त्याचे असे झाले... भाग ५

बरखा बजाज!

"बरखा", मी ओरडलो. माझ्या ओरडण्यात आश्चर्य आणि भीती समप्रमाणात होती. आश्चर्य याचे की हा देहावतार भारतात आहे हे मला माहीत नव्हते. आमचा समोरासमोर संपर्क होऊन आठ वर्षे झाली होती. त्यानंतर इ-पत्रे अधूनमधून चालू होती, पण माझ्या आठवणीप्रमाणे शेवटचे इ-पत्र पाठवून (किंवा मिळून) किमान पाचेक वर्षे तरी झाली असतील. भीती अशाची की आठ वर्षांपूर्वी आम्ही जेमतेम एक दिवस भेटलो होतो. पण त्या एका दिवसात माझी (त्यावेळची) नोकरी घालवण्याचे महान कर्म हिने चुटकीसरशी पार पाडले होते. एकंदरीतच चंडिका, दुर्गा, महाकाली, मरीआई, जाखाई, जोखाई आणि तत्सम सर्व उग्रप्रवृत्ती देव्यांना (देवीचे अनेकवचन हेच होते असे वाटते) जेव्हा असे जाणवले की आपण वेगवेगळे अवतार वा रूपे घेतल्याने आपली शक्ती तेवढीशी उठून दिसत नाही. तेव्हा त्यांनी एक सामायिक अवतार घेतला, त्याचे नाव बरखा बजाज.

"एक आणि फक्त एक बरखा. तुझी बीबी" ती इंग्रजीत वदली.

या वाक्याचा माझ्यावर जो परिणाम झाला त्याहून विलक्षण परिणाम बाळावर झाला. बाळाची भाषा (किमान मराठी भाषा) अशुद्ध होती, बाळाला सणसणीत 'टांगणे-वर' (त्याच्या भाषेत 'वोव्हरँग') आला होता, बाळ माझ्या खांद्यावर बरेचसे विसावले होते. पण हे वाक्य ऐकताच बाळ आपली निम्न-सुषुम्नावस्था सोडून खाडकन ताठ झाले. आत्तापर्यंत सदुपदेश करणारा मी, माझी (मालूखेरीज) 'बीबी'?

येथे एक तळटीप गरजेची आहे. आम्ही त्या गृहरचना संस्थेत साडेतीनच महिन्यांपूर्वी राहायला आलो होतो हे विदित आहेच. त्या साडेतीन महिन्यांतले तीन महिने मी तर कालच संपलेल्या प्रकल्पात इतका बुडलो होतो की त्या गृहरचना संस्थेतल्या सगळ्या लोकांना एकदाच मी तिथल्या एका करमणुकीच्या कार्यक्रमात जेमतेम दर्शन दिले होते. आमच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना मात्र मी जरा बरा ओळखत होतो. नवीन जागा घेतल्यावर (ही आम्ही नवीन नव्हती घेतली तर दुसऱ्याहाती घेतली होती तरी) जे हजारभर कागद भरावे लागतात त्यावर दोन हजार 'साक्षीदार' लागतात. अशा कागदांवर सह्या करायला मी आमच्या इमारतीतल्या जवळजवळ प्रत्येकाला तीनदा तरी कामाला लावले होते. त्यातच हे सुधाकरराव ओळखीचे झाले होते. जेव्हा केव्हा जाता येता आमची नजरानजर होत असे, बहुधा त्या वेळी मालू माझ्याबरोबर असे. आणि प्रकल्पात गळ्याएवढा बुडलेलो असल्याने माझ्या हातून काही ना काही विसरण्याचा अपराध झालेलाच असे, त्यामुळे मी सद्वर्तनाने शिक्षेत काही सूट मिळाली तर बघावी म्हणून घाऊकीत सद्वर्तन, सद्गुण अशा सगळ्या सद-गोष्टींची फैर झाडत बसलेला असे. त्यामुळे मी एक चांगलाच 'कोंबडीने टोचलेला नवरा' आहे याबाबत सुधाकररावांची खात्री पटलेली असावी. त्या खात्रीला असा दणदणीत धक्का बसल्याने त्यांची सगळी शुद्ध क्षणार्धात परत आली. डोळे लिंबासारखे मोठ्ठे गोल झाले. बरखाला जमेल तेवढे नजरेत साठवून त्यांनी चेहरा माझ्याकडे वळवला आणि गपकन एक डोळा मिटला. होय, मला डोळा मारला! आणि जवळजवळ स्थिर चालीने ते मार्गस्थ झाले.

