॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी २

॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी २

जमीन कसदार असेल तर पीक मोत्यांचे येते. त्यातून, ज्या भरतभूमीला नररत्नांची खाण म्हणून गौरवले जाते, त्या भूमीचा कस तो काय वर्णावा. त्या वतनभूचे, तिच्यात अंगभूत असलेल्या पंचमहाभूतांचे, तिच्या पर्वतनद्यादी आभूषणांचे आणि एकूणच साऱ्या पार्श्वभूमीचे स्तवन सुरूवातीच्या काही श्लोकांतून केलेले आहे.

जी भरतभू सुजल श्यामल आणि शस्य, शोभे समुद्रवलयांकित जी प्रशस्त ।
आभूषणे स्मर तिची तव मानसात, तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥

ही आपली मातृभूमी आहे. ते दगड. ती माती. ती हवा. ते पाणी. या साऱ्यांचे बनलेले खण्डहर म्हणजे ती नव्हे. ती आहे विश्वमांगल्याची चिरंतन ज्योत. सर्व पंचमहाभूतांची अभेद्य संघटना. संघ. त्या आनंदमयी मातेस प्रथमतः वंदन!

ओम् नमः सच्चिदानंदरूपाय परमात्मने ।
ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये ॥ १ ॥

सर्व ग्रहनक्षत्रे, ही सृष्टी, हा परिसर आकाशपाताळादी सर्व लोक व त्यांना बंधनात ठेवणाऱ्या दशदिशा आणि काळ हे आम्हा सर्वांचे नेहमी कल्याण करोत.

प्रकृतिः पंचभूतानी ग्रहलोका स्वरास्तथा ।
दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वंतू मंगलम् ॥ २ ॥

समुद्रवसना भारतमातेला देवतात्मा हिमालय मुकुटाप्रमाणे शोभून दिसतो. ऋषी, महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी आदी महापुरूषांच्या अशा या महन्मातेला आमचे प्रणाम असोत.

रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटीनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारतमातरम् ॥ ३ ॥

उत्कलप्रदेशाचे भूषण असलेला आणि महर्षी परशुरामाचे कायमचे निवासस्थान असणारा महेंद्र पर्वत, दक्षिण भारताचे भूषण ठरणारा निलगिरी (मलयगिरी) पर्वत, स्वातंत्र्याची मंगल लेणी ठरलेले कोटकिल्ले अंगाखांद्यावर बाळगणारा सह्याद्री पर्वत, देवदेवतांची तीर्थक्षेत्रे असल्यामुळे गौरव पावलेला हिमालय पर्वत, वनराज सिंहांचे वसतीस्थान असणारा रैवतक (गिरनार) पर्वत, वयोवृद्ध गिरीराज विंध्याचल तथा महाराणा प्रतापांची आठवण देणारा अरवली पर्वत हे सर्व संस्मरणीय आहेत.

महेंद्रो मलय सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारवलिस्तथा ॥ ४ ॥

लोकमाता गंगा, विद्यादेवी सरस्वती, आर्यसंस्कृतीची आद्य पोषणकर्ती सिंधू, ईशान्य भारताची जीवनसरिता ब्रह्मपुत्रा, गंगेची पुष्टीवर्धिनी गण्डकी, दण्डकारण्यातील अक्षयसरिता कावेरी, कृष्णकन्हय्याची यमुनामय्या, स्फटिकप्रस्तरांतून झेपावणारी रेवा (नर्मदा), कृष्णप्रस्तरांत शोभून दिसणारी कृष्णा, दक्षिणगंगा गोदावरी तसेच विंध्यकुमारी महानदी ह्या नद्या आपले जीवन सरस करतात. समृद्ध करतात. म्हणूनच त्यांचेही स्मरण आपणांस प्रेरक आहे.

गंगा सरस्वती सिंधुब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ॥ ५ ॥

वसली अनेक नगरे वसले प्रदेश । स्फुरली अनेक शास्त्रे स्फुरलेही धर्म ॥
त्यांचा समग्र महिमा धर मानसात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥

संस्कृतीचा उदय आणि उत्कर्ष जिथे झाला, ती तीर्थक्षेत्रे संस्मरणीय आहेत. सुसंस्कृत आचरणाचे नियम म्हणजेच धर्मशास्त्रे. त्यांचा विकास कसा झाला, त्यांची निर्मिती कशी झाली ह्याची आठवण प्रेरणादायी ठरते. एवढेच काय पण त्यांचे नामस्मरणही मनाला उभारी आणते.

रामजन्मभूमी अयोध्या, कृष्णजन्मभूमी मथुरा, पहाडी प्रदेशातून सखल प्रदेशात गंगावतरण होते ते हरिद्वार (मायापुरी), देवाधिदेव महादेवाचे निवासस्थान काशी, परंपरागत विद्यानगरी कांची, सम्राट विक्रमादित्याची राजधानी उज्जैन (अवंतिका), जगन्नाथाची रथयात्रा आजही चालवणारी जगन्नाथपुरी (नीलांचल), पाणिनी अन् कौटिल्यल्यकालीन विश्वविद्यालय तक्षशीला, तसेच भगवान बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती गया यांचे स्मरण आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देते.

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ॥ ६ ॥

गंगा यमुनेच्या पवित्र संगमाचे स्थान प्रयाग, सम्राट चंद्रगुप्ताची राजधानी पाटलीपुत्र, कृष्णदेवरायाची राजधानी विजयानगर, पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ, गौरवशाली इतिहासाचे सोमनाथ आणि अमृतसरोवरवेष्ठित हरमिंदरसाहेबांचे पवित्र मंदिर असलेले अमृतसर यांचे स्मरण आपल्याला आपल्या प्रेरणांचे दर्शन घडवते.