ऑक्टोबर ११ २००४

र्‍हस्व दीर्घ विचार

संस्कृतमधील काही शब्द मराठीत तसेच्या तसे वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.

उदा : कवि मति

१. मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.

उदा : कवी, मती,गुरू

२. इतर शब्द दीर्घान्ती लिहावेत.

उदा : विनंती,पाटी,जादू
अपवाद : आणि,नि

३. परंतु, यथामति तथापि इत्यादी तत्सम अव्यये हस्व लिहावीत. तसेच सामासिक शब्दामधे जर दीर्घान्त तत्सम शब्द आला असल्यास तो मूळ शब्दाप्रमाणे लिहावा.

उदा :

बुद्धी बुद्धिवैभव
कवी कविमन
अणू अणुशक्ती
विधी विधिनिशेष
वस्तू वस्तुस्थिती
शक्ती शक्तिमान
गती गतिमान

४. वधूवर मधे वधू दीर्घान्तच लिहावा
५. व्यक्तीनामे, ग्रंथनामे शीर्षके आणि सुटे र्‍हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावे.

उदा : हरी, भवभूती, कुलगुरू

६. विद्यार्थिन्, गुणिन् यासरखे इन् अन्ती शब्द मराठीत लिहिताना
त्यांच्या शेवटी असलेला न् लोप होतो आणि उपान्त्य र्‍हस्व अक्षर दीर्घ होते.

उदा : विद्यार्थी, प्राणी, पक्षी,स्वामी

७. हेच शब्द समासात पूर्वपदी आले असता ते मूळ शब्दाप्रमाणे लिहावेत.

उदा : विद्यार्थिमंडळ, गुणिजन, मन्त्रिमंडळ

८. दीर्घ ईकारान्त आणि ऊकारान्त शब्दातील उपान्त्य इकार
आणि उकार र्‍हस्व लिहावेत.

उदा : गरिबी,माहिती,हुतुतू
अपवाद : नीती, कीर्ती, भीती, रीती, प्रीती, दीप्ती, विभूती, ऊर्मी

९. याचप्रमाणे अकारान्त, ओकारान्त आणि एकारान्त शब्दांनाही लागू होतो.

उदा : पाहिले, मिळवितो

१०. पण हाच नियम तत्सम शब्दांना लागू होत नाही

उदा : ऊर्जा, ऊष्मा, पूजा, परीक्षा, प्रतीक्षा

११. अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार आणि उकार दीर्घ लिहावे.

उदा : गरीब,वकील,सून,वीट, भरीव, कूल,चूल, फकीर, हुरूप
अपवाद : गुण, विष, मधुर, प्रचुर, मनुष्य, विपुल,अंकुर,अद्भुत, विधुर, जटिल, मलिन, कुटिल, साहित्य, मंदिर,जीवित,शारीरिक,मानसिक

१२. मराठी शब्दातील अनुस्वार विसर्ग आणि जोडाक्षर यांच्या पूर्वीचे
इकार उकार सामान्यत: र्‍हस्व असतात.

उदा : भिंग, पिंप, नारिंग, नि:पक्षपातीपणे, छि:, थु:, विस्तव, मुक्काम

१३. परंतु तत्सम शब्दात ते मुळाप्रमाणे हस्व किंवा दीर्घ लिहावेत.

उदा : तीक्ष्ण, वरिष्ठ, पुण्य,पूज्य


टीप : येथील मजकूर सुखदा ह्यांनी मायबोली येथे लिहिलेल्या अनेक लेखांच्या आधारे त्यांच्या सहमतीने तयार केलेला आहे.

Post to Feed
Typing help hide