बरखा गाडीतून खाली उतरण्याच्या विचारात दिसताच मी घाईघाईने तिच्या गाडीच्या दरवाज्याजवळ, त्याला रेलूनच उभा जाहलो. ती खाली उतरली तर अंगचटीला येणार हे शंभर टक्के. आणि हा प्रसंग आमच्या गृहरचना संस्थेपासून पन्नास फुटांवर घडत होता.

तुम्हालाही शंका येऊ लागली असेलच, म्हणून दुसरी, सविस्तर, तळटीप फारच गरजेची आहे. मी माझा चरित्रग्रंथ वाचायला बसलो नाहीये, पण त्यातील हे बरखा बजाज प्रकरण (हा शब्द इंग्रजी chapter याचा समानार्थी; मराठी 'भानगड' याचा नव्हे) सांगायलाच हवे.

बरखा बजाज ऊर्फ बीबी (माझी नव्हे, पण ते ओघातच येईल आता). पंधरा वर्षांपूर्वी मी जेव्हा भौतिकशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठात आलो तेव्हा मी एक बऱ्यापैकी हुशार, अवांतर वाचन करणारा, निरनिराळ्या खेळांत भाग घेणारा आणि कमालीचा मुखदुर्बळ होतो. कोल्हापुरातून पुण्यात आल्यावर पहिला महिना तर मी पारच बुजून सशासारखा माझ्या वसतिगृहाच्या खोलीत काढला होता. एकतर पुण्यातल्या माणसांचा मराठी बोलण्याचा हेल फार विचित्र होता. आणि ते उलट माझ्याच बोलण्याला 'कल्लापुरी' म्हणून खिजवत.

पण त्याहून मोठी समस्या म्हणजे इथले बिगर-मराठी लोक. विद्यापीठात तर त्यांचा फारच सुळसुळाट झालेला होता. आमच्या विभागात तर आंतर-भारतीचे संमेलनच भरले होते. एक देसाई होते, ते कोल्हापुरी असतील या खात्रीने त्यांना भेटून मराठीत गाडी मारली तेव्हा प्रश्नार्थक चेहरा करून ते गुजराती वळणाच्या हिंदीत उत्तरले. मी खाली मान घालून परतलो.

हिंदी आणि इंग्रजी या भाषा आहेत आणि त्यांचा अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे लागते हे मला मान्य होते. पोहायला न येणारा माणूस जिवाच्या आकांताने हातपाय मारतो तसे करून बारावीला तर मला चक्क इंग्रजीत पहिला वर्ग मिळाला होता! हिंदी दहावीपर्यंतच धाक घालून होते. पण हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा अभ्यास चित्रपटाच्या माध्यमातून चांगलाच जोरदार चालू होता. अर्थात इंग्रजी चित्रपट ऐकण्याची गरज पडत नसे (किमान जे चित्रपट आम्ही पाहत असू). असे सर्वत्र सुखसमाधानाचे वातावरण असताना अचानक या दोन्ही भाषा, त्यात इंग्रजी जास्त, रोजच्या जीवनात वापरण्याची गरज पडू लागली तेव्हा मला जन्म आठवला.

बरखा तेव्हा भूशास्त्रातली पदवी मिळवून पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात दाखल झालेली होती. अर्थात ह्याची मला गंधवार्ताही नव्हती आणि असण्याचे कारणही नव्हते.

आणि सौंदर्या जगदाळे हे प्रकरण (हा शब्द इंग्रजी chapter याचा समानार्थी नव्हे; मराठी 'भानगड' याचा) घडले. ही उदयोन्मुख कवयित्री मराठी भाषेत पदव्युत्तर शिक्षणासाठी आली होती. तिचे वडील 'यूनो'च्या सेवेत कुठेतरी परदेशात होते. मात्र मराठी विभागात नेहमी दिसणाऱ्या मानवप्रकारांशी तिचे मुळीसुद्धा साधर्म्य नव्हते. ती मराठीत लिहीत असे हेच आश्चर्य. अन्यथा तिच्या तोंडून, सतत परदेशप्रवास करून आलेली, फर्डी इंग्रजी प्रवाहत असे.

आमच्या विभागाच्या एका बाजूला मराठी विभाग आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणशास्त्र विभाग. तीनही विभाग रस्त्याच्या एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला पायचेंडूचे मोठे मैदान, ज्यात मी रोज संध्याकाळी चेंडूला लाथा घालत पळत असे.

