संघटनापालट

निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राजच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. पण दिवसभर शुभेच्छांचे फोन, प्रत्यक्ष भेटी, पत्रकार परिषद यामुळे तो थोडा थकलेला होताच.
रात्री साडेसातच्या सुमारास त्याने आपल्या सचिवाला बोलावले.
"हे बघ, आता मला कोणाचे फोन देऊ नकोस. मी कुणालाही भेटणार नाहीये. आराम करतो जरासा. कळलं का? ''
राजसाहेबांचा आदेश घेऊन सचिव मान डोलावून निघून गेला...
राज दिवाणखाण्यात आला. त्यानं सोफ्यावर अंग टाकून दिलं. समोर वडील आणि काका यांचे फोटो होतेच. ते दोन्ही फोटो न्याहाळताना त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
"बाबा असते तर, त्यांना आज किती आनंद झाला असता. ''
राज स्वत:शीच पुटपुटला. त्याचं बोलणं ऐकून वहिनीसाहेब अंत:पुरातून बाहेर आल्या. राज काकांच्या फोटोकडे टक लावून पाहात होता.
वहिनीसाहेबांनी हलक्या आवाजात विचारले,
"थकलात का जास्त? चहा देऊ का करून. बरं वाटेल जरा. ''
"नको. '' काकांच्या फोटोकडे पाहातच राज उत्तरला.
"आज आनंदाचा दिवस आहे. तुम्ही आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज झालेय. असं तोंड सोडून बसू नका. थोडं फ्रेश व्हा. मी गरम गरम स्वयंपाक करते. खा आणि निवांत झोपा. '
वहिनीसाहेबांनी राजची नाराजी ओळखली होती. बाबा आणि काकांची पोकळी राजला अस्वस्थ करीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणूनच त्यांनी वातावरण हल्कं करण्याचा प्रयत्न केला होता.
"नाही गं. मी तोंड वगैरे सोडून बसलेला नाहीये. आज जरा पोकळी जाणवतेय जास्त. माझं यश पाह्यला बाबा नाहीत आणि माझ्या पाठीवरून हात फिरवायला.... ''
अर्धवट वाक्य बोलून राज थांबला. त्याच्या डोळ्यातील एक अश्रू अलगद गालावर ओघळला.
"अहो, तुम्ही मैदान गाजवलंय. यश तुमच्या पदरात पडलय. आता असे हळवे का होताय? '' वहिनीसाहेबांनी समाजवण्याचा प्रयत्न केला.
"हेच माझं हळवेपण अनेकांना कळलेलं नाही. ''
राजची नजर अजूनही काकासाहेबांच्या फोटोवरच होती.
राज हळवा झाल्याने वहिनीसाहेबांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. ओढणीच्या कडांचा बोळा करून त्यांनी डोळ्याला लावला.
"असो जाऊदेत. तू काही मनावर घेऊ नकोस. आणि हो. स्वयंपाक करू नकोस. थोडं उशिरानं बाहेरच जाऊ जेवायला. मुंबईत यशाचा जल्लोष सुरू असेल. आताच बाहेर पडलं, तर पंचाईत. ''
वहिनीसाहेब "बरं' म्हणून आवरण्यासाठी निघून गेल्या.
राज थोडा सावरून बसला. टिपॉयवरील पाकिटातून एक सिगारेट काढून त्यानं शिलगावली.
लाईटर टिपॉयवर ठेवत तो उठला आणि कॅसेट-सीडींच्या रॅककडे वळला. त्यातील एक सीडी काढून त्यानं प्लेअरमध्ये टाकली.
उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या...
या गझलेचे सूर दिवाणखाण्यात दरवळत असतानाच दारावर टकटक झाली.
राजचा मोबाईल घेऊन सचिव दिवाणखाण्यात आला. ""साहेब फोन येतोय सारखा. ''
"अरे मी तुला सांगितलं ना. मला कुणाचे फोन देऊन नकोस म्हणून. ''
"नाहीऽऽऽ पणऽऽऽऽसाहेब... हा फोन तुमच्याकडेच ठेवा. ''
"बरं. ठेव तिथे. आणि तू घरी गेलास तरी चालेल. ''
एक शब्दही न बोलता मोबाईल टीपॉयवर ठेवून सचिव चालता झाला.
