वसंत बापट- २

बापटांच्या मला आवडणाऱ्या कविता

घराघरात आढळणारा जिना  आणि माणसांचे नाते सांगणारी  वसंत बापटांची "जिना" ही एक अप्रतिम कविता.

लहान असल्यापासून आपण सर्वजण कधी ना कधी किंवा अगदी दरदोज किती तरी वेळा जिना चढून उतरून जातो. पण त्यावर कविता करावी असे मनात येणे आणि बापटांसारखी कविता करणे हा अनुभवच  विरळा. त्यातली सहजता, माधुर्य आणि कल्पकता पाहिली, की वसंत बापट किती सोप्या विषयावर मनाला स्पर्श करणारी कविता लिहू शकतात  ह्याची अनुभूती वाचकाला आली नाही तरच नवल म्हणावे लागेल.

जिना
कळले आता घराघरातुन
नागमोडिचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातिल अधीर धडधड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतो स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे

कविता करणे आणि ती उत्तमरित्या सादर करणे हे दोन्ही वसंत बापटांना जमले होते.  बापटांनी महाराष्ट्रात, भारताच्या विविध प्रांतात तसेच आणि युरोप अमेरिकेत त्यांच्या कवितांचे वाचनाचे कार्यक्रम मोठ्या संख्येने सादर केलेत.   याशिवाय राष्ट्रसेवादलात सादर होणारे 'भारतदर्शन' "आझादी का जंग" आणि "महाराष्ट्र दर्शन "हे त्यांचे  कार्यक्रम सर्वत्र गाजले होते.   

युरोप, जपान आणि अमेरिकेच्या परदेश वास्तव्यावर वसंत बापट ह्यांनी "प्रवासाच्या कविता" हा एक काव्यसंग्रह लिहिला. त्यातील "अलाण्याच्या ब्रशावरती" जाहिरातमय जीवनाचे वर्णन करणारी एक विनोदी पण वाचकाला विचारमग्न करणारी कविता. अमेरिकेत राहणारी मंडळी चटकन ह्या कवितेतील संदर्भांशी  जुळवून घेऊ शकतील तर अमेरिकेबाहेरील  रसिकांनाही अमेरिकेतील जाहिरातमय जीवनाची किंवा एकंदरीत जाहिरातींचा असणाऱ्या प्रभावाची कल्पना ही कविता वाचून  स्पष्ट होईल.

अलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन
अलबत्याचे अंडरवेयर गलबत्याचे थोबाडरंजन
लिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रॅंड साबणजेली
चरबी हटवा वजन घटवा हजारोंनी खात्री केली
केंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरी चाटण
डबलडेकर सॅंडविचमध्ये बबलछाप मटन घाटण
पिझ्झा हटचा पिझ्झा खा मेपल्ज्युस् ऍपलपाय
अमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय?
अबकड इ फ ग तयार घरे सात टाईप्स
रेडीमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटर पाईप्स
हॉटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास
एकच रूप एकच रंग एकच रूची एकच वास
आकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते
जहांबाज जाहिरातबाजी गिऱ्हाईकांना गटवत असते
अजब देश अजब तऱ्हा व्यक्तिवरती सक्ती नाही
सहस्त्रशीर्षा पुरुषा तुझी गणवेशातून मुक्ती नाही
वसंत बापट-
काव्यसंग्रह- प्रवासाच्या कविता

"शिंग फुंकिले रणी" ह्या काव्यसंग्रहातील मनाला प्रसन्न करणारी आणि नादमय अशी एक कविता म्हणजे  "देह मंदिर चित्त मंदिर " हेच त्यांचे एक लोकप्रिय गीतसुद्धा आहे.

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रर्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

कवी : वसंत बापट
संग्रह : शिंग फुंकिले रणी

बापट ह्यांच्या सर्वच कवितांना एक अंगभूत लय आहे. त्यामुळे त्या कविता छंदात आहेत अथवा नाहीत याचे भानही वाचकाला रहात नाही. त्याच्यापर्यंत पोहोचते ती कवितेतील लय आणि मनाची हुरहूर वाढवणारी शब्दरचना.  त्यांच्या कित्येक कवितेतील वेदना आपल्या मनात घर करते. अशीच एक राजसी या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे "भास"

भास
संध्याकाळी किनाऱ्यावर एकाएकी झाला भास
कोण आलं.. कोण गेल? कोणीच नाही जवळपास?
कुठून आली ..कुठे गेली? मी पाहिली एवढ खर
अस येण अस जाण तिल दिसल नाही बर!
चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली
रेतीवरती पाउलखुणा न ठेवता परत गेली
थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली
गुल्बाक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली!
पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगल का हे पुन्हा येण?
तेव्हा वचन दिल होत पुढील जन्मी देईन देण !
आयुष्याच्या क्षितीजावर अंधारात बुडले रंग
कशासाठी कशासाठी आता अस तपोभंग?
समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो
ओल्याचिंब देहानीच पेटलो होतो, विझलो होतो!
आता असे कोरडे.. जस जळण्यासाठी उत्सुक सरण
निमित्ताला ठिणगी हवी! एवढ्याकरता दिल स्मरण?
- "राजसी" ह्या काव्यसंग्रहातून