एका घातवारी आणि घातवेळी सौंदर्याने मला ही कृती करताना पाहिले आणि मागचापुढचा विचार न करता ती माझ्या प्रेमात पडून मोकळी झाली.

हे मला कळण्याचा काहीही मार्ग नव्हता. कारण तिचे प्रेम दिवसाला सरासरी चार अशा कवितांमधून व्यक्त होऊ लागले, पण त्या कविता माझ्यापर्यंत पोचवण्याचे , तिचे सर्व प्रयत्न फोल गेले. तिने त्यातल्या सुरुवातीच्या बऱ्याचशा त्यांच्या विभागाच्या भित्तिपत्रकात छापून (लिहून) आणल्या पण मला मुळात असे भित्तिपत्रक असते हेच माहीत नव्हते.

मग तिने आमच्या विद्यापीठाच्या उपाहारगृहात बसून आजच्या भाषेत 'क्षेत्ररक्षण' लावायला सुरुवात केली. पण माझ्या उपाहारगृहात जाण्याच्या वेळा कमालीच्या अनिश्चित असत. माझ्या झोपेबद्दल तुम्हाला सांगितलेच आहे. त्यामुळे उपाहारगृहात जाण्यासाठी 'जाग येईल तेव्हा' हा एक महत्त्वाचा निकष होता. आणि त्याहून महत्त्वाचा दुसरा निकष म्हणजे धन. माझी सर्व प्रकारची शुल्के भरतानाच कोल्हापूरला पाटबंधारे खात्यात खर्डेघाशी करणारे माझे वडील मेटाकुटीला येत. त्यामुळे उपाहारगृह हे 'असते' यापलीकडे मी माझा त्या वास्तूशी फार संपर्क येऊ दिला नाही.

अखेर तिने माझ्याबरोबर सतत दिसणाऱ्या जोगळेकरची ओळख काढली आणि मध्यस्थ म्हणून त्याची नेमणूक करण्याचा प्रस्ताव जोगळ्यासमोर मांडला. जन्मजात श्रीमंतीमुळे हा प्रस्ताव मांडण्यासाठी तिने जोगळ्याला 'निळे रत्न' नावाच्या तारांकित उपाहारगृहात बोलावले. तिथे गेल्यावर जोगळ्याने आधी इथिओपियातून आल्यासारखे खाऊन घेतले. आणि मग मी कसा तिच्या दृष्टीने फारच विजोड आहे यावर मराठीत एक बौद्धिक हाणायचा प्रयत्न केला. सौंदर्याने हा प्रयत्न तत्परतेने बंद केला आणी इंग्रजीतून तिने जोगळ्याला बरेच झापले. जोगळ्याला तरी कुठे धड इंग्रजी येत होते? तो आपला मधे मधे "हो, बरोबर, अगदी बरोबर" असे पाठ केलेले तीनचार इंग्रजी शब्द बडबडत बसला. आणि बाहेर पडताना "आभारी आहे" या इंग्रजीत व्यक्त करता आलेल्या निरोपानंतर संध्याकाळी चार वाजताच "शुभ रात्री" असेही (इंग्रजीतच) म्हणून मोकळा झाला. त्याचे उपकार एवढेच की त्याने हे सर्व परत आल्यावर मला सांगितले आणि मला किमान आलेल्या संकटाची जाणीव तरी झाली.

माझे आधी जे वर्णन केले ते खरे आहे, पण अपूर्ण आहे. 'मुलींना कमालीचा घाबरणारा' असे विशेषण लावल्यावर ते पूर्ण होईल. त्याचे असे आहे (किंवा होते) की कोल्हापुरात असेपर्यंत मुलींशी बोलण्याचे प्रसंग माझ्यावर फार आले नाहीत. फार काय, जवळजवळ नाहीच म्हणा ना. एकदाच फक्त राजश्री तवनाप्पा मगदूम या कन्यासदृश्य वस्तूने मला वेळ विचारली होती. हा प्रसंग परीक्षेच्या बैठकीच्या खोलीबाहेर घडल्याने (च) आम्ही दोघे निर्दोष सुटलो होतो. आमचे महाविद्यालयातले शिक्षकदेखील प्रात्यक्षिकांसाठी एक मुलगा आणि एक मुलगी अशी जोडी करण्याचा आचरटपणा करत नसत. आमचे प्राचार्य तर कुणी मुलगा मुलींशी बोलताना दिसला की गुरकावून "भेट मला आत माझ्या कार्यालयाच्या" असे इंग्रजीत झाडायचे (त्यांचे ते एक वाक्य चांगलेच पाठ होते. कार्यालयात गेल्यावर हजामत मराठीत व्हायची ही गोष्ट निराळी). त्यातून कुणी मुलगा मुलीशी (उलटे घडणे अशक्य होते) एकापेक्षा जास्त वेळा (एकदा बोलणे माफ होते; 'घडतात चुका माणसाच्या हातून' असा सर्वांचा उदार दृष्टिकोन होता) बोलताना दिसला की सर्व जण थेट त्या जोडप्याला किती मुले होतील याचीच चर्चा सुरू करत.

तर अशा वातावरणातून मी थेट आलो ते अशा विद्यापीठात (आणि विभागात) की जिथे मुली जवळजवळ लोकसंख्येच्या चाळीस टक्के होत्या. मराठी, इंग्रजी अशा भाषाविभागांत तर ही टक्केवारी ऐंशीपर्यंत झुकलेली असे. एवढ्या कन्या-स्त्रिया एकदम एका वेळेला बघायची नजरेला जरा सवय होत होती तोच हा आघात झाला.

वसतिगृहात तातडीची युद्ध-बैठक बसली. राजा पाटील (येळगांवकर) हा आमच्या विभागातला माझा एकुलता एक कोल्हापुरी आधार. पण इतर विभागातले कोल्हापुरीही आपल्या गावबंधूवरील हे संकट कसे निवारावे याचा खल करण्यासाठी एकत्र आले. मुलीने मुलाच्या प्रेमात पडावे हे एकवेळ क्षम्य होऊ शकेल, पण तिने ते असे जाहीर करण्याचा चंग बांधावा हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे यावर सर्वांचे एकमत झाले. पण पुढे काय? 'मुली' या विषयात कोणालाच गती नसल्याने गाडी अडली. अखेर संगणकशास्र विभागात शिकणाऱ्या सुर्शा महाडिकने मला मदत करायचा चंग बांधला. काय कारणाने ते आठवत नाही, पण त्याच्या विभागात असणाऱ्या आदिती भार्गव नामक कन्येबरोबर त्याचे बोलण्याइतपत (खरे तर ऐकण्याइतपत) संबंध होते. आदितीचे इंग्रजीही फर्डे असल्याने सुर्शाला फार काही कळत नसे, पण तो अंदाजाअंदाजाने गाडी धक्क्याला लावत असे. आणि आडनाव 'भार्गव' असल्याने तिला हिंदी समजत असणारच असे गृहीत धरून तो उत्तरे देण्याकरता राष्ट्रभाषेचा आधार घेई. आदितीशी बोलण्याचे त्याने मान्य केले.

हे सगळे प्रकरण कळल्यानंतर आदितीने, आणि तिची जिवलग मैत्रीण असणाऱ्या बरखाने, अगदी गडाबडा हसत लोळून घेतले (अतिशयोक्ती नव्हे; विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मागच्या हिरवळीवर हा लोळण्याचा कार्यक्रम झाला). आणि अखेर जेव्हा त्यांची खात्री पटली की त्या 'काळ-यंत्रात' बसून शतकभर मागे गेलेल्या नसून याच शतकात आहेत, तेव्हा भूतदया जागृत होऊन त्यांनी मला मदत करण्याचे मान्य केले. पण त्याअगोदर हे मेषपात्र कोण हे याची देही याची डोळा पाहण्यासाठी त्यांनी मला 'मुलाखतीला' बोलावले.

त्यांची खात्री पटावी म्हणून (असे मी माझे समाधान करून घेतले) असेल, माझ्या हलकट 'मित्रांनी' एकदा मी आमच्या विभागात असाच टिवल्याबावल्या करत असताना "अरे ती बघ सौंदर्या तुला शोधत आल्ये दारात" असा गोळा टाकला. जगातल्या तमाम हरीण, चित्ते आदी प्राण्यांनी माझी शिकवणी ठेवावी अशा वेगाने मी वसतिगृह गाठले. आणी ती चित्तचक्षुचमत्कारिक करमणूक तमाम विद्यापीठीय जनतेने (आणी मुख्य म्हणजे या दोघींनी) डोळे भरून पाहिली.

