दिवाळीतले चमत्कार-४

राणेंची लगीनघाई

----------

सकाळी सकाळी निवांत "प्रहार' वाचत बसलेल्या नारायण राणेंना नीलिमाताईंनी हलवलं.

"अहो उठल्या उठल्या पेपर काय वाचत बसलाय? चला, अंघोळ उरकून घ्या! "

"अगं, आज दिवाळीचा पहिला दिवस. कॉंग्रेसमध्ये आल्यावर माझ्या मुख्यमंत्रिपदाची सुद्धा ही पहिली दिवाळी. आणि तू अंघोळ वगैरे काय म्हणतेस? "अभ्यंगस्नान' म्हणावं! आणि "पेपर' काय म्हणतेस? "प्रहार' म्हणावं! काही फरक आहे की नाही? " राणे जरासे चिडक्या स्वरात म्हणाले.

"अहो, इथपर्यंत पोचण्याआधी तुम्ही कुणाकुणाच्या नावानं अंघोळ करत होता ना, म्हणून तेच डोक्यात बसलंय. "

"असो. चला, आटपा लवकर. छान सुगंधी उटणं लावते. गरम पाणी काढून ठेवलंय. पटापट स्नान आटोपून घ्या. नीलेश आणि नीतेश कुठे गेलेत? '"

"अगं, ते फटाके वाजवत असतील बाहेर. बिच्चारे. माझ्यासाठी किती राबतात ते! आपल्या मालवणापासून पाहुण्यांसाठीच्या कालवणापर्यंत प्रत्येक गोष्टीत तेच पुढाकार घेत असतात. दमतात बिचारे. मजा करू दे निदान आज तरी! "

"ते काही नाही! चला बरं, लवकर उठा. पटापट आटपा. आपल्याला सिद्धिविनायकाला पण जायचंय! " नीलिमाताई ऐकायलाच तयार नव्हत्या.

"तुझी एवढी का घाई चाललीय गं? थांब जरा! " राणेंनी आता शेवटचं अस्त्र उगारलं.

एवढ्यात कुणाचा तरी फोन वाजला. नीलिमाताई फणकाऱ्यानंच आत निघून गेल्या. राणेंनी फोन घेतला.

"हां, बोला विलासराव! हॅपी दिवाळी! अहो, तुमचीच आठवण काढत होतो. तुमच्यामुळेच तर यंदा आमची दिवाळी दुप्पट आनंदाची जाणार आहे...! " असं म्हणून राणे मोठ्यांदा हसले.

"हो हो... हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी! " विलासरावांनी नेहमीचं स्मितहास्य केलं.

"बाकी, कसं काय चाललंय अरुणाचल प्रदेशात? राज्यपालपद काय म्हणतंय? तिकडे नक्षलवाद्यांचा काही त्रास नाही ना? "

"नाही हो! नक्षलवादी नाहीत; पण इथे स्थानिक बंडखोरांचा त्रास जास्त आहे... "

"अहो तो काय, इथे मुंबईत पण होताच की तुम्हाला! '" राणे स्वतःच्याच विनोदावर मोठ्यानं हसले.

विलासरावांचा चेहरा (फोनवरूनही) बघण्यासारखा झाला.

"पण येत जा हं अधूनमधून पक्षाच्या कामासाठी आणि आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तुमच्यासारख्या अनुभवी आणि मैदान मारणाऱ्या नेत्यांची गरज आहेच आम्हाला. कळवू तेव्हा! '" राणेंनी पीन मारली.

"नक्की... नक्की! तुम्ही पण या कधीतरी हवापालटाला. आता कॉंग्रेसमध्ये आहात, तर कुठंही कधीही राहायची सवय हवीच ना! " असं म्हणून विलासरावांनी फोन ठेवला.

नीलिमाताई राणेंना बोलवायला येणार, तोच पुन्हा फोन वाजला. या वेळी फोनवर माणिकराव ठाकरे होते.

"काय माणिकराव, काय म्हणते दिवाळी? "

"अहो, मजेत चाललीय. म्हटलं तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात. नव्या जबाबदारीतली पहिलीच दिवाळी आहे ना! '"

"हो तर! धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. आमची जबाबदारी सांभाळायला आम्ही समर्थ आहोत बरं का माणिकराव! कॉंग्रेसमध्ये असलो, तरी स्वाभिमान सोडला नाही आम्ही! "

"हो तर! अहो, तुम्हाला कोण काय म्हणेल? बरं, ते मंत्रिमंडळ विस्ताराचं आता तरी बघूया असं म्हणतो. कधी वेळ देताय मग? "

"बघू हो! दिवाळी तर होऊन जाऊ द्या! "

"बरं... ठीक आहे. " माणिकरावांनीही निरोप घेतला.

राणेंची स्वारी तरीही स्नानासाठी हलेना, तेव्हा नीलिमाताईंना राहवलं नाही.

"अहो, मघापासून सांगतेय! अंघोळीला जाताय ना? पाणी पण गार झालं तिकडे! तुमचे नुसते फोनवर फोन! "

"अगं, अभिनंदनाचे, शुभेच्छांचे फोन येतात. बोलायला नको? तुझी एवढी काय घाई आहे? "

"अहो, मला काही घाई नाही; पण एखादा दिल्लीचा फोन आला आणि तुमचं मिळालेलं पद गेल्याचं कळलं, तर सगळाच उत्साह मावळेल. म्हणून मी घाई करतेय! " नीलिमाताईंच्या या खुलाशानंतर राणे ताडकन उठले आणि स्नानगृहाकडे निघाले...

--------