डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...१

(या लेखातील मांडणीला ‘डाईंग टु विन’ या पुस्तकातील माहितीचा आधार आहे).

मुंबईवर (खरे तर हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, देशावर असेच म्हटले पाहिजे)
झालेल्या हल्ल्याने एका नव्या स्वरूपाच्या लढाईसाठी सज्ज व्हावे लागणार
आहे. ही लढाई दहशतवादाशी नाही. ही लढाई आहे राज्यविहीन (स्टेटलेस) अशा
स्वरूपात कार्यरत असणाऱ्या एका समुहाशी. या समुहात अनेक संघटना आहेत. हा
राज्यविहिन समुहाने याआधी चढवलेल्या (बेस्लनसारखे एक-दोन अपवाद सोडता)
हल्ल्यांमध्ये आणि मुंबईवरील हल्ल्यामध्ये मूलभूत फरक आहे आणि तो ध्यानी
घेऊनच यापुढचे डावपेच आखावे लागणार आहेत.
१. कोणत्याही संघटनेचा आपल्या प्रत्येक कृत्यामागे एक हेतू असतो.
हेतूंशिवाय असे संघटन आणि त्यापाठोपाठ आपल्या कार्यक्रमासाठीची प्रेरणा
शक्य नसते. दहशतवादी संघटनांबाबतही तेच आहे. बहुतांश दहशतवादी संघटना एका
विशिष्ट हेतूने प्रेरित आहेत. हा हेतू सामायीक स्वरूपात व्यक्त होऊ शकतो.
अमेरिकी राज्यशास्त्रज्ञ रॉबर्ट पेप यांच्या म्हणण्यानुसार हे दहशतवादी
ज्या भूमीला आपली मातृभूमी मानतात, त्यावरील परकीय ताबा संपवणे हा त्यांचा
मूलभूत हेतू आहे (संदर्भ - डाईंग टु विन). आखाती-अरब राष्ट्रातील
परिस्थितीचे त्यांनी जे विश्लेषण केले आहे, त्यानुसार ही मांडणी
पटण्याजोगी आहे.
२. संघटनांच्या या हेतूचे स्वरूप सरळसरळ राजकीय आहे (तो समर्थनीय आहे की
नाही हे ज्याच्या-त्याच्या धारणेवर अवलंबून आहे). त्याची पूर्तता
करण्यासाठी त्यांना "युद्ध" करावे लागते आहे. या संघर्षात या समुहांची
ताकद त्यांची ज्यांच्याशी गाठ पडली आहे त्यांच्यापेक्षा कमी आहे हे उघड
आहे. त्यामुळेच या युद्धाचे स्वरूप पारंपरिक व्याख्येत बसणाऱ्या
युद्धासारखे असू शकत नाही, हे या संघटनांनी पक्के ओळखले आहे. ताकदीच्या,
सामर्थ्याचा या असमतोलामुळे या समुहांना या युद्धासाठी अपारंपरिक
स्वरूपाचे डावपेच आखावे लागले आहेत आणि तसे त्यांनी ते आखले आहेत.
३. जनमानसात दहशत पसरवून तेथूनच आपल्या लक्ष्य राजकीय व्यवस्थेवर दबाव
निर्माण करावयाचा आणि मागण्या पदरात पाडू घ्यावयाच्या हा या डावपेचाचा एक
भाग. अगदी प्रारंभीक परिस्थितीत तो यशस्वी झाला आहे, असे पेप यांनी दाखवून
दिले आहे. हल्ले चढवून दहशत पसरवायची आणि त्यानंतर हल्लेखोरांनी जीव
वाचवून पलायन करावयाचे असे त्याचे स्वरूप होते.
४. केवळ दहशत पसरवण्यातून आवश्यक तो राजकीय दबाव निर्माण होत नाही असे
ध्यानी आल्यानंतर पुढचा टप्पा आला. त्याचे स्वरूप आत्मघाती हल्ले हे होते.
आत्मघाती हल्ल्यांमध्ये देखील आरंभीच्या टप्प्यात धर्म हा आधार नव्हता.
"राष्ट्राचे स्वातंत्र्य" हाच त्यामागील प्रेरक हेतू होता आणि आहे.
प्राणत्याग करण्यासाठी मनुष्यबळ मिळवण्यासाठी धर्माचा आधार घेण्यात आला.
आणि त्यातून प्राणत्याग करून हल्ला करण्यासाठी तयार असणाऱ्यांची फौज
निर्माण झाली. बेल्ट बॉम्ब, कारबॉम्ब, ट्रकबॉम्ब आणि थेट विमानबॉम्ब हे
त्याचे नमुने.