जरावेळानं पुन्हा रिंग वाजली. त्यामुळं राजनं सीडी प्लेअर बंद केला आणि तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. हा फोन त्याला टाळता येणार नव्हता. सिगारेट ऍश ट्रेमध्ये विझवून त्यानं फोन रिसिव्ह केला.
"राज मी बोलतोय. अभिनंदन बाळा तुझं. ''
पलिकडचा आवाज काकांचा होता.
"तुझं यश पाहून मला मनापासून आनंद झालाय. ''
हे शब्द ऐकताच राज यांचा कंठ दाटून आला. आवंढा गिळतच त्याने "धन्यवाद' म्हटले.
"ते काही नाही. तू आज घरी जेवायला ये. आणि जोडीनं या. ''
"बरं. '' एवढचं म्हणणं राजच्या हातात होतं. मोबाईल टिपॉयवर ठेवताना त्यानं वहिनीसाहेबांना हाक मारली.
"ए ऐकलंस का. बाहेर ये जरा. ''
"आले आले. '' केसांचा बो बांधतच लगबगीनं त्या दिवाणखान्यात आल्या.
"अगं काकांचा फोन आला होता. ''
"कायऽऽऽ काकांचा फोन? काय म्हणाले ते? '' वहिनीसाहेबांनी आश्चर्य व्यक्त केलं.
"त्यांनी जेवायला बोलावलय आपल्याला. आणि आपण जाणार आहोत तिकडे. ''
"मी तयार आहे. तुम्हीच आवरून घ्या. ''
"बरं बरं. मी आवरतो पाच मिनिटात. माझ्या एक ड्रेस तेवढा काढून ठेव पटकन. ''
वहिनीसाहेबांना सूचना देऊन राजनं बाथरूमकडे मोर्चा वळवला. पाच मिनिटात अंघोळ उरकून राज पुन्हा दिवाणखान्यात आला. सोफ्यावर ठेवलेल्या ड्रेसची परिटघडी त्यानं उलगडली. काही वेळात तो तयार झाला.
ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन त्यानं इंपोर्टेड अत्तराचे दोन फवारे शर्टवर मारले आणि गाडी गॅरेजमधून बाहेर काढण्यासाठी तो निघून गेला.
त्याच्यामागोमागच वहिनीसाहेब बाहेर आल्या. मुख्य दरवाजाला त्यांनी कुलूप लावलं आणि चावी पर्समध्ये टाकली. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. फोनवर बोलतच त्या गाडीत बसल्या. गाडी मार्गस्थ झाली.
---
राज यांची गाडी काकांच्या महालाच्या अंगणात दाखल झाली. राज यांना पाहून सुरक्षा रक्षकांचा ताफ्याने उभं राहून सलाम केला.
पोर्चच्या पायऱ्या चढून राजने महालात प्रवेश केला. तर स्वागतासाठी समोर दस्तुरखुद्द काकाच उभे. मदतनीसाचा आधार घेऊन ते दरवाजापर्यंत आले होते. आपल्या विठ्ठलाला पाहून राज सुखावला. त्यानं आणि वहिनीसाहेबांनी त्यांना वाकून नमस्कार केला.
राजच्या दोन्ही खांद्यांना धरून काकांनी त्याला जवळ घेतले.
"यशस्वी भव. खूप मोठा हो... चल आत चल. ''
काकांनी राजचा हात घट्टपणे हातात धरला होता. त्याचा आधार घेत ते चालू लागले. मागे वहिनीसाहेब आणि काकांचा मदतनीस होताच.
सर्वजण महालाच्या भव्य दिवाणखान्यात आले. राजने काकांना हलकेच सिंहासनवजा खुर्चीवर बसविले.
नंतर तो आणि वहिनीसाहेबही सोफ्यावर विराजमान झाले....
(क्रमश:)