दुचाकी वाहने - आठवणीतली (भाग १)

माझ्या आठवणीतले पहिले दुचाकी वाहन म्हणजे सायकल. शहरी मध्यमवर्गीय (खरे तर कनिष्ठ-मध्यमवर्गीय ) घरात साठच्या दशकात जन्मलेले कुणीही यापरते काय लिहिणार म्हणा. आता 'सायकल'ला 'वाहना'चा दर्जा द्यावा की नाही हा प्रश्न पडू शकेल कुणाला. पण ते 'साठचे दशक' होते. कोल्हापूरला तेव्हा महानगरपालिका वा नगरपालिका नव्हती, तर नगर परिषद होती.  म्युनिसिपल कौन्सिल. आणि शहरातल्या प्रत्येक सायकलीला ही नगर परिषद तेव्हा एक क्रमांक देत असे. आमच्या सायकलीच्या किल्लीच्या नेढ्यात एक लंबगोलाकार पितळी कडी होती, आणि त्यात "को. म्यु. कौ.  २१४७" अशी अक्षरे अल्युमिनियमच्या चकतीवर लाल अक्षरांत उमटलेली आठवतात.

त्या सायकलवर माझ्यासाठी पुढच्या दांडीवर एक बाळबैठक बसवलेली होती. त्यावर बसून हिंडल्याचे थोडेसे आठवते.

त्यातल्यात्यात स्पष्ट आठवण एकच. एकदा अप्पा नि मी गावातून राजारामपुरीत परतत होतो. सोबत अण्णाकाका होते. अण्णा हे अप्पांचे घनिष्ट मित्र नि मानलेले भाऊ. एरवी अप्पा कुणाबरोबर फारसे बोलत नसत, पण अण्णाकाकांसोबत त्यांची चांगलीच जोडी जमे. अण्णाकाकांकडे त्या दिवशी सायकल नव्हती, त्यामुळे ते दोघे बोलत बोलत चालत होते. अप्पांनी मला पुढच्या बाळबैठकीवर बसवले होते. त्यांच्या गप्पा रंगात आल्या आणि मी हाक मारली, "अप्पा". "मोठी माणसं बोलत असताना मध्येमध्ये बोलायचं नाही हे माहीत्ये ना? गप्प बस बघू देवासारखा" (देव हा मुका असतो असे मानण्याची तेव्हा प्रथा होती) असे मला दटावून अप्पा नि अण्णाकाका परत गप्पांत गुंगले. मी परत हाका मारून बघितल्या, पण प्रतिक्रिया तीच आली. आणि दुसऱ्या वेळेला जरा जास्त तिखट स्वरात आली. मुकाट बसलो.

घरी पोचल्यावर अप्पांच्या लक्षात आले आणि त्यांनी विचारले, "तुझी चप्पल रे कुठे पडली उजव्या पायातली?" मग मी उत्तरलो "अप्पा,  ती पडल्ये हे सांगायला तुम्हांला हाक मारली तर तुम्हीच म्हणालात गप्प बस म्हणून." अप्पा देवासारखे गप्प बसले.

मी पहिलीत जातो न जातो तोच अप्पांची बदली कोल्हापुरातून मिरजेला झाली. खरे तर सांगलीला, पण का कुणास ठाऊक, अप्पांनी राहण्यासाठी मिरजेच्या किल्ल्यातले घर निवडले. 'चिंतामणराये वसविली,  सांगली ती चांगली' इ घोषवाक्यांचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. मिरजेपेक्षा सांगली कोकणाला (थोडेसे का होईना) जवळ हेही त्यांनी लक्षात घेतले नाही. ते घेतले असते तर बरे झाले असते असे मला नंतर मी एकटा सांगलीला गेल्यावर वाटले. सांगलीचा किल्ला हा मिरजेच्या किल्ल्यापेक्षा खूपच मर्यादशील, आटोपसूत आणि स्वच्छ होता. पण अप्पांसमोर तेव्हा कोण बोलणार?

अप्पा रोज सांगलीला जाऱ्ये करत. त्यांना प्रमोशन का कायसे मिळाले होते, त्यामुळे ते बँकेची 'जावा' मोटरसायकल वापरू लागले.

ती मोटरसायकल बरीच लहरी होती. त्यामुळे हपिसात जायच्या वेळेस अप्पा मन लावून तिला लाथा घालताहेत, आणि ती बधायला जाम तयार नाही, हे दृष्य बऱ्याच वेळेस दिसत असे.

त्या मोटरसायकलवरून हिंडण्याचे सुख फारसे लाभले नाही. अप्पा रोज घरी यायलाच दिवेलागण होऊन जाई. आणि जे काही बाहेर पडायचे असेल ते दिवसाउजेडी हा नियम पाळण्याचा तो काळ होता.

एवढे आठवते की ७२ च्या दुष्काळात जेव्हा पाणी अगदीच नाहिसे झाले तेव्हा अप्पा नि आई त्या मोटरसायकलवरून म्हैसाळ की कुठेशी जाऊन पाणी आणत. आई मागे बसे, तिच्या कमरेवर घागर असे. दुष्काळातही म्हैसाळला कुठून पाणी मिळे कुणास ठाऊक.

मिरजेला असताना मी सायकल 'चालवायला' शिकलो. 'चालवायला' म्हणजे लहान बाळाला आपण 'चालवतो' तसे. सायकलची सीट माझ्या खांद्याहून जराशी खाली येई. सीट बगलेत धरून आणि दोन्ही हात जेमतेम हँडलपर्यंत पोचवून मी सायकल 'चालवत' असे.

एकदा रस्त्यात मला अख्खे पाच पैसे सापडले. त्या पाच पैशांचे काय करायचे याबद्दल मी नि तत्कालीन मित्र उमेशने गहन विचार केला. पाच पैशात त्या काळात कितीतरी गोष्टी येत असत. एक अख्खे आईसफ्रूट मिळे. पार्लेचे 'किस्मी' चॉकलेट मिळे. नि 'घेवारे सायकल मार्ट'मध्ये तासभर सायकल भाड्याने मिळे. शेवटची माहिती ऐकीव होती. घरामागचे गोलंदाजकाका कधीमधी अपरात्री "घेवारेकू सायकलके तासभरके पाच पैशे देके तेरेको सांगलीकू पौचाता मै" अशी धमकी त्यांच्या सांगलीत माहेर असलेल्या बीबीला खणखणीत आवाजात देत असत.

उमेश माझ्याहून चार बोटे उंचीला कमी होता, त्यामुळे सायकल 'चालवण्याचा' आनंद काही त्याला लुटता येत नव्हता. पण माझा कल सायकल 'चालवण्या'कडे झुकतो आहे म्हटल्यावर त्याने 'मग माला मागच्या क्यारियरवर बशीव' असा हट्ट धरला. ते कितपत जमेल हे माहीत नसताना मी त्याला होकार देऊन टाकला. पुढच्या आयुष्यात पाचर उपटणाऱ्या वानराचा मी वंशज असल्याचे सिद्ध करण्याची जी धडपड मी केली त्याला हे सुसंगत होते.

पण दोन पोटाएवढ्या उंचीची मुले सायकल भाड्याने घ्यायला आलीयत म्हणताना घेवारेकाकांनी आमच्याकडे नीट निरखून पाहिले. मग चष्म्याला दोन्ही बाजूला बांधलेल्या दोऱ्या दोन्ही कानांत (त्यांच्या) अडकवून परतून पाहिले. आणि "सायकल घेण्यापरीस
आईसफ्रूट चोख की रे" म्हणून हाकलले.

मला मुकाट्याने उमेशबरोबर एक आईस्फ्रूट चोखायला लागले. उंचीला कमी असला तरी उमेशचे तोंड चांगलेच ताकदवान होते. मला जेमतेम पाव कांडी मिळाली.

आणि एकदा मी सायकल 'चालवत' असताना उमेश आपला जुना हट्ट वटवायला कैकेयीसारखा हजर झाला. त्याला 'क्यारियरवर बशिवला' नि सायकल 'चालवायला' लागलो. प्रांत ऑफिसपासून राजश्री स्टोअर्सपर्यंत सायकल चालवल्यावर उमेश समाधान पावेलसे वाटले. पण तो नावाप्रमाणे शंकराचा अवतार. कशाने कोपेल नि कशाने समाधान पावेल काही भरंवसा नव्हता. "चल की फुडं" या  त्याच्या तराटणीमुळे मी किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत सायकल चालवली. तिथे पोचल्यावर त्याने "आता टौन हॉलपोत्तर" असा विस्तारित हट्ट धरला. किल्ल्याच्या दरवाज्यापासून टाऊन हॉलच्या चौकापर्यंत असलेल्या थोड्याशा उतारानेही माझी गडबड उडाली. शेवटी त्या चौकात मी डाव्या बाजूला स्टेशनकडून येणाऱ्या रस्त्यावर एका टांग्यासमोर, सायकल समोर एका खाकी हाफचड्डीवाल्या काकांच्या अंगावर नि उमेश उजव्या बाजूच्या (तो पाय तिकडे करून कॅरियरवर बसला होता) भाजीवाल्याचा
ढिगात असे त्रिस्थळी त्रिभाजन झाले. टांगेवाल्याने लगाम खेचला नि टांगा थेट डावीकडे, माझ्या सायकलीच्या क्षेपणास्त्रापासून कशाबशा वाचलेल्या, हाफचड्डीकाकांच्यावर घातला. त्यात त्यांचे तंगडे मोडले.

मिरजेला असताना मी परत सायकलला हात लावला नाही.

तिथून अप्पांची बदली झाली पनवेलीस. पनवेल तेव्हा अगदीच टुमदार खेडे होते. तिथे अप्पांचे प्रमोशन लागू नव्हतेसे वाटते. कारण अप्पा परत सायकल वापरू लागले. "को म्यू कौ २१४७" हा बिल्ला मात्र त्यांनी सायकलीच्या किल्लीला लावला नव्हता.

इथे सायकल 'चालवण्या'चा फारसा प्रसंग आला नाही, कारण इतर आकर्षणे (गोट्या, विटीदांडू,  लगोरी इ इ) फारच प्रलोभनीय होती. त्यामुळे, मी सायकल चालवायला शिकण्याचा मुळीसुद्धा प्रयत्न केला नाही. शेवटीशेवटी माझ्याखेरीज माझ्या सर्व मित्रांना सायकल चालवता येऊ लागली.

इथे आम्ही चार वर्षं राहिलो. इथून अप्पांची बदली झाली ती अगदी पक्क्या प्रमोशनवर (हे प्रमोशन 'पक्के' आहे हे अप्पा विनायककाकांना सांगताना मी ऐकले होते), ब्रँच मॅनेजर म्हणून, पाचोऱ्याला. आणि तेवढ्यात त्यांनी लावून ठेवलेला 'लँब्रेटा'चा नंबर
आला.

'लँब्रेटा' आल्याआल्या ती घेऊनच ते पाचोऱ्याला गेले. बदली झाली तेव्हा आमच्या शाळा सुरू होऊन गेल्या होत्या. सहामाहीची परीक्षा येऊ घातली होती. त्यामुळे आम्ही तिघे पनवेलीसच राहिलो नि शैक्षणिक वर्ष उलटल्यावर पाचोऱ्याला पोहोचलो.

तिथे पोहोचल्यावर जाणवले की दहावीत गेलो तरीही मला सायकल येत नाही. मग जिवाचा धडा करून एकदाची शिकून घेतली.

दहावीची परीक्षा झाली नि मला स्कूटर शिकायचे वेध लागले. अप्पांनीही त्याला दुजोरा दिल्याने आईचा नाईलाज झाला.

भडगाव रोडला अप्पा मला मागे बसवून घेऊन गेले आणि स्कूटर चालवण्याची मूलतत्त्वे त्यांनी थोडक्यात सांगितली. पहिल्या दिवशी मी निम्मी शिकलो. म्हणजे, चालवायला शिकलो पण थांबवायला नाही. पहिला गियर टाकून क्लच सोडल्यावर स्कूटर पुढे जाऊ लागली आणि मला एकदम आनंदच झाला. ऍक्सिलरेटर पिळल्यावर तर काय, आनंदच आनंद. पण अप्पा मागून पळत येत
होते आणि "थांबव रे" म्हणून ओरडत होते. म्हणून मी सायकलचा ब्रेक दाबल्याच्या थाटात क्लच दाबला, पण ऍक्सिलरेटर तसाच पिळलेला राहिला. इंजिनचा आवाज घोंगावत वाढला म्हणून पटकन क्लच सोडून दिला. स्कूटर परत पळू लागली. शेवटी उजवीकडे एक मातीचा ढिगारा होता त्यात स्कूटर गेली. आपली आपण गेली (मी एव्हाना विल्बर/ऑरविल राईट असल्यासारखा अस्मानात गेलो होतो) आणि स्वत:हून बंद पडली. अप्पा धापा टाकत आले नि त्यांनी मला आधी स्कूटर 'नीट' कशी थांबवायची हे नीट समजावून सांगितले. पण एव्हाना ऊन चांगलेच तापायला लागले होते, त्यामुळे आम्ही परतलो. हे खानदेशातले ऊन लेकाचे बघता बघता चटचटायला लागे. आमच्या कोकणात कसे, उन्हाला कुणी फारसे मोजत नाही. काय फरक पडतो? ऊन असो वा नसो, नित्यशः घर्मस्त्राव.

दोन आठवड्यांतच मी चारही गियर बदलत स्कूटर चालवण्यापर्यंत मजल मारली. आणि महिन्याभरातच अप्पांना बँकेत सोडून स्कूटर परत घरी आणण्यापर्यंत माझी मजल गेली. घरी आणून मग मी ती स्टेशन रोडवर चालवायचा सराव करीत असे.

मेमध्ये आम्ही प्रथेप्रमाणे वेरवलीस गेलो. आम्हांला आणायला म्हणून अप्पा आले ते त्यांची बदली आता जळगावला झाल्याचे सांगतच.

जळगावला मी ज्युनियर कॉलेजात गेलो.  ते ठीक होते. पाचोऱ्यालाही हायस्कूलमध्ये प्रत्येक तासाला वेगळे शिक्षक येतच. इथे फक्त गृहपाठ, तो सर्वांसमोर तपासणे, असली जाचक बंधने नव्हती.

पण मला भावलेला बदल रस्त्यावरचा होता. अप्पांच्या लँब्रेटाखेरीज पाचोऱ्याला इतर दुचाकी वाहने दिसत ती म्हणजे राजदूत नि यझ्दी या मोटरसायकली. आणि आढाव पाटलांची एकुलती बुलेट.

इथे दुचाकी वाहनांची नुसती रेलचेल होती. फुगीर कोंबडीसारख्या दिसणाऱ्या जुन्या वेस्पा १५० थोड्याफार दिसत. बजाज १५० या नावाने त्याच जास्त दिसत. 'विजय सुपर' नावाच्या स्कूटर्स खूपशा दिसत. लँब्रेटाची चेमटलेली आवृत्ती होती ती. मोटरसायकलमध्ये राजदूत भरपूरच होत्या. शिवाय जावा आणि यझ्दी. बुलेटस दोनचार दिसत.

तिथे नव्याने मी शिकलो म्हणजे राजदूत. एवढी मोठी मोटारसायकल, पण तिला तीनच गियर हे पचनी पडायला जड गेले. पण एकदा ते पचल्यावर मग राजदूत चालवणे अगदी सहज जमले. तोवर मी तिसरा गियर टाकल्यावरही पुढचा म्हणून चौथा टाकायचा प्रयत्न करीत असे.

नंतर माझ्या वर्गातल्या सुधीर पाटीलच्या वडलांची यझ्दी. त्यांची नजर चुकवून शिकण्याचा प्रसंग आला नाही, कारण आम्हांला शिकवायला तेच उभे राहिले. फक्त त्यांच्या 'शिस्तीत' शिकताना हड्डी नरम झाली.

यझ्दीची 'किक' हे एक बेभरंवशी प्रकरण होते. कधीही फाटकन उसळून येण्याचा तिचा स्वभाव असे. आणि तिच्या उसळत्या फटक्यापासून पाय चपळाईने काढून घ्यावा तर 'किक' म्हणजेच गियरशिफ्ट असल्याने जर त्या उसळत्या किकने गाडी सुरू झालेली असेल तर पटकन चालू गाडी सेकंड गियरमध्ये जाऊन स्वाराला हिसडा बसत असे.

हे आमच्या बाबतीत होऊ नये म्हणून त्यांनी शिकवणीचा अख्खा पहिला आठवडा सुधीरला नि मला फक्त किक मारून मोटरसायकल सुरू करणे आणि बंद करून परत किक मारणे एवढ्यावरच तंगवले. त्याचा पुढे खूपच फायदा झाला म्हणा.

अजून एक मुद्दा त्यांनी बराच ओरडाआरडा करून आमच्या मनावर ठसवला तो म्हणजे गाडी स्लिप होऊ लागली तर पाय जास्तीतजास्त फाकून बसायचे. जिवाच्या भीतीने आपण कसे अंग चोरतो, आणि यझ्दीचा डब्बल सायलेन्सर कशा दोन्ही पोटऱ्या भाजतो हे त्यांनी वारंवार त्यांचा पांढरा पायजमा गुडघ्यापर्यंत वर खेचून दाखवले. सुदैवाने यझ्दी चालवताना कधी
गाडी स्लिप झाली नाही. पाय फाकवणे वाचले.