५. आत्मघाती हल्ल्यांनाच बॉम्बहल्ल्यांची जोड देण्यात आली. त्यासाठी
काटेकोर आणि तपशीलवार नियोजन करण्यासाठी आवश्यक संघटन उभारण्यासाठी
धर्माचा आधार उपयुक्तच ठरला. भारतात किंवा इतरत्र झालेल्या अशा
बॉम्बस्फोटांमागेही सूत्रबद्ध हेतू आहेत. "शत्रू"ला नामोहरम करणे,
त्यासाठी जनतेत असुरक्षेची भावना निर्माण करणे आणि त्यातून दबाव निर्माण
करणे हाच तो हेतू.
६. हल्ला, प्राणत्याग. संहारक स्फोट यातूनही मागण्यांच्या संदर्भात प्रगती
होत नाही, असे ध्यानी आल्यानंतर आता या संघटनांनी आपल्या डावपेचात बदल
घडवला आहे. हा बदल स्पष्टपणे दाखवता येऊ शकतो तो मुंबईवर झालेल्या
हल्ल्यांतून. हा हल्ला अधिक धाडसी आहे, कारण तो एका महानगरीवर झाला आहे,
एका देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेला आहे. याआधी अशा हल्ल्याची रंगीत
तालीम बेस्लनमध्ये झाली होती. तेथे तुलनेने लहान अशा भागात हा हल्ला झाला
होता.
या सहाही मुद्यांमध्ये संघटना वेगवेगळ्या आहेत. पण त्यांचा एक सामायीक
हेतू आहे हे महत्त्वाचे आहे. या सामायीक हेतूतूनच या संघटना एकमेकांशी
जोडलेल्या आहेत. ही जोडणी स्पष्ट आणि व्यक्त नसली तरी, हेतूचा नीट अभ्यास
केला तर ती समोर येतेच.
धर्माचा आधार घेऊन या संघटनांची बाधणी होत असल्याने हा सारा प्रकार म्हणजे
इस्लामी दहशतवाद असे आजवर सारेच मानत आले आहेत. पण ते तितकेच आहे का?
किंवा खरोखर हा इस्लामी दहशतवाद आहे का?
समग्रपणे या प्रश्नाची हाताळणी करावयाची असेल तर विश्लेषण तेथेच न थांबवता
मूळ हेतूंपर्यंत गेले पाहिजे. तेथे ते गेले तर या प्रश्नांची उत्तरे
नकारार्थी येतात आणि मग एक भयंकर सत्य डोळ्यांपुढे उघड होते.
मूळ हेतू राजकीय आहे ("स्वातंत्र्य", "राष्ट्रउभारणी", "परकीय ताबा
संपवणे") हे ध्यानी घेतले तर त्याला असलेला धर्माचा आधार हा मुखवट्यासारखा
ठरतो. त्याचे कारण ज्या भागात हे हेतू साध्य करावयाचे आहे, तेथे त्या
धर्माचा समुदाय बहुसंख्य आहे. आणि तरीही त्या भागांत झालेल्या
हल्ल्यांमध्ये इतर धर्मांना 'लक्ष्य' करून काही झाल्याचे दाखले हा धार्मिक
लढा आहे असे सिद्ध करण्याइतपत मिळत नाहीत (लेबानानच्या आरंभीच्या काही
आत्मघाती हल्लेखोरांमध्ये तर ख्रिश्चन होते, असे पेप यांनी दाखवून दिले
आहे). लक्ष्य आहे ते प्रतिस्पर्धी देशांचे नागरिक किंवा सैन्य किंवा
राजकीय नेतृत्त्व. होणारा हल्ला त्यांच्या धर्माला लक्ष्य करून होत नाही
तर "राज्य" या संकल्पनेला लक्ष्य करून होत आहे. कारण आपल्या हेतूची
पूर्तता त्या घटकाकडून होणार आहे, याची पुरेपूर कल्पना या हल्लेखोरांना
आहे.
या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले
आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या
आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम
तयार झाला होता. आणि प्रश्न असा सोडवता येतो म्हटल्यावर त्याच्या मुळाशी
जाण्याची गरज वाटत नसतेच. भारतावरच नव्हे तर जगावर आलेल्या नव्या संकटाची
मुळे ही अशी आहेत. पण काय आहे हे नवे संकट?
-- पूर्वार्ध --