धडपड हेच नाव -१

याला धडपड हेच नाव

धडपडणारी माणसे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात, ती लगबगीने पळापळ करणारी आणि त्या धांदलीत हमखास पडणारी , स्वतःला किंवा त्याबरोबर इतरांना इजा करून घेणारी माणसे. एवढेच नाही तर त्याशिवाय आपल्या ध्येयासाठी किंवा कायम सर्वांपुढे जाण्याचा प्रयत्न करणारी माणसे ही सुद्धा एक वेगळी धडपडणारीच तर असतात.  प्रयत्नांती परमेश्वर ह्या उक्तीनुसार कायम लटपट्या खटपट्या करणारी!

आता ह्या पहिल्या प्रकारच्या धडपडणाऱ्या माणसांची कथा काय सांगावी?  रस्त्यावरुन जाता जाता हेच विचारे कसे मॅनहोल मध्ये अडकतात, त्यांचाच पाय पाण्यात असल्याने न दिसणाऱ्या खड्ड्यात पडतो,  हातातला वह्या पुस्तकांचा ढीग कसा अगदी नको त्या लोकांपुढे कोसळतो, ह्याचे कोडे मला उलगडलेलेच नाही. बसस्टॉपवर अगदी एका बाजूला जरी ही उभी असतील ना तरी पाऊस पडल्यावर जाणारी बस, ट्रक किंवा इतर वाहने ही माणसे थोडी सरकताक्षणी त्यांच्याच अंगावर फवाऱ्याचा वर्षाव करतील.हॉटेलात दुसऱ्याचे बील देतो म्हणून ही माणसे पाकीट चाचपतील तर नेमके पैसे कमी.

अशी ही धडपडी माणसे सकाळी उठल्यापासून त्यांच्या धडपडीला सुरुवात होते. ह्यांच्या ब्रशवरून पेस्ट बेसीनमध्ये नाहीतर कपड्यावर पडते आणि नुसता ब्रश तोंडात. सोलर गीझरमधून हमखास गरम पाणी यायच्या ऐवजी ऐन थंडीत गारेगार पाण्याचा स्त्रोत येईल. अशा धडपड्या माणसांच नेहमी बघण्यात येणार उदाहरण म्हणजे त्यांच बिस्कीट चहा कॉफीतून तोंडाऐवजी पहा पुन्हा कपात पडते.

आता ही मंडळी घाईमुळे पडझडीतून, धडपडीतून सावरत  तोंडावर हसू आणत पुढे जात असतात हेच त्यांचे कौतुक. कष्टाने एखादे काम करून ही मंडळी तयार असतात आणि जेव्हा त्याचा अहवाल देण्याची किंवा मोक्याची वेळ असते तेव्हा नेमकी ह्यांची धडपड होते.  यांचे सगळे तोंडपाठ नसते तेव्हा ऑफिसमधला प्रोजेक्टर चालेनासा होतो, सुंदर मुलीला एखादा प्रश्न सोडवून देताना ते ऐनवेळी महत्त्वाचा मुद्दाच विसरतात,घाईघाईने शर्टाचे बटन लावतांना ते तुटते..., पोळी, भाकरी तव्यावर भाजतांना पोळी बाजूला आणि हातच भाजतो!  चिरलेली किंवा निवडलेली भेँडी किंवा गवार असेल तर नेमकी भाजी कचऱ्याच्या टोपलीत आणि देठं यांच्याजवळ राहतात. सार्वजनिक ठिकाणी यांच्या धडपडीला सार्वजनिक स्वरूप येते. नाटकात किंवा भाषणात स्टेजवर जात असताना ते नेमके पायऱ्यांवर धडपडतात, हातातले संवादाचे खास मुद्द्यांचे कागद वाऱ्याने उडतात.... भाषाणाची सुरूवातच हे खाऊन टाकतात .. अशी एक नाही, अनेक उदाहरणे देता येतील.

आपल्या मुलाला असे कर किंवा अमूक करु नकोस असे बजावताना प्रात्यक्षिकात हेच चुकतात.   जेवतांना फुंकर मारली तरी ह्यांचाच गरम भाताचा घास तोंडात!  प्यायचे पाणी पिण्याऐवजी, जमीन, टेबल किंवा कपडे भिजवण्याचे काम किती वेळा करते ह्यांचा हिशोंब  मांडू नये.  झोपतांना पलंगाच्या आधाराने उशी न राहता डोके आपण्याचा कडू अनुभव किती वेळा येतो, सांगा पाहू?   चालता चालत चप्पल निसटणे, छत्री हातातून उघडतांना उडून जाणे, खिशातून रुमाल काढताना इतर गोष्टी बाहेर पडणे ही त्याची साधी उदाहरणे. किल्ली घरातच आणि आपोआप लागणारे लॅच लॉक लावून कितीदा आपण बाहेर गेलो? आठवा पाहू सगळे. पण जरा दमाने ....कारण काही नाही...पण मोजतांना होणारी घाई टाळावी म्हणून दहा वेळा दीर्घ श्वास घ्या पाहू!

हे करायचे राहिले, ते चुकून झाले ...अशी वाक्य या धडपड्या लोकांची ब्रीदवाक्ये.  बहुधा 'घाई' या लोकांच्या समीकरणाची उजवी बाजू असते आणि डावी बाजू कित्येकवेळा 'फजिती '!  अशा समीकरणाला धडपडीचे नियम म्हणत असावेत!

 आता माझेच पहा ना,लिहिताना काही मधले शब्द मी गिळून  टाकले असतील  असे जर वाटत असेल , तर तो दोष फक्त माझा नाही, (तसे मी काहीच गिळून बसत नाही मूग गिळून तर मुळीच नाही! )तर ह्या चुकीकरता हा कीबोर्ड सुद्धा तेवढाच  जबाबदार आहे, त्याची बटने माझ्या विचारांच्या वेगाने धावू शकत नाहीत....आणखी काय?

आता ही धडपडी माणसे आयुष्यात कधी यशस्वी होत नाहीत का? असे मुळीच नाही. वयानुसार , सरावाने त्यांची धडपड कमी होते, ते वरच्या पदावर जातात त्यांची ध्येये गाठतात. पण खरी मजेची गोष्ट अशी आहे की खेड्यातून गावात, गावातून शहरात, राजधानीत आणि किंवा पुढे देशाबाहेर हे धडपडे जातात तसे ह्या धडपडीला आंतरराष्ट्रीय स्वरूप येत जाते.   विमानतळावर जातांना पासपोर्ट विसरणे, बॅग घरी राहाणे, सरकत्या जिन्यावरून पडणे असे नवे उच्चांक ते गाठत जातात.   हवाईसुंदरीला मुद्दाम किंवा नकळत धडपडीत ढकलणे, सहप्रवाश्याच्या अंगावर सरबत सांडणे ही काही उदाहरणे.  आता ह्या धडपडीचे पेटंट काय फक्त भारतीयांचे आहे असे थोडेच? जगात अशी वेंधळी, गडबडी आणि धडपडी माणसे अनेक आहेत.

                                    क्रमश: