डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

(आधीच्या
भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे
आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा
विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा
प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...)

हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू.
१. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि
तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे
करावे लागत असे. या तिन्ही आघाड्यांवर असलेल्या मर्यादांमुळे अशा
हल्ल्यांमध्ये सातत्य राखणे या संघटनांना शक्य होत नसे. या संघटना
युद्धाला निघालेल्या आहेत आणि या युद्धाचे नियम वेगळे आहेत. पण युद्ध
म्हटले की सातत्यपूर्ण हिंसक दबाव हा आवश्यक असतो. तोच येथे साध्य होत
नव्हता.
२. याआधीचे हल्ले निष्प्रभ ठरण्याचे आणखी एक कारण आहे. हे हल्ले खरे तर
दहशत निर्माण करण्यासाठी केले जात होते, पण त्यातून त्या-त्या हल्ल्याच्या
घडीपुरती भीती निर्माण होत असे. त्यानंतर पुनश्च जनजीवन सुरळीत
झाल्यासारखे, बदलत्या परिस्थितीला सरावल्यासारखे होत असे (मुंबई
सावरण्याच्या किंवा तत्सम बातम्या पुरेशा बोलक्या ठराव्यात). तेव्हा दहशत
नाही, दहशत नाही म्हणून दबाव नाही, दबाव नाही म्हणजे हेतूंची पूर्तता नाही
या चक्रात ते सापडत.
३. या संघटनांचे नेतृत्त्व अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांनी प्राणत्यागासाठी
जमवलेले सारेच अनुयायी शिक्षीत आहेत. प्रचंड प्रमाणात निष्ठा हा त्यांचा
अनन्यसाधारण गुण आहे. हे सारे ध्यानी घेतले तर असे हल्ले करून ताकद वाया
घालवण्यात अर्थ नाही हे त्यांच्या ध्यानी आले असल्यास नवल नाही. त्यातून
मुंबईच्या हल्ल्यातून त्यांनी एका नव्या डावपेचाची उभारणी केली आणि तो आता
यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. बेस्लन आणि संसदेवरील हल्ला ही
त्यांच्यालेखी रंगीत तालीम असणार आहे. संसदेवरील हल्ल्याला भावनिक किनारच
अधिक होती, कारण तो मानबिंदूवरचा हल्ला ठरला. पण दहशत? ती काही त्यातून
म्हणावी तशी निर्माण झालीच नाही. कालच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबई
सुन्न होती ही बाब मात्र पुरेशी बोलकी आहे. हे या हल्ल्याचे 'यश' आहे. आणि
असे हल्ले हेच भविष्यातील हत्यार हे या संघटनांना आता समजून चुकले आहे.
हे नवे हत्यार म्हणजे प्राणत्यागास तयार असणाऱ्या अनुयायांना असे हल्ले
करण्यासाठी कोणत्याही भागात घुसवणे. एखाद-दुसऱ्या अनुयायाने जाऊन
बॉम्बस्फोट घडवत प्राणत्याग करावयाचा आणि आपण मरता-मरता समोरच्या शक्य
तितक्या अधिकाधिक लोकांना मारण्याची एक घटना घडवण्यापेक्षा हे हत्यार
प्रभावी आहे. या हत्याराचा जो वापर मुंबईत दिसला त्याला युद्धाची छटा आहे.
कारण येथे केवळ गोळीबार नव्हता. ग्रेनेड होते. ग्रेनेड फेकून स्फोट
घडवायचे आणि त्याच्या आडून गोळीबार. काश्मीरमध्ये घूसखोर घुसवण्यासाठी
वापरल्या जाणाऱ्या डावपेचाची आठवण आल्यास नवल नाही.
या हत्याराच्या वापराने केवळ सामान्य जनमानसातच नव्हे तर त्या-त्या
राज्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठी दहशत निर्माण करता येते हे स्पष्ट झाले
आहे. मुंबईच्या हल्ल्यानंतर सुन्न झालेले सरकार जागे होण्यास दुसऱ्या
दिवसाची दुपार उजाडावी लागली आहे. जागे झाल्यानंतरही सरकारच्या ध्यानी काय
आले तर आपली हतबलता. त्यामुळे नेहमीच्या इशारेबाजीपलीकडे काही विचार
जनतेसमोर मांडून तिला धीर देण्याचे काम झालेले नाही. दहशत हा
हेतूपूर्ततेचा एक मार्ग खरोखरच ठरू शकतो असे या संघटनांना आता वाटू लागले
तर त्यात नवल नाही. म्हणजेच आज मुंबईत जे धडले ते उद्या चेन्नईत घडू शकते,
कोलकत्यात घडू शकते. नव्हे समुद्र किनारा असलेल्या कोणत्याही शहरात घडू
शकते. दहा अनुयायी, खचाखच भरलेला दारूगोळा आणि एक अख्खे शहर वेठीला.
मरायचेच आहे, त्यामुळे बाकी काही तयारीची आवश्यकता नाही. समुद्री मार्ग हा
एक प्रकार. समुद्री मार्गाने येऊन कुठेही घुसून हा अंदाधुंद गोळीबार करीत
दहशत पसरवायची. दहशतीचा कालावधी वाढवण्यासाठी ओलीस धरायचे. किंवा काही
करून जनसामान्य या अंदाधुंदीत अडकून पडतील असे पहावयाचे.
हे नवे हत्यार थोडे पूर्वनियोजन केले तर प्रभावी ठरते. हे पूर्वनियोजन
बॉम्ब पेरण्याइतके सखोल गरजेचे नाही. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करणेच हेच
एक जोखमीचे काम असते. येथे ते नाही. तयार सामग्री घेऊन केलेला हल्ला असे
हे स्वरूप आहे. लक्ष्य, कालावधी, अनुयायी या तीन बाबी असतील तर शस्त्रे
पुरवणे, दारूगोळा पुरवणे सोपे ठरते. ग्रेनेडचा वापर असल्याने प्रभावक्षमता
वाढते. अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची
गरजच नाही.
मुंबईच्या हल्ल्यानंतर जवळपास प्रत्येक जण या हल्ल्यामागे अगदी तपशीलवार
तयारी कशी आहे याचे वर्णन करीत बसला आहे. ही तयारी असणे स्वाभाविक आहे हे
ध्यानी घेतले जात नाही, कारण हे युद्ध आहे हेच मुळात मनात रुजलेले नाही.
या हल्ल्यांना दहशतवादी हल्ला असेच मानले जाते. त्यामुळे मग त्यामागे
असलेल्या तयारीचाच विचार करण्यावरच अधिक भर असतो. ही इतकी तपशीलवार तयारी
आहे, कारण त्यांच्या लेखी हे युद्ध आहे. अशी तयारी न करता त्यांनी काही
केले तर ते फसतील इतकी ही साधी गोष्ट आहे. नुसतीच दहशत पसरवणे हा त्यांचा
हेतू नाही. दहशत हे एक टॅक्टिक आहे, एका व्यापक स्ट्रॅटेजीचे.
प्रतिस्पर्ध्यांसाठी काही पेनपॉईंट्स तयार करावयाचे आणि त्यातून त्यांना
जेरीला आणावयाचे ही त्यांची गरज आहे. कारण हे युद्ध आहे.
अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची
संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी
म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन
आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच
इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक.
साध्या भाषेत सांगावयाचे तर मुल्ला-मौलवी, अनेक देशांत कागदोपत्री
असलेल्या सरकारव्यवस्थेतील त्यांची प्रभावळ.
हे युद्ध आहे या वास्तवाचा स्वीकार केला तर त्याचा सामना करण्यासाठी
प्रतिपक्षालाही एक राजकीय उद्दिष्ट्य ठेवणे आवश्यक ठरते. अन्यथा युद्धाचा
सामना करणे शक्य होत नाही. या विशिष्ट परिस्थितीत राजकीय उद्दिष्ट्ये काय
असू शकतात? एक तर या शत्रूच्या राजकीय उद्दिष्ट्याला केवळ बळाच्या जोरावर
संपुष्टात आणणे किंवा दुसरे म्हणजे शत्रूच्या या राजकीय उद्दिष्ट्यांची
कारणेच संपवणे.
एखाद्या समुहाची राजकीय उद्दिष्ट्ये केवळ बळाच्या जोरावर संपवणे असेच
पहिले उद्दिष्ट्य ठेवून इराक, अफगाणीस्तान येथे कारवाई झाली. ती यशस्वी
झालेली नाही, कारण ती यशस्वी होत नसते. कोणत्याही समुहावर अशा स्वरूपात
राज्य करणे शक्य नसते. राजकीय उद्दिष्ट्ये तशी निकालात निघत नसतात. तसा
कोणताही प्रयत्न फसवा असतो. कारण हा वरवरचा उपाय असतो.
प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा
नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले
पाहिजे. तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित
सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ
राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या
जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो. आणि सध्याच्या परिस्थितीत
तरी ती तयारी कोणाचीच दिसत नाही.
भारतावर होणाऱ्या हल्ल्यांशी थेट संबंध असलेला देश म्हणजे पाकिस्तान. या
हल्ल्यांचे हत्यार विकसीत करणारे मेंदू त्या देशात आहेत हे खरे, पण ते
दडले आहेत ते पाकिस्तान "राज्य" (एक नेशनस्टेट या अर्थाने) या
मुखवट्याच्या आड. हा मेंदू तेथे आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. प्रश्न येतोय
तो मुखवट्याचा. त्याचे काय करावयाचे?
एकदा का प्रश्न येथे येऊन ठेपला की बाकी सारे पवित्रे निकामी ठरतात.
पाकिस्तानविरोधात युद्ध करावे वगैरे बाबी मूर्खपणाच्या ठरतात, कारण युद्ध
हे समोर असलेल्या शत्रूशी होत असते. येथे तसा शत्रूच नाहीच.
पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारून या समस्येचा बंदोबस्त होणार नाही, कारण
युद्ध करून पुढे काय? युद्धात विजय मिळवून तेथे राज्यव्यवस्था साकारण्याचे
आव्हान केव्हाही सोपे नसते आणि नाही. कारण तसे करून तेथील इतर घटकांनाही
वैरी बनवले जाण्याची प्रक्रिया होत असते. इराक-अफगाणिस्तानात अशा
प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही. ते देश स्थिर झाले आहेत असा दावा करणे
तर मूर्खपणाचे आहे. म्हणजे अशा राजकीय उद्दिष्ट्यावर आधारलेल्या युद्धाचा
पर्याय संपतो. राहते काय?
(या प्रश्नाचे उत्तर जाहीरपणे देता येणार नाही).
अशा स्थितीत या विषयाकडे एकेका विशिष्ट देशाचा प्रश्न म्हणून किती काळ
पहात रहावयाचे? भारतावर काल झालेल्या हल्ल्याचे राजकीय संदर्भ थेट
आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. हो, काश्मीर हा त्यातला एक मु्द्दा आहे. पण
त्या हल्ल्यामागे असलेल्या ताकदींचे इतर हेतू आहेतच. ते म्हणजे त्यांच्या
मायभूमीचे स्वातंत्र्य. त्यात इराक आहे, अफगाणिस्तान आहे. मक्का-मदिनाही
आहे. कारण सौदी अरेबिया खऱ्या अर्थाने स्वयंशासीत आहे असे या संघटना मानत
नाहीत आणि त्यात काही अंशी तथ्यही आहे. इस्लामी बहुसंख्य अशी बहुतेक
राष्ट्रे आखातात असणे, तेथे तेलाचे साठे असणे आणि तेथील सरकारे
अमेरिकेच्या अंकीत असणे ही मांडणी नवी नाहीच.
म्हणजेच, हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न आहे आणि आंतरराष्ट्रीय
समुदायाने या मेंदूचा बंदोबस्त केला पाहिजे. तो करावयाचा असेल तर आधी
मुखवट्याचा फैसला करावा लागेल. हा असा डावपेच ठरवण्यासाठी काय करावे लागेल?
-- पूर्ण --