॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी १

॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग-४ पैकी १

परंपरागत प्रातस्मरण रोज सकाळी उठून म्हटल्याने आपल्याला आपल्या वारशाची, संस्कृतीची आणि कर्तव्यांची जाणीव दिवसाच्या सुरूवातीलाच होऊन आपण कर्तव्यपूर्तीकरता दैनंदिनीचे नियोजन करू शकतो. याकरता भारतीय परंपरेत पहाटेसच उठून प्रातःस्मरण म्हणण्याची प्रथा होती. आज ती नामशेष झालेली आहे. मीही पूर्वी (लहान असतांना) प्रातस्मरण म्हणत असे.

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती । करमूलेः तु गोविंदः प्रभाते करदर्शनं ॥

म्हणजे

बोटांवर नांदते लक्ष्मी, तळहाती सरस्वती । मनगटी नांदतो ईश, (हाताचे) पहाटे कर दर्शन ॥

या श्लोकाने सुरूवात होणारे अठरा वीस श्लोकांचे ते पूर्ण प्रातस्मरण होते. आज ते आठवणारे आणि म्हणणारेही मोजकेच असतील. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परंपरागत प्रातस्मरणात अर्वाचीन भारतातील संस्मरणीय आभूषणांची भर घालून केलेले प्रातस्मरण संघाच्या प्रभातशाखांवर आजही म्हटले जाते. त्याकाळी त्या प्रातस्मरणास, संघात भारतभक्तीस्तोत्र म्हणत असत. हल्ली एकात्मता स्तोत्र म्हणतात. हे नावच आजच्या त्याच्या स्वरूपास जास्त शोभून दिसते. मी संघाचा प्रचारक नाही. मात्र प्रातस्मरणाची आवश्यकता जाणवलेला भारतमातेचा पुत्र आहे. पूर्वी जेव्हा मी संघाच्या प्रातस्मरणातील आभूषणांच्या वैशिष्ट्यांचा शोध घेतला होता तेव्हाच, त्याचा अर्थ माझ्यापुरता पुनर्संकलित केला होता. ते प्रातस्मरण आणि त्याचे ते अर्थशोधन इथे देत आहे. ज्यांचा याच्याशी कधीच संबंध आलेला नव्हता त्यांनी हे पूर्वग्रहविरहित दृष्टीने वाचून त्याची उपयुक्तता ठरवावी. जे त्याचेशी पूर्वपरिचय राखतात त्यांना कदाचित हे अर्थशोधन नवे वाटू शकेल.

निसर्गतःच आपल्याला निरागसतेची आवड असते. जे प्रकृतीनी सुंदर असेल, प्रचितीनी विलोभनीय असेल त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली जाते. ते हवेहवेसे वाटते. एखाद्या मोहक देखण्या हावभावाचा आपल्यावर एवढा प्रभाव पडतो की आपल्याही नकळत आपण त्याचे अनुकरण करू पाहतो.

चांगल्याचे अनुकरण करण्याची ओढ मनुष्याला जीवनहेतूच्या निकट नेत असते. मग निर्माण होते कुतुहल. की खरंच, जीवनाचा हेतू काय असावा? आपल्याला सुष्ट आणि दुष्ट आविष्कार ओळखता का येतात? सुष्ट आविष्कारच का आवडतात? अनादी कालापासून मनुष्याला हे कोडे कुतुहलाचे ठरलेले आहे. पूर्वसुरींनी आपापल्या परीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. परिसरातील चराचरांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि सृजनाचे गूढ उलगडता उलगडता संस्कृती उदयास आली.

मानवी मन मुळातच संवेदनाशील असते. सुष्टप्रिय असते. सत्यशोधक असते. समाजशील असते. ते तसेच का असते? हा प्रश्न मनुष्याला प्रवृत्त करतो. स्फुरण देतो. चेतवतो. अशाचप्रकारे उत्स्फूर्त होऊन पूर्वसुरींनी ज्या संस्कृतीला जोपासले, तिची उपासना व संस्मरण आपलाही मार्ग खचितच प्रशस्त करू शकेल. ज्या चराचरांनी त्यांना घडवले त्यांचे स्मरण आपल्यालाही प्रेरक ठरू शकेल. या विश्वासातूनच प्रातःस्मरणाचा जन्म झाला. भारतभक्तीस्तोत्राची रचना झाली. मनुष्यस्वभाव समाजशील असल्यामुळे आणि भाषा हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असल्यामुळे, स्वतःस झालेले परिस्थितीचे दर्शन/आकलन निकटवर्तियांस अनुभूत करून देण्यात त्याला आनंद वाटतो. त्यामुळे स्वभावतःच भाषा ही वर्णनाचे साधन ठरते. एक असते गुणवर्णन आणि दुसरे असते दोषदर्शन. अन् निंदा ही अनिष्टकारक असल्याचे सर्वमान्यच असल्याने, चांगुलपणाची स्तुती हा अभिव्यक्तीचा सुसंस्कृतपणा समजला जाऊ लागला. मग जन्माला आली ती स्तोत्रे. देवदेवतांची स्तवने. राजेरजवाड्यांची प्रशंसागीते. सृष्टीसौंदर्याची वर्णने आणि अशाच असंख्य रचना. निंदानिर्मित अनिष्टांपासून मानवतेचे रक्षण करणारी अभिव्यक्ती हीच या सर्व स्तोत्रांची प्रेरणा असल्याचे दिसून येते. त्यातून हे स्तोत्र तर जीवनहेतूच्या एवढे जवळ नेणारे आहे. आपले आयुष्य जर उन्नत करायचे असेल तर आपण हे स्तोत्र मुखोद्गत केलेच पाहीजे. एवढेच नव्हे तर समजून उमजून त्याचे मननही केले पाहीजे.

प्रस्तुतचे लेख हे एकात्मता स्तोत्राला उमजून घेण्याचा एक बाळबोध प्रयत्न आहे. चला आपण त्यात सहभागी होऊ या.