी अशी निव्वळ घाण आहे! आता तो काही खाण्याच्यी उपयोगाचा नाही! समजले आता? तो देण्याबद्दल आता पुन्हा नाही ना कधी हट्ट धरायची?..." 

-----------
'दिवाकरांच्या नाट्यछटा' या मालिकेतली मी इथे लिहीत असलेली ही शेवटची छटा. या छटांवरून वाचकांना दिवाकरांचे मूळ पुस्तक वाचण्याची इच्छा झाली तरी हे लेखन सार्थकी लागले असे म्हणता येईल.