धडपड हेच नाव- २

याला धडपड हेच नाव-२

ईमेल पाठवतांना फाईट अटॅच करायची राहणे,नुसता आयडी अन् विषय लिहून आपल्या वरिष्ठांना कोरे इमेल पाठवणे, ऑफिसचा बॅज विसरणे अशी उदाहरणे सध्या आंतराष्ट्रीय धडपडण्याचे प्रकार मानता येतील.   फोन नंबर सांगतांना आणि लिहून घेताना आकडे खाऊन टाकणे हा तर सरसकट आढळणारा धडपडीचा पुरावा.  पण ह्या धडपडीकडे खेळीमेळीने बघायला शिका, पहा धडपड कमी होते की नाही? .  फक्त टीम इंडियाने झेल सोडल्यावर आपण पडलो..., आपल्याला किती लागले...., ह्याची जी नाटकी धडपड दाखवण्याचा ठेका घेतला आहे ना ती अक्षम्य आहे!  तसेच ऑपरेशन टेबलावर डॉक्टरने किंवा जबाबरादीच्या पदावर वरिष्ठांनी दाखवलेल्या धडपडीचे इतरांवर अनिष्ट परिणाम होत असतील तर त्यांनी धड राहायला शिकावे.. न पडता!!

                    आता दुसऱ्या प्रकारच्या धडपडीचा गट म्हणजे  मुख्यतः  सर्वांपुढे जाण्याची, मीच पहिला! अशी नेहमी जग जिंकण्याची वृत्ती बाळगणारी धडपडी माणसे.   अशी धडपडी माणसे कायम घाईत असतात कारण त्यांना कोणतीही गोष्ट सर्वांपेक्षा लवकर करायची असते.  मग ही माणसे दुधाची डेअरी, पेपरवाला, किराणेवाला ह्या सर्व दुकानांच्या रांगेत उभी असतांना अस्वस्थ असतात. काही करून दुकानदाराचे लक्ष वेधून ,'आपले काम आधी कसे होईल' याचा प्रयत्न सुरु ठेवतात.  'लाल सिग्नल आहे', म्हटल्यावर ही जमेल तशी दोन दोन वाहनामधून चालत, हातात वाहन धरून किंवा वाहनावरून आपला प्रवास कायम ठेवतात. ह्या भानगडीत किती जणांना धक्के देतात, किती जणांवर आदळतात ...ह्याचा हिशोब आपण ठेवायचा, त्यांनी नाही!
जमेल तसे धडपडत गल्ली बोळा पार करत ही सर्वांपुढे जायला तयार असतात.' जिथे रांग तिथे' ह्यांचा नियमाने अथवा कसाही पहिले असण्याचा प्रयत्न अविरत सुरु असतो.

वर्गात प्रश्न विचारला असता उत्तर येत असो वा नसो, बरोबर शंका असो वा नसो ही माणसे चटकन हात वर करून मोकळी! शेवटी कशात तरी ती पहिली येतात ना! आजकाल टिव्हीवरील अनेक शोजमध्ये अशी मंडळी दिसतातच की! बटन दाबून मोकळे.. विचार कोण करणार अन उत्तर कोण शोधणार?
'बाळ सुखरुप राहील',असे आश्वासन जर डॉक्टरांनी दिले तर आपल्या बाळालाही ही कमीत कमी दिवसात ह्या जगात आणतील! 

                                   अशी धडपड 'आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक' व्हायला वेळच लागत नाही. आजकाल कच्च्या पक्क्या मालाबरोंबर अनेक  तसे माणसांचे स्वभावविशेष सुद्धा भारतातून आतबाहेर करत असतात.  तेव्हा समान आवडीनिवडीची धडपडी माणसे दोन्हीकडे!  भारतात किंवा बाहेरील मोठया दुकांनात दहा कॅशियर असतील तर ही मंडळी धडपड करत दहा ठिकाणी फिरतील , शेवटी 'माझीच रांग मागे' ह्या विचाराने अधिकच खंतावतील.  पार्किंग लॉट मध्ये मोक्याची जागा मिळवण्यासाठी धडपड, जिना चढण्या उतरण्यात धडपड,  रस्त्यावरुन चालतांना धडपड..... ह्या पुढे जाण्याच्या सोसात आपले हसे होते आहे ह्याचे त्यांना भान नसते. असले तरी ते न दाखवता त्यांचे प्रयत्न सुरुच असतात.   दुकानात आलेली गाण्याची सिडी असो, की चित्रपटाचा पहिला शो, सगळीकडे पहिले येण्याची जाण्याची धडपड दिसते. स्पर्धा, जिंकण्याची वृत्ती, लक्ष वेधणे अशी ह्याची कारणमीमांसा करता येईल. 

अशा दोन धडपड्या माणसांचे फोनवरचे संभाषण तिसऱ्या व्यक्तीकरता मोठे करमणूकीचे ठरते. एकाचे एक वाक्य दुसरा पूर्ण होऊ देईल तर शपथ! रामानंद सागरांच्या मालिकेतील राम आणि रावण युद्धात जसे एक अस्त्र दुसऱ्याला नेस्तनाबूत करण्याचे चित्रण होते ना ,..तसेच ह्यांचे शब्दाने शब्द कापणे सुरु असते. तरी एकमेकांचे बोलणे त्यांना समजते! आहे ना गंमत?

काही धडपडी माणसे घाई आणि पुढे राहण्याची धडपड अशी दोन्ही छटा दाखवता तेव्हा पाहणाऱ्याला अभूतपूर्व योग साधता येतो..फक्त मृत्यूला घाबरून सगळी धडपडी माणसे मागे हटतील तेवढेच! 

धडपडीला वयाचे बंधन अट अशी काही आहे का ? छे! मला तरी तसे दिसले नाही. धडपडी मंडळी वेगवेगळ्या वयोगटात आढळतात. स्त्री पुरूष समानता इथे आढळते का? ते शोधण्याची धडपण मी केली नाही.... उगीच वादापासून दूरच राहिलेले बरे!   'धडपड्या लोकांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्श्वासाची गती जास्त आहे का?' हा सर्व संबंधित शास्त्रज्ञांचा अभ्यासाचा विषय आतापर्यंत झाला असेल असे वाटते. त्यावर उलटसुलट चर्चा करण्याची त्यांच्यातील धडपड्यांची  धडपड सुद्धा सुरु असेलच

मग लेख वाचून तुम्हाला काय वाटत, की ह्या धडपड्या माणसांनी धडपड बंद करावी का? छे, मुळीच नाही. कारण 'ह्या जगण्याला, ह्या असण्याला धडपड  हेच नाव !. कारण ही कायम पुढे असण्याची जी इच्छा आहे ना, हा प्रयत्न आहे ना म्हणूनच जीवनाला अर्थ आहे.  कित्येक गोष्टी करू शकतो , करण्याची इच्छा असते पण त्या दिशेन आपण प्रयत्नांची धडपड करत नाही, तर फक्त विचार करतो, गप्पा ठोकतो आणि म्हणून त्या गोष्टी प्रत्यक्षात येत नाहीत. गरज आहे फक्त पडण्याची तयारी ठेऊन धडपड करण्याची!