दिवाळीतले चमत्कार-१

नाराजी का 'राज'

-----

अभूतपूर्व रोषणाईने 'कृष्णकुंज' गजबजून गेले होते. संपूर्ण परिसराला 'मनसे'च्या झेंड्याच्या पताका लागल्या होत्या. सगळीकडे फटाके वाजत होते. जल्लोष सुरू होता. महाराष्ट्रातून, देशातून, जगातून आलेले हजारो कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत होते. आज खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, 'मनसे'च्या कर्तव्यनिष्ठतेचा विजय झाला होता. मराठी राष्ट्रपतींनी खास अध्यादेश काढून महाराष्ट्रातून सर्व बिहारींना, उत्तर भारतीयांना, मध्य प्रदेशींना, गुजरातींना, बंगालींना, पंजाबींना हाकलून देण्याचा आदेश काढला होता. मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमहून आलेल्या परप्रांतीयांना दुसऱ्या टप्प्यात बाहेर काढण्याचा आदेश होता आणि बांगलादेशींना थेट देशाबाहेरच काढण्याचा आदेश होता; पण त्याची अंमलबजावणी युतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर करावी, असे म्हटले होते.

राज ठाकरे आपल्या कक्षात आराम करत होते. बाहेर बाबासाहेब पुरंदरे, मोहन वाघ, जयंत साळगावकर, विनय आपटे, अण्णा हजारे, भरत जाधव आदी मान्यवर गप्पा मारण्यात दंग होते. सगळ्यांच्या चेहऱ्यांवरून आंदोलनातील विजयाचा आनंद ओसंडून खाली सांडत होता. सर्वांच्याच चेहऱ्यावर राजबद्दलचा अभिमान झळकत होता. आलेल्या सगळ्यांना मिठाई आणि अन्य पदार्थ वाटण्यात शर्मिला वहिनी दंग होत्या. घरातही वेगवेगळे गोड पदार्थ केले होते. सर्व पदार्थ अस्सल महाराष्ट्रीयच असतील, यावरही भर देण्यात आला होता.

कार्यकर्त्यांनी मराठी पद्धतीचा पेहराव केला होता. सलवार-कमीज, कुर्ता, शेरवानी, जोधपुरी, सफारी वगैरे पारंपरिक परप्रांतीय पोशाखांना फाटा होता. सगळीकडे नुसता मराठी आणि मराठीचा जयघोष सुरू होता.

लालूप्रसाद यादव, अमरसिंह, राजनाथसिंह, रामविलास पासवान, प्रफुल्ल पटेल, कृपाशंकरसिंह, संजय निरुपम, मार्गारेट अल्वा सगळ्यांनी राज ठाकरेंना दूरध्वनी करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; पण साक्षात उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या घरी शुभेच्छा द्यायला आले, तेव्हा वातावरणाचा मूडच बदलला. 'भरतभेटी'चा हा प्रसंग अनेकांनी याची देही याची डोळा अनुभवला. उद्धव ठाकरेंनी राजनाच 'गादी' चालविण्यासाठी निमंत्रण दिले. राजनी सन्मानाने त्याला नकार दिला. आपल्या पादुका देण्यासही नकार दिला. यापुढे लढणार नाही, अशी घोषणा करून उद्धव घराकडे रवाना झाले.

या सगळ्या उत्सवी, जल्लोषी वातावरणात राज मात्र काहीसे उदास दिसत होते. बहुधा आंदोलनातल्या आणि त्यानंतर पोलिसांमुळे झालेल्या दगदगीचा परिणाम असावा, असे अनेकांना वाटले. हिंदी चॅनेलच्या काही अतिउत्साही पत्रकारांनी त्यांना खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला; पण राज यांनी दाद लागू दिली नाही.

कार्यकर्त्यांची पांगापांग झाल्यानंतर राज यांनी आपल्या दालनात निष्ठावंतांची बैठक बोलावली. सगळेच आनंदात होते. सगळ्यांनी राजसाहेबांचे पुन्हा त्रिवार अभिनंदन केले, तरीही राज यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलेना.

अखेर न राहवून एकाने विचारलेच, "राजसाहेब, आपला विजय झालाय ना? मग तुम्ही उदास का? आमचे काही चुकले का? "

"अरे, तुम्हाला कळते का? आपला विजय झालेला नाही! केंद्र सरकारने डाव खेळलाय हा! मराठीचा मुद्दा संपला! आता निवडणुकीत करायचे काय आपण? " राज उसळून म्हणाले.

------