त्याचे असे झाले... भाग ७

कामाचे काही विशेष नव्हते, बरखाला भेटावे की नाही याचाच विचार करत मी यांत्रिकपणे इ-पत्रांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होतो. पण सुदैवाने लौकरच मला बहु-कर्मे (multi-tasking) करता येत नाहीत याची जाणीव झाली आणि मी अंक-उच्च मिटून ठेवला.

बरखाला भेटण्यातल्या अडचणींचा मी प्रामुख्याने विचार केला. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझे मालूशी लग्न झाले आहे आणि बरखा पंजाबी आहे या दोन्ही गोष्टींपैकी एखादीही बदलणे माझ्या कुवतीबाहेरचे होते. तेव्हा काय करायचे ते संपूर्णपणे मलाच ठरवायचे होते. केव्हातरी असा 'हान तू' छाप निर्णय घ्यावाच लागतो. आणि हीच ती वेळ होती. मी जाण्याचे ठरवले.

मी कपडे जरा व्यवस्थित केले आणि पैसे, भ्रमणध्वनी (चालू असलेला) व घराची किल्ली या वस्तू बाळगल्याची खात्री करून घराबाहेर पाऊल टाकले. तोपावेतो सूर्य चांगलाच तळपू लागलेला होता. वेळही रामराया जन्मला ती, टळटळीत दुपारची. आणि गाडी मालूने नेलेली. दुचाकी गेले अनेक दिवस सुरूच होत नव्हती. तिला मेस्त्रीकडे न्यायलाही मुहूर्त लागला नव्हता. थोडक्यात, रिक्शा या नामी वाहनाने प्रवास करणे ललाटी होते.

बरखा काय बरे म्हणाली होती? तिच्या उतारूगृहाचे नाव पेगासस (देवाशप्पत) आणि तिथल्या भोजनगृहाचे (आणी मद्यालयाचे) नाव 'लाल मिरची'. एकूण प्रकार तसा बऱ्यापैकी जवळ होता. रिक्शाने जायचे म्हणजे ज्या ज्या गोष्टींची तयारी लागते, त्यात सुटे पैसे (भाडे तेरा रुपये झाले आणि दहाच्या दोन नोटा दिल्या तरी बाकीचे पैसे सहजी मिळण्याचा योग माझ्या पत्रिकेत नाही. पंधरा रुपये दिले तरीही हेच लागू होते), आपण करीत असलेल्या प्रवासाची दिशा, वेळ  या गोष्टींचा अंतर्भाव होतो. आणि शिवाय माझ्या चेहऱ्याकडे पाहून की काय, रिक्शावाले परत मलाच मी कुठे जावे ते सुचवतात. ("पाषाणला येणार का"? विचारल्यावर "काय साहेब, पाषाणला काय, हडपसरला जायचे तर येतो" हा संवाद पाठ असलेल्यांची रांग शिवाजीनगरला माझी वाट पहात उभी असते). आणि प्रस्थान ठेवले.

आज मी कामावर गेलो नसून भर दुपारी औंधला जायला निघालो आहे याची खबर न मिळाल्याने सगळे नेहमीचे (नेहमी मला तंगवणारे) रिक्शावाले गायब होते. एक तरुण रिक्शावाला 'औंध' म्हटल्यावर काहीही आश्चर्य न दर्शवता निघाला. "दहा रुपये जास्त पडतील" हा संवादही नाही!

माझी रिक्शा त्या पेगाससच्या दारात पोचली आणि तिकडून तीच सकाळची भपकेबाज चारचाकी थेट आमचा नेम धरून समोरून सुसाटत आली. मी गपकन डोळे मिटले. 'अंतिम न्यायाचा दिवस' आला बहुतेक. आतापर्यंत केलेली सर्व पापे आठवून (आणी त्याबद्दल परमेश्वराची माफी मागून) मी डोळे उघडले. बरखा हसत उभी होती. रिक्शावाल्याने खूप पापे केली असावीत, कारण त्याचे डोळे अजून मिटलेलेच होते. मी "किती झाले" असे त्रिवार पुकारल्यावर त्याने डोळे उघडले, बाहीनेच घाम पुसला, आणि शिळ्या तेलात तळलेली भजी खूप हाणल्यामुळे आवाज बसलेल्या बेडकासारखा तो चिरकला, "त्रेचाळीस". मी पन्नासाची नोट सरकावून निघणार तोच त्याने (थरथरत्या हाताने का होईना) माझा हात धरून मला थांबवले आणि सात रुपये परत दिले.