नंतर शिकलो ती सेंट्रल बँकेच्या येवलेसाहेबांची बुलेट.

बुलेटच्या किकची ख्याती म्हणजे तिने 'बॅक' मारला तर काडकन नडगीचे हाड तुटते. तसे होऊ नये म्हणून गाडी सुरू करण्याआधी पहिल्यांदा स्पीडोमीटरच्या खाली डावीकडे असलेली एक लहानशी चकती पहायची. त्यातला काटा जर मध्यावर नसेल,  तर क्लचच्या खाली असलेली एक छोटीशी लिव्हर दाबून अलवारपणे किक मारायची. मग तो काटा मध्यावर येई. तसे झाले की एकच सणसणीत लाथ घालायची. ढग गुरगुरल्यासारखा आवाज बिनतक्रार चालू होई.

नडगीचे हाड वाचवावे म्हणून मी बुलेटलाही पहिला आठवडा लाथा घालण्याचा सराव करण्यावर भागवले. नडगीच्या हाडावर संक्रांत येण्याचा धोका कधी आला नाही.

पण चालवायला घेतल्यावर एका 'पॅराडाईम शिफ्ट'ला तोंड द्यावे लागले. यच्चयावत सगळ्या (म्हणजे राजदूत,  जावा आणि यझ्दी) मोटरसायकलींना गियर डाव्या पायाखाली आणि ब्रेक उजव्या पायाखाली अशी विभागणी असे. स्कूटर्सनाही ब्रेक उजव्या पायाखाली
असे. बुलेटला नेमके उलट होते. ब्रेक डाव्या पायाखाली नि गियरशिफ्ट उजव्या पायाखाली.

पहिल्यांदाच बुलेट चालवताना मी समोर पुढ्यात कुणीतरी आले म्हणून पटकन ब्रेक दाबला, तर काडकन आवाज झाला नि गाडी तिसऱ्यातून चौथ्या गियरमध्ये गेली. त्यानंतर बुलेट चालवताना मी कायम डावा पाय अवघडावा इतपत तिरका करून बसू लागलो. हेतू हा, की ब्रेक तिकडे आहे हे सदैव ध्यानी असावे.

स्कूटर्समध्ये लँब्रेटा घरचीच असल्याने हातातलीच होती. शिवाय अप्पांच्या बँकेचे जागामालक भवानीशेठ अग्रवाल यांची वेस्पा १५० केव्हाही वापरायला मिळे. भवानीशेठ स्वतः ती कधीच चालवत नसत. त्यांचा बोजा बुलेटलाच काय तो झेपला असता. पण त्यांची पावणेपाच फुटी उंची बुलेटच्या आड आली असावी. आणि वेस्पा १५० खरीदताना बहुधा त्यांचे वजन क्विंटलऐवजी किलोत मोजता येत असावे. हा माझा तर्क हां.

काय असेल ते असो. त्यांच्या मालकीची वेस्पा १५० होती, त्यांना मूलबाळ नव्हते आणि ते कधीच ती स्कूटर चालवत नसत या गोष्टी खऱ्या होत्या. त्यांचा मुनीम सुधीर दायमा हाच ती स्कूटर मधूनअधून चालवी. त्यामुळे मी ती स्कूटर केव्हाही मागायला गेलो
तर अतीसहज परवानगी मिळे.

तीनच गियर असलेली ती वेस्पा चालवताना आगळीच मौज वाटे. फक्त तिचे एंजीन एका बाजूला असल्याने सवय होईपर्यंत जरा अस्थिर वाटे. एकदा तर माझी कसोटीच लागली होती. घरी वझेकाकू आल्या होत्या. त्या निघायला नि मी भवानीशेठची आणलेली (कशाला आणली होती ते विसरलो) वेस्पा परत करायला निघायला एकच गाठ पडली. "तुम्हांला सोडू का घरी (त्यांचे घर माझ्या वाटेवरच होते)" या माझ्या नाईलाजाने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी चक्क होकारार्थी उत्तर दिले. वझेकाकू चांगल्याच वजनदार होत्या. तेही ठीक होते. त्यांच्याइतक्याच वजनदार मोघेकाकूंना मी एकदा (हळूहळू स्कूटर चालवत) सोडले होते. पण वझेकाकू नेमक्या बसल्या त्या उलटीकडून, म्हणजे स्कूटरच्या उजवीकडून. एंजीन नि वझेकाकू दोन्ही उजव्या बाजूला असताना स्कूटर चालवणे किती अवघड आहे हे मला चालवायला लागल्यावरच कळले. सुदैवाने त्यांच्या घरापर्यंत निर्वेध पोचलो.

वेस्पाचा पिक-अप जबरदस्त होता. पटकन क्लच सोडला तर पुढचे चाक हवेत. माझे तसे कधी झाले नाही, पण इतरांचे झालेले बघितले. त्याला 'व्हीली' म्हणतात हे नंतर कळले.

त्याच दरम्यान 'बजाज'ची 'प्रिया' ही तीन गियरवालीच, पण "स्वतंत्र" स्कूटर सर्वत्र दिसू लागली. त्याआधी वेस्पाचा बजाजबरोबरचा करार संपल्यावर वेस्पा १५० चे बजाज १५० असे नव्याने बारसे करून (पूर्वी एखादे दत्तकविधान कायदेशीर नाही असे कळले की पुन्हा तोच सोहळा 'योग्य' मंडळींच्या उपस्थितीत करीत - तीच मांडी,  तेच अवघ्राण, फक्त सोहळ्याची तारीख आणि उपस्थितांना वाटलेले बत्तासे वेगळे - तशातलीच गत) बजाजने ती रस्त्यावर आणली होतीच. 'प्रिया' म्हणजे त्याच म्हातारीला जरा लिपष्टिक-पावडर
फासून, तिचे थोडेसे वजन छाटून तिला पुन्हा तरुण दिसायला लावण्याचा प्रयत्न होता.

मी बारावीत गेलो आणि अप्पांची विलासकाकांशी मैत्री झाली. विलासकाका 'विजय सुपर' स्कूटरचे डीलर होते. त्यामुळे 'विजय सुपर' मनमुराद चालवायला मिळाली. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत ('बारावीचे वर्ष' असल्याने आम्ही वेरवलीस गेलो नाही) त्यांच्याकडे रोज दोन तास त्यांच्या मेकॅनिक उत्तमशेठच्या हाताखाली काम करायला मिळाले. सुट्टी संपेस्तोवर मला प्लग काढून व्यवस्थित साफ करून लावता येऊ लागला,  क्लच-केबल, गियर केबल आणि ऍक्सिलरेटर-केबल बदलता येऊ लागली आणि सगळा कार्ब्युरेटर
उलगडून जोडता येऊ लागला.

त्याकाळी 'विजय सुपर'ला 'गव्हर्नर' असे. म्हणजे एक छोटे चिनिमातीचे नळकांडे कार्ब्युरेटरमध्ये येणाऱ्या ऍक्सिलरेटरच्या केबलला असे जोडलेले असे की ऍक्सिलरेटर सबंध पिळता येत नसे. त्याने होई काय, की अगदी वारा तुमच्या पाठीशी असला, आणि तुम्ही
उतारावर असलात, तर स्कूटर चाळीसच्या स्पीडला कशीबशी पोहोचे. उपक्रम खूप स्तुत्त्य होता, पण कुठल्याही सरकारी उपक्रमाप्रमाणे ('विजय सुपर'ची निर्मिती 'स्कूटर्स इंडिया लिमिटेड' नामक सरकारी आस्थापनेत होत असे) निरुपयोगी होता. एक तर तो 'गव्हर्नर' नसतानाही 'विजय सुपर' कशीबशी साठच्या स्पीडला पोहोचत असे. आणि दुसरे म्हणजे रस्त्यावरील वाहनांचा वेग हा त्याकाळी चिंतेचा विषय मुळी अजिबात नव्हता. पण दुरुस्तीला आलेल्या स्कूटर्सचा 'गव्हर्नर' काढून त्या साठच्या स्पीडपर्यंत पळवणे हा एक नवीनच छंद जडून गेला.

सुटी संपल्यासंपल्या स्टेट बँकेत अभ्यंकरकाका बदलून आले. अप्पांनी लगेच ओळख काढलीच. कोकणस्थ कुणीही असला की अप्पा स्तोत्र म्हटल्यासारखे "पाध्ये म्हणजे वेरवली-लांजा, ओक म्हणजे कोतळूकऱ्हेदवी, जोग म्हणजