वसंत बापट - ३

वसंत बापट परिचय आणि मला आवडलेल्या कविता

"सावंत" ही वसंत बापट यांची पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात गेलेल्या पण मूल्ये बदलेल्या पिढीवर केलेली एक  जळजळीत आणि उपहासात्मक कविता. अंदाजे अडीच पाने असणाऱ्या कवितेतील काही निवडक ओळी इथे देते आहे.

सावंत,
किती वर्षांनी भेटतो आहेस मला!
स्वराज्य आले आणि जुनेदेखील झाले.
चले जाव पुकारणारा
तुझा इरसाल म्हातारा केव्हाच शांत झाला
सकाळी दुपारी... तू केव्हाच दिसला नाहीस
सिंहासने पुन्हा पुन्हा भरली आणि  पुन्हा पुन्हा रिती झाली
मैफिलीत तुझा पत्ताच नाही!
खरे सांगू? मीही तुला विसरून गेलो...
तर आज तू उभा.
सावंत, तू कुठे होतास?
सावंत,
सावंतच ना तू?.........

तुला खरे सांगतो सावंत
हिवाळ्या पुलाखाली डायनामाइट पेरायची
कल्पनाच केव्हढी ग्रेट होती
मोतीराम फितूर झाला नसता तर
पंजाबमेल सहयाद्रीने गिळली असती
कसला पच्चकन थुंकलास तू
त्याच्या नावावर
तो आता मंत्री झाला आहे, सावंत
दचकतोस कशाला?....

आता कंत्राटदाराचे राज्य आहे भैया!
खरे सांगतो ... मीही बदललो आहे
पोट पहा ना सुटले किती

.........

अंगातली रग आणि तोंडातली शिवी
दोन्ही हरवून बसलास?
माझ्याशी तसा बोल, पंचवीस वर्षांनी...
नाहीतर सावंत
चले जाव
चले जाव आमच्या फोपशा स्वराज्यातून!

 रंगाने तू गव्हाळ ही 'सेतू' या काव्यसंग्रहातील प्रेयसीचे वर्णन करणारी एक कविता. त्या कवितेतील शब्द, ओघवतेपणा आणि कल्पना मला आवडल्या.

रंगाने तू गव्हाळ

रंगाने तू गव्हाळ त्यातुन अंगावरती सोनसळा
टवटवीत घवघवीत मुखडा चाफ्याचा जणु सोनकळा
कुरळ्या कळपामधून चुकला भाळावर कुणि वाट खुळा
मधाळ ओढी सुढाळ मोती मधेच करती झळाझळा
कानशिलाचे पान कोवळे सान त्यावरी तीळ निळा
तिरप्या नजरेमधुन घातला कसा काळजावरी विळा

'सेतू' याच काव्यसंग्रहातील कोवळ्या वयातील असफल प्रेमाचे वर्णन करणारी 'जपावयला शिकली होतिस'  ही आणखी एक मनाला हुरहुर लावणारी कविता. त्या कवितेतील लय आणि कवितेचा शेवट मला  आवडला.

जपावयाला शिकली होतिस
जपावयाला शिकली होतिस सारे काही
काठ जरीचा श्वासानेही ढळला नाहि
मोजित होतिस शब्दांमधल्या छटाछटांना
करायचिस तू शिक्षा अपुल्या स्वैर बटांना

शैशव माझे सरले होते, सरले नव्हते
सारे काही कळले होते कळले नव्हते
नुकते होते स्वप्नपऱ्यांना फुटले पंख
अभिलाषेचा जरा कुठे झालेला डंख
..
आज मला ते आठवती मी मलाच हसतो
आठवता ते अजून परि मी माझा नसतो.

वसंत बापट -परिचय

त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ साली  कऱ्हाड येथे झाला.  १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. त्याकरता त्यांना १९४३ ते १९४५  पर्यंत कारावासाची शिक्षा झाली होती.  पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून एम ए झाल्यानंतर ते १९४८ मध्ये मुंबई येथे रामनारायण रूईया या महाविद्यालयात मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक होते. काही वर्षे ते साहित्य अकादमीचे सदस्य होते. वसंत बापट १९८३- ८८ या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते. त्याच काळात त्यानी लेखन केलेले "विसाजीपंतांची वीस कलमी बखर" हे राजकीय उपहासाचे एक उत्तम उदाहरण म्हणून सर्वांना परिचित आहे.

७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  वसंत बापट ह्यांनी भूषविले होते. त्यावेळी सरकारचे धोरण आणि लेखकांची गळचेपी यावर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला .  लेखकांच्या स्वातंत्र्यावर राजकीय नेत्यांनी आपला दबाव टाकू नये याविषयी आपली मते वसंत बापट ह्यांनी ठासून मांडली होती. वसंत बापटांची एका  कालखंडातील  कविता  तत्कालीन राजकीय परिस्थिती, सामान्य माणसाचे जीवन, सामाजिक जाणिवेची बांधिलकी अशा विषयांनी भरून ओसंडत होती. त्यांमधील  विचार पाहिले तर वसंत बापटांच्या ह्या संमेलनाच्या अध्यपदावरून केलेल्या राजकीय पक्षावरच्या हल्लयाचा उलगडा नक्कीच होईल.