संघटनापालट-३

जेवण घेऊन काका पुतणे दोघेही पुन्हा दिवाणखान्यात येऊन विसावले होते.
---
"राज, मला या सगळ्या गोष्टींचा आता तिटकारा आलाय. माझ्या आयुष्यात मी कधीच वजाबाकी केली नाही. माझा जो काही निर्णय असे तो सर्वांच्या हिताचाच असे. माझ्या हिताला मी कधीही प्राधान्य दिलं नाही. पण या उतारवयांतच मला काही कटू आणि मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागलेत. त्यामुळे तुझ्यासारखी माणसे मला दुरावली. मी उभं केलेलं वैभव लयाला जात आहे. हे माझ्या डोळ्यासमोर घडते आहे आणि मी काहीच करू शकत नाही. याचं अतीव दु:ख होतंय. यानंच मी खचून गेलोय. या ढाण्या वाघाचा आवाज आता पार बसलाय. डरकाळी फोडण्याची इच्छा होते; पण ती तोंडातून बाहेर पडत नाही. असं का होतय कोण जाणे. दादूची मला भीती वाटू लागलीय. राज, कुणाची भीती बाळगणं मला बाप जन्मात शक्य झालय नाही. आताही असह्य होतंय हे सगळं. कधी कधी विचार करतो, ंहे भोग तर नाहीत ना आपले. आपण गप्प राहिलो म्हणून इतरांचं फावलं. मला मोठं करणारी माणसं दुरावली गेली. माझ्या चुकांमुळेच मला असे दिवस पाहावे लागत असावेत. ''
काकांची उद्विग्नता बाहेर पडत असतानाच दादूनं दिवाणखाण्यात डोकावलं आणि तो झरकन निघून जाऊ लागला. काकांच्या हे लक्षात आलं त्यांनी दादूला हाक मारली. तो दिवाणखान्यात येऊन उभा राहिला.
"बस. राजच्या शेजारी बस. '' त्यांनी फर्मावलं.
राज बसलेल्या सोफ्यावर दादू बसला पण त्यांन बसताना राजपासून बरच अंतर राखलं होतं. काकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांना दादूचा प्रचंड संताप आला. त्यांची उद्विग्नता बाहेर पडतच होती.
"राज मी चुकलो आहे. मी काय करावं असं तुला वाटतं. ''
राजला हा प्रश्न अनपेक्षित होता. दादूही वडिलांच्या या वाक्यानं गोंधळून गेला. थोडा वरमला.
"काका, या वयात आता त्रास करून घेऊ नका. उर्वरित आयुष्य आनंदानं जगा. ''
"हा आनंदच माझ्या आयुष्यातून पार निघून गेलाय रे.. '' दादूकडे पाहात काका बोलले.
राजला नेमके काय बोलावे ते कळेना. तरीही त्यानं काकांना सावरण्याचा ्प्रयत्न केला.
"त्रास नका करून घेऊ. या वयात अशी अस्वस्थता चांगली नाही. ''
"नाही. माझ्या चुकांचं परिमार्जन मला करायलाच हवं. म्हणूनच मी बोललो. बोलणारेय आणि आता निर्णयही घेणार आहे. राज, हा प्रासाद आता आम्हाला तुरुंग वाटू लागलाय. ना इथ आनंद आहे, ना स्वातंत्र्य. आम्हांला काही काळ आता मुक्तपणे जगायचंय. तू मला इथून घेऊन चल राज. ''
वडिलांच्या या आवेशामुळे दादू धास्तावला.
"बाबा, काय बोलाताय तुम्ही. '' दादूच्या तोंडून शब्द बाहेर पडले. पण ते काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
"तू आता गप्प राहा. '' एवढे बोलून काकासाहेब सिंहासनवजा खुर्चीवरून उठले. राजजवळ आले. त्याचा हात धरला आणि दरवाजाकडे हात करीत म्हणाले.
"चल राज. आपल्याला निघायचंय. मी आता तुझ्याचकडे राहणार आहे. ''
काकांच्या अशा बोलण्यामुळे राज अचंबित झाला होता. काकांचा हात धरून तो उभा राहिला.

काकांनी पहिलं पाऊल दरवाजाकडे टाकलं...
राजचा आधार होताच त्यांना.....
समाप्त!