आता बरखा माझ्या अंगचटीला येणार हे न टाळता येणारे सत्य होते. अर्थात तिला का दोष द्या, बदल माझ्यात झाला होता, तिच्यात नव्हे. बरखाने 'आ गले लग जा'चा प्रयोग केला आणि श्वास कोंडल्यामुळे तोंड उघडून आवंढा गिळताना मला पंधरा फुटावर नचिकेत दिसला. वेळेवर कुठे जावे हे त्याला कळत नाही. पण अवेळी कुठे जावे हे बरोबर कळते. तो तसा अवेळीच जन्माला आला होता. त्याने खरे तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला उमराव म्हणूनच जन्माला यायचे होते.

सुदैवाने त्याच्याबरोबर मिल्की नव्हती. तिच्यासमोर असे काही घडलेले मला.... हं ... असो. आणि महदाश्चर्यम... त्याच्या बरोबर एक फटाकडी होती! त्याच्याबरोबर त्याच्या कार्यालयातील बाकीचेही लोक होते म्हणा (तो कुठल्यातरी आंतरराष्ट्रीय आस्थापनेत विपणन व्यवस्थापक होता, आणि त्याचे ग्राहक आशियाभर पसरलेले होते), पण मला नेमकी माझ्या उपयोगाची गोष्ट दिसली. त्याने मला काही विचारायच्या आतच मी, "काय नचिकेत, मिल्की दिसली नाही एवढ्यात... माहेरी गेली की काय? तिच्याशी बोललो नाही एवढ्यात, दूरध्वनी केला पाहिजे एक दिवस" अशी फैर झाडली. येथे येक गोष्ट सांगणे गरजेचे आहे. मी जर 'कोंबडीने टोचलेला नवरा' असेन, तर नचिकेतची टोचून टोचून पार चाळण झाली होती. त्यामुळे "ढिश्यांव ढिश्यांव हाच उत्तम बचाव" हा माझा हेतू सुफळ संपूर्ण साध्य झाला. "महत्वाचे ग्राहक.... भ्रमणध्वनीवर तुमच्यासाठी संदेश... नंतर सांगतो..." करत तो अंतर्धान पावला आणि आम्ही आत भोजनगृह-मद्यालय संकुलात पोचलो.

"जेवायला काय घेणार?" या माझ्या सवालाला "जेवायचे नंतर बघू, आधी पिण्याचे काय" असा जबाब आला. बरखाकडून दुसरी काय अपेक्षा करणार? शेळीचे दूध पिण्याची? बरखाच्या "पिण्याचे काय" हे विचारण्याची गरज नव्हती. जर तिच्या सवयी बदलल्या नसतील तर मला त्याचे उत्तर पाठ होते. "दोन डी.एस.पी. लार्ज, नीट" हे पहिल्या फेरीतले तिचे उत्तर असे. पुढच्या फेऱ्या करण्याची शक्तीही अचाट होती तिची. आणि तिच्याकडे पाहून त्यात सकृतदर्शनी तरी काही बदल झाला असेल असे वाटत नव्हते. पण आशा अमर असते. "तू अजून घेतेस?" "व्हॉट डू यू मीन बाय अजून?" मी हार मानली. "अरे डी. एस. पी. मिळत नाही भारत सोडून कुठेच" मी मान वळवून पेय देणाऱ्याला शोधू लागलो.

"तू काय घेणार बोल?" मला भीती होती तोच प्रश्न. पूर्वीसुद्धा माझी कुवत (आर्थिक आणि शारिरीक) एका पेगच्या वर जात नसे, तेही त्यात दोनेक लिटर पाणी (सोडा महाग असे) घालून. आता तर काल रात्रीचे जाग्रण, सकाळपासून जवळपास रिकामे असलेले पोट आदी गोष्टींचा विचार करता मी पाणी पिणेच शहाणपणाचे झाले असते. पण मी शहाणपणाने वागलो तर इतक्या वर्षांनी भेटलेल्या बरखाच्या इज्जतीचा फालुदा (हा वाक्प्रचार म्हणून ठीक आहे, पण याची पाककृती कुणास ठाऊक आहे काय?) झाला नसता काय असा खडा सवाल आला. वरून "अफसोस, मर्द शादी करते है, पर शादी के बाद मर्द नही रहते है" अशा आशयाचा एक शेर उपस्थित सर्वांसाठी (तो मला उद्देशून आहे हे व्यवस्थित दर्शवून) म्हणून झाला. अखेर मी बियर घ्यायला संमती दिली. "उफ, बियर... क्या बच्चों जैसे करते हो?" बरखाला तिच्या मेजर जनरल बापाने बहुधा मद्यार्कावरच वाढवली असावी. (बरोबर. डोंगरे बालामृताचे वितरण पंजाबात कुणी करत नसणार. इथेच तर मराठी माणूस मार खातो.) अखेर 'कडक बियर' या बोलीवर सौदा तुटला.