त्यांच्याबरोबर मुलाखत म्हणजे परत माझी हबेलंडी. शेवटी ही मुलाखत कोठल्याही बड्या उपाहारगृहात न होता विद्यापीठाच्या आवारातच होईल या अटीवर मी मान्यता दर्शवली. आता आवारात म्हटले, तरी कुठे? उपाहारगृहात 'सौंदर्या'ची भीती (मला). आमच्या विभागातही तसेच. शेवटी एका टोकाला असणाऱ्या संगणकशास्र विभागाच्या गच्चीवर हा कार्यक्रम ठरला. आणि तुमानीच्या दोन खिशांत दोन रुमाल ठेवून आणि एक हातात घेऊन मी 'सीदंती मम गात्राणी...' अशा अवस्थेत त्या गच्चीवर पोचलो.

मात्र ती मुलाखत फारच संस्मरणीय झाली. एकतर त्या दोघींना मानवाच्या रूपात गोगलगाय हा नैसर्गिक चमत्कार पहायला मिळाला. आणि मला अशा दोन तरुणी, की... आतापर्यंत या दोघींचे काही वर्णन केले नाही. या दोघी 'सुंदर', 'उफाड्याच्या', अशी पोतेभर विशेषणे कमी पडतील अशा होत्या. पण बरखा आणि मी एकमेकांना पाहताच आम्हाला दोघांनाही जाणवले की आम्ही कुठेतरी एकमेकांचे सख्खे मित्र-मैत्रीण होण्यासाठीच जन्माला आलो आहोत.

आता हे मी शब्दात कितपत पकडू शकेन हे मला माहीत नाही, पण बहुतेक वेळेला कुठल्याही स्त्री-पुरुष संपर्काच्या घटनांमध्ये कुठेतरी 'नर' आणि 'मादी' ही सुप्त (वाटणारी) भावना संपूर्ण विसरणे जवळजवळ अशक्य असते. पण एखाद्याच वेळेला (मग ती वेळ हजारात एक की लाखात एक यावर वेगवेगळी मते येतील) अशी लख्ख वीज चमकते की 'अरे, आपण ते नर-मादीच्या संकल्पनेचे ओझे झुगारून हे नाते निभावू शकतो'. यावर विश्वास ठेवा न ठेवा, बरखाच्या, आदितीच्या आणि माझ्या नातेसंबंधात एकसमयावच्छेदेकरून हे घडले. त्या मला संपूर्णपणे अप्राप्य आहेत ही जाणीव त्याला कारणीभूत असेल किंवा आणखी काही. ते आपण मानसशास्त्रज्ञांना सोडून देऊ.

तर अशा रीतीने आमची ओळख झाली. सौंदर्याचे प्रकरण त्या दोघींनी अगदीच किरकोळीत निकालात काढले. त्या तिला 'निळे रत्न' येथेच घेऊन गेल्या आणि दोन तास तिचे बौद्धिक घेऊन तिचे कसे चुकते आहे, कुठलेही स्त्री-पुरुष नाते दृढ व्ह्यायचे असेल तर किमान काही मूलभूत गोष्टी कशा समान लागतात, अन्यथा दोघांच्या आयुष्याचा कसा विध्वंस होतो हे तिला पटवून दिले. आता हे खरे आहे की नाही ते सोडून द्या, सौंदर्याला पटले आणि माझा जीव भांड्यात पडला.

आता एवढे वैयक्तिक बोललोच आहे तर अजून एक सांगून टाकतो. या सगळ्या स्त्री-जातीविषयी निरिच्छतेचे मूळ कारण म्हणजे ब्रह्मचारी राहून देशसेवा करायची असे माझे (त्या वेळेपर्यंत तरी) ठाम ठरलेले होते. 'विवेकानंदांनंतर मीच असा माझा बोलबाला झाला आहे' हे माझे आवडते स्वप्न होते. विवेकानंद शास्त्रज्ञ नव्हते, ती उणीव भरून काढून प्रति-विवेकानंद व्हायचे माझे ठरलेले होते. त्याचे पुढे ... ते जाऊ द्या.

तर एबी (आदिती - बरखा) जोडगोळीने माझा जीव सोडवला आणि आमच्या गाठीभेटी वाढू लागल्या. त्या दोघींच्या सौंदर्याने (सुंदर दिसण्याने अशा अर्थी) घायाळ झालेल्यांची संख्या विद्यापीठात मोजण्याच्या बाहेर होती. केवळ बरखाच्या आडनावामुळे बजाजची दुचाकी वापरणे हे विद्यापीठात नियम असल्यासारखे होऊन गेले. आणि चारचाकी असल्यास मारुती (मारुतीचे व्यवस्थापकीय संचालक त्या वेळेला कुणी भार्गव म्हणून होते). त्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळेला उपाहारगृहात झुंबड उडे. उपाहारगृहाच्या चतुर मालकाने (शेट्टीच तो!) त्या दोघींना सर्व खाणे-पिणे 'वर घरा' करून टाकले.

त्यांच्याबरोबरच्या जवळिकीमुळे मी बऱ्याचशा हेव्याचा धनी आपसूक होऊ लागलो. त्यात आदितीने मी बरखाचा मावसभाऊ असल्याची वावडी उडवून दिली. सुंदर मुलीचा आत्तेभाऊ हा आपला नैसर्गिक शत्रू मानावा हे कुठल्याही प्रेमवीराला चांगले ठाऊक असते. पण मावसभावाचे स्थान नक्की काय याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात घोळ असल्याने मला गूळ लावावा की खिंडीत गाठून मारावा याबद्दल मतभेद होऊ लागले. शेवटी त्यातल्या पहिल्या वर्गाने बाजी मारली, आणि विद्यापीठातला उर्वरित काळ मी अत्यंत सुखासमाधानात (आणी महागड्या उपाहारगृहात) काढला.

याच काळात बरखा बजाज म्हणजे बीबी असे नामकरण होऊन गेले. आणि आमच्या दोघांत परस्पराकर्षण शून्य आहे याची उभयपक्षी गाढ खात्री असल्याने "मी तुझ्याशी लग्नच करेन" अशी 'धमकी' बरखाने मला मी काही 'दंगा' केला तर द्यायची असा खेळ सुरू झाला. तर अशी ती माझी 'बीबी'.

त्या दोघींच्या कुटुंबसदस्यांना सुद्धा मी चांगलाच माहीत झालो. बरखाचे वडील मेजर जनरल बजाज, आदितीचे वडील डॉक्टर भार्गव (ते दिल्लीला मोठे मेंदू तज्ज्ञ होते) हे दोघेही त्यांच्या मुलींना एखादी गोष्ट पटवण्यासाठी माझा उपयोग करून घेऊ लागले. आदितीने विद्यापीठातले शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेला अजून शिक्षणासाठी जाण्याचा प्रस्ताव माझ्यामार्फतच धाडून मान्य करवून घेतला होता. त्यातील 'ती दोन वर्षांत परत येईल' हे कलम उधळून लावून ती गेली ती तिकडेच हे वेगळे.

आणि त्याआधी, पहिले वर्ष संपताना पर्यावरणशास्त्र सोडून जन-संज्ञापन (mass communication) या विषयात पदवी मिळवण्याचा बरखाचा निर्णय उच्च न्यायालयाकडून (मे. ज. बजाज) मान्य करून घेण्यात माझा फारच मोठा हातभार होता.

विद्यापीठातील शिक्षण संपवून मी अजून पुढच्या शिक्षणासाठी बंगळूरला गेलो (आणी भौतिकशास्त्राला सोडचिठ्ठी देऊन हळूच संगणकशास्रात शिरलो) आणि आमचा संपर्क बराच कमी झाला. इ-पत्रे सर्रास प्रचलित असण्याचा तो काळ नव्हता. आणि अभ्यासक्रम संपवून आदिती अमेरिकेला गेल्यावर बरखानेदेखील अमेरिकेत 'दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम निर्मिती' अशा कुठल्याशा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. आणि त्यानंतर ती तिकडेच कुठेकुठे धुमाकूळ घालू लागली.

त्यानंतर ती अशीच प्रकटली होती जवळजवळ आठ वर्षांपूर्वी. तेव्हा मी राजा राजवाडे नामक एका पापभीरू सज्जनाने चालवलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आस्थापनेत काम करत होतो. तिथे जवळजवळ चाळीसेक माणसे होती. दोन हजार साली सर्व संगणक उध्वस्त होतील या भीतीने आमचा धंदा चांगलाच तेजीत चालला होता. आमच्या त्या चाळीसजणांसाठी 'मानव संपत्ती' असा एक विभाग, किमान एखाददोन माणसे असावीत अशी दुर्बुद्धी राजाभाऊना झाली आणि त्यांनी लथिका गोपालसामी नामक एका स्त्रीवजा ऐवजास तो कार्यभार सोपवला.

हे माझे वैयक्तिक मत आहे हे आधीच सांगतो, पण एकंदरीतच 'मानव संपत्ती' विभागात बरीच भंपक माणसे भरलेली असतात. लथिका ही त्या सर्वांची आदिमाता म्हणता येईल. आम्हाला काडीचीही माहिती नसणारे वाक्प्रचार आणि संकल्पना ती कुठल्यातरी अमेरिकन स्रोतापासून कावड भरून आणी आणि संत एकनाथांचा स्त्री अवतार असल्याच्या थाटात आम्हा गाढवांवर रिती करी.

एकदा 'चित्त एकाग्र करण्यासाठी' तिने कुठलीतरी व्हायोलिनची ध्वनिफीत आम्हाला भर दुपारी जेवण झाल्यावर अर्धा तास ऐकवली. मला संगीतातले फारसे कळत नाही, पण ते 'वांय वांय' ऐकून एकाग्र झालेले चित्त विचलित होऊन झोप मात्र येऊ लागली.

मग एकदा तिने आम्हा सगळ्यांकडून एक प्रश्नपत्रिका सोडवून घेतली. त्यात आमचा आवडता रंग, दिवसाच्या कुठल्या वेळेत आम्ही सर्वात जास्त कार्यक्षम असतो, आम्हाला स्वप्ने काय पडतात असे प्रश्न. त्याचे पुढे तिने काय केले कळले नाही.

त्यानंतर तिने आमचे आमच्यांकरिता एक मासिक असावे असा बूट काढला. तोपर्यंत 'आम्ही' शंभरी गाठली होती. राजाभाऊ मान्यता देते झाले आणि दर महिन्याला चाळीसेक पानांची रद्दी आम्हा प्रत्येकाच्या हातात पडू लागली. राजाभाऊ हे सर्व मुकाट्याने सहन करत होते कारण अशा गोष्टींनी चळण्यापेक्षा नवनवीन ग्राहक मिळवण्यात त्यांचा वेळ जात होता.

पण तिने सर्वांकरिता 'योग' सुरू करायचा प्रस्ताव मांडल्यावर राजाभाऊ बिथरले. एकतर तोपर्यंत लथिकाबाईंच्या प्रत्येक 'शिमग्या'नंतर होणारे कवित्व त्यांना जड जात होते. मासिकाचे वाढते खर्च भागवताना त्यांना वैताग येत होता. प्रश्न केवळ पैशाचा नव्हता तर हे सर्व मांडताना लथिका राजाभाऊ हे कसे मठ्ठ आहेत असा चेहरा आणी स्वर जुळवून बोलत असे ते त्यांना चीड आणणारे वाटे. आणी त्यांना होता अस्थमा. 'योग' करताना लावण्यासाठी म्हणून जेव्हा लथिकाने एकेक फुटी उदबत्त्या आणल्या तेव्हा त्या बघूनच राजाभाऊंचा (तोपावेतो ठीक असलेला) रक्तदाब  वाढला. त्यांच्या पापभीरू स्वभावामुळे ते आतापर्यंत गप्प बसले होते. पण आता त्यांचे डोके फिरले. आणी अखेर लथिकाबाईंची गच्छंती झाली.

आणी त्याच दिवशी बरखाचे सुट्टीसाठी म्हणून पुण्यात आगमन झाले. विद्यापीठात फिरायला गेल्यावर गप्पा मारताना तिला हा सगळा किस्सा समजला. मला न समजलेली अजून एक गोष्ट तिला समजली की ही बातमी मीठमसाला लावून 'आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही स्त्रियांवर होणारे मानसिक अत्याचार' या सदरात झकास बसेल. त्या सुमारास 'दवंडी' नावाची नवीन वाहिनी सुरू झाली होती हे तुम्हाला आठवत असेलच. त्या वाहिनीलाही अशा मीठमिरचीवाल्या झणझणीत बातम्यांची गरजच होती.

थोडक्यात सांगायचे झाले, तर ती बातमी दवंडीवर साग्रसंगीत प्रसिद्ध झाली आणि माझी नोकरीही अर्थातच सुटली.

बरखा परत अमेरिकेला चालती झाली. तिथून ती 'तिसऱ्या जगातल्या' देशांमध्ये काहीबाही चित्रित करत फिरू लागली. तिला कुठले कुठले आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या बातम्या मधून मधून येत राहिल्या. काही काळानंतर माझे लग्न झाले आणि मी जत्रेत फिरत्या पाळण्यात बसलेल्या बालकाप्रमाणे हरवून गेलो.

तर ही ती बरखा. अजूनही तशीच (फटाकडी) दिसत होती.

आता हे सर्व मालूला माहीत होते का? तर नाही. एक तर माझे लग्न होईस्तोवर या गोष्टी जवळपास दहा वर्षे जुन्या झाल्या होत्या (ब्रह्मचारी राहण्याची शपथ खरेच मोडावी का याचा विचार करायला मला जरा वेळच लागला). आणि दुसरा मुद्दा तुम्हाला एव्हाना जाणवलाच असेल. मालूने एक वेळ माझी जुनी मैत्रीण एवढे सहन केले असते. पण माझी पंजाबी मैत्रीण? बजाज 'अस्सल पंजाबी' आहेत की नाही या वादात मला पडायचे नाही. त्यांची लुधियानातील शंभर वर्षांची जुनी हवेली, पंजाबात (आणी अर्थातच कॅनडात) पसरलेले असंख्य नातेवाईक हे बघता कुणीही त्यांना पंजाबीच म्हणेल. मालू तर निश्चितच. त्यामुळे मी जर जुने दिवस आठवलेच तर 'यथा काष्ठंच काष्ठंच समेयातां महादधौ' इ इ म्हणत बसत असे.

"मी होता पाठवला तुला एक लघु-संदेश" बरखा वदली.

"कुठल्या क्रमांकावर?"

त्यावर तिने जो क्रमांक सांगितला तो भ्रमणध्वनी मी सलग चार वर्षे वापरला होता पण गेल्या दीड वर्षापासून तो नचिकेतच्या मालकीचा होता. मी मालूला कारण विचारले नाही. त्यामुळे तुम्ही मला विचारू नका.

आता या महामायेने काय भाषा वापरली असेल तो संदेश पाठवताना? छ्या!

बरे, जुने दिवस आठवून तिला किमान घरी तरी चल म्हणावे असे वाटत होते, पण मालू नसताना जर ती घरी आली आणि मालूला त्याचा वृत्तांत मिळाला (बाळ ज्या गतीने तुरुतुरु गेले होते ते पाहता आत्तासुद्धा कदाचित आमच्यावर 'त्या डोळ्यांची दोन पाखरे' रोखली गेली नसतीलच याची खात्री नव्हती) तर झालेच. नोकरी जाणे एक वेळ ठीक होते. इथे संसार उद्ध्वस्त झाला असता.

पण त्याच वेळेला मला मी अगदीच शेपूटघालूपणा करतो आहे असे कुठेतरी जाणवत होते. घरात बरखाला नेण्याइतके जरी मला धैर्य नसले तरी बाहेर कुठेतरी भेटायला काही हरकत नव्हती. विशेषतः आजच्या आज, मालू बाहेर असतानाच.

"कुठे आहेस राहत तू?" मी प्रश्नलो.

उत्तरादाखल तिने ती राहत होती त्या उतारूघराचे ठिकाण अगदी सविस्तर सांगितले. आणि ती एक मुलाखत नोंदवून घ्यायला आली आहे आणि जास्तीत जास्त काही तासच इथे ती असेल, नंतर तिला ताबडतोब मुंबईला जायचे आहे, तिथे एक मुलाखत नोंदवण्याकरता आणि परत परदेशी जाण्याकरता हेही सांगितले.

"पन डिकरा, आ बाटलीना सूं गडवड छे?" बरखा कुठल्याही भाषेत थैमान घालू शके.

मी तिला दोन तासाच्या आत तिच्या उतारूघरात भेटण्याचे आणि सर्व शंका निरसन करण्याचे कबूल केले. लगेच का नाही? तर माझे घर तिथे जवळच आहे हे सांगण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे मी तिथे अजून कुणाकडेतरी कामाला आलो असून ते काम पटकन संपवून मग भेटेन अशी थाप मारणे आले. निरोपादाखल गाडीतून बाहेर उतरून कडाडून भेटण्याचा तिचा इरादा दिसताच मी अचानक घड्याळाकडे बघून "ठीक आहे, भेटू लौकरच" म्हणत काढता पाय घेतला. तिची गाडी सुसाटत गेली. कुणा जीवनविम्याच्या आस्थापनेने तिला पुरस्कृत केले असावे.

मी घरात पोचून हुश्श करून बसलो.