एकंदरीतच मला काहीतरी चुकचुकल्यासारखे वाटत होते. उन्हातून थेट वातानुकूलित अर्ध-अंधाऱ्या वातावरणात आलो म्हणून असेल अशी स्वतःची समजून घातली. आमची पेये आली. मी गाढवासारखा गाफील राहिलो. 'चियर्स' म्हणायच्या ऐवजी बरखाने दाण्णदिशी माझ्या पाढीत धपाटा घातला आणि गर्जली, "बम भोलेनाथ की जय" ('भोलेनाथ'ला दोन्ही बाजूने शब्दांचे डबे जोडत नाहीत हे तिला कधीच मान्य नव्हते). जुनी सवय! पण बावळटासारखा आ करून जगाकडे बघताना मला त्या धपाट्याने ठसकाच लागला. पाणी काही समोर दिसेना. आणि मी वियरनेच ठसका मिटवण्याचा प्रयत्न केला.

ज्ञानी लोकांना माहीतच असते की अर्धवट अंधारात बियरचा रंग आणी "डी. एस. पी." या नामांकित द्रवाचा रंग यात फरक करणे अवघड असते. ठसका लागलेला असताना ते अशक्यच होते.

थोडक्यात, मी पन्नासेक मिलिलिटर सोनेरी द्रव घशात ढकलला. त्यातील चाळीसेक मिलि बाहेर पडला. सकाळपासून माझ्या (किंवा इतर कुणाच्याही) पोटात जाणाऱ्या मद्यार्कापेक्षा माझ्या शरीराला मध्यबिंदू कल्पून काढलेल्या दीड फूट त्रिज्येच्या वर्तुळात पसरणाऱ्या मद्यार्काचे प्रमाणच चिंताजनक होते.

बरखाने मला खांद्यावर घेऊन थोपटायला सुरुवात केली आणि मला चुकचुकल्यासारखे का वाटत होते याचा उलगडा झाला. समोर अंधुक प्रकाशात ओळखीचा वाटणारा एक चेहरा चांगलाच ओळखीचा होता. अनंत हरी सदावर्ते. खुद्द माझे सासरे!

मी घाबरून बेशुद्ध पडलो नाही याची तीन कारणे होती. एक म्हणजे सासरेबुवांना ऐकू कमी येत होते (हा एक वाचातप पाळण्याचा प्रकार; आमच्या गावाकडे याला 'ठार बहिरा आहे म्हातारा' असे म्हणतात. पण आमचा प्रेमविवाह पडला ना, त्यामुळे (बऱ्याच) काही गोष्टींत जिभेला मुरड घालावी लागते). त्यामुळे मगाचचा बरखाचा 'मर्द' शेर आणि एकंदरीतच खिंकाळणे त्यांच्या कानापर्यंत गेले नसणार. आता या बहिरेपणावर इलाज का केला नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तरही देतो. त्यावर उपाय म्हणून श्रवणयंत्र खरेदी झाले होते. पण... तेच माझे दुसरे कारण. म्हातारबुवा जाम विसराळू होते. त्यामुळे श्रवणयंत्र नुसते अडकवून दिवसभर फिरणे, "जरा जोरात बोल" असे म्हणून प्रत्येकाला वात आणणे, झोपताना ते चालू करणे, आणि "मला झोपेत स्वच्छ ऐकू येते, पण जागेपणी नाही" असे डॉक्टरांना सांगून छळणे हे नेहमी होत असे. आणि तिसरे कारण म्हणजे त्यांची दृष्टी (बऱ्यापैकी) शाबूत असली तरी समोर बियरचा पेला असताना ती इतरत्र फालतू गोष्टींकडे फिरवण्याइतके ते 'हे' नव्हते.

गैरसमजूत नसावी. त्यांची बियर रिचवण्याची कुवत माझ्या कुवतीहून कमी होती. पण तरुणपणी इंग्लंडला राहून आलेले असल्याने 'कोमट आणि सपाट' अशीच बियर प्यायची असते ही त्यांची ठाम समजूत होती. आणि ती 'कोमट आणी सपाट' करण्याकरता थंड बियरचा पेला हातात धरून, आपल्या शरीरातली उष्णता हाताच्या त्वचेमार्फत त्याला पुरवणे हीच 'बिरबली खिचडी' पद्धत त्यांना माहीत होती.

याखेरीज बरोबर कुणी बुद्धीबळ या विषयावर बोलणारा असेल तर संपलेच. (सत्यजित राय यांनी 'शतरंज के खिलाडी' हा माझ्या सासऱ्यांनाच मध्यवर्ती भूमिकेत कल्पून काढला असेल, पण सज्जाद अली आणि रोशन अली या दोन्ही पात्रांपैकी कुणीही बियर (कोमट आणि सपाट) पीत नसल्याने माझ्या सासऱ्यांनी नकार दिला असेल असे माझे ठाम मत आहे.) बुद्धीबळाख्यान चालू असताना बाकीचे सर्व आवाज त्यांच्या कानात शिरण्याला ठाम नकार देत.

असो. पण उगाच नशिबाची परीक्षा बघण्यात अर्थ नव्हता. डी. एस. पी. या द्रवात काही चांगल्या गोष्टी असतीलही (संशयाचा फायदा द्यावा), पण त्याचा दर्प ही नक्कीच त्यातली एक नव्हती. आणि चाळीस मि.ली.पैकी तीस माझ्या शर्टावरच होते. उपाशीपोटी तो वास अगदीच डोक्यात भिनायला लागला. भूक, झोप, डोके ठणकणे,... माझा एकंदरीतच अवतार फारच दयनीय झाला असावा. कारण बरखालाही माझी कीव आली. आणि परत भेटायची धमकी देऊन, पण आत्ता तरी अत्यंत सभ्य रीतीने तिने माझा निरोप घेतला.

अर्ध-अंधाऱ्या अवस्थेतून परत झगझगीत प्रकाशात. पोटात दहा मिली आणि शर्टावर तीस मिली डी. एस. पी. बाहेर वाहनतळातून सुसाट वेगाने बाहेर पडणारी एक एस्टीच्या पिल्लासारखी दिसणारी गाडी. पण आज जीव (थेट) जायचा योग नव्हता बहुतेक. कानठळ्या बसवीत गाडी उभी राहिली. तिची काच खाली होऊन एक पोकळी निर्माण झाली. चेहऱ्याहून थोडा लहान काळा चष्मा लावलेला आणि शिपाईछाप केशकर्तन केलेला एका स्त्रीचा चेहरा त्या पोकळीत उमटला. चेहरा ओळखीचा वाटतो असे म्हणेपर्यंत (प्रकाश)नळी पेटली. लथिका गोपालसामी!

का कोण जाणे, आता ती माझी नोकरी घालवू शकत नाही म्हणून असेल, पण मी अगदी शांत स्वरात आणि तर्कदृष्ट्या पटेल असा खुलासा (शर्टावरच्या तीस मि.ली.चा) दिला. त्यात बरखावर सगळा दोष ढकलला. (आधीच्या अवतारात बरखाने लथिकाला स्त्री-संघटनांची 'तारका' करून टाकले होते. आणि समाजवादी, साम्यवादी, जनवादी, बहुजनवादी इ 'वादी' प्रकारांनी लथिकाच्या तोड़ाला फेस आणला होता. बरखा निघून गेली होती अमेरिकेला आणि तिथून घानाला की कुठेतरी. हे सर्व मला त्यानंतर लथिकाशी बोलताना कळले.) बरखाची चूक लथिकाने अगदी मनापासून मान्य केली आणि मला घरी सोडायचे कबूल केले.

घरी तर सरळ येऊन पोचलो. येतानाच एक पावाचा पुडा आणि लोण्याचे पाकीट आणले आणि आधी पोटात माल पोचवला. मग स्वच्छ आंघोळ करून कपडे बदलले. हुश्श! जत्रेतल्या महाकाय पाळण्यातून अचानक खाली उतरावे तसे भिरभिरू लागले. काय काय घडले होते गेल्या काही तासात!  त्याचाच विचार करत आणि मालूची वाट पहात सरळ ताणून दिली. असे झाले त्याचे....


सध्याची वेळेची उपलब्धता पाहता जे जे मनात योजले होते ते सर्व पाठोपाठच्या दोन भागांमध्ये फार मोठा कालावधी न दवडता लिहिणे खूपच अवघड दिसते (एक अनुभव: पुस्तक परीक्षण करायला त्या मानाने खूपच कमी वेळ लागतो). त्यामुळे एक प्रयोग करतो. ह्या भागाच्या शेवटी हे कथानक संपण्याची एक पायरी दर्शवतो. शक्य झाल्यास जे जे मनात होते ते सर्व लिहून काढीनच. अन्यथा येथेच ही लेखमाला थांबली असे कृपया मानून घ्यावे. लिखाणाचा एक 'डोक्यात जाणारा' अनुभव मिळाला ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू. सर्व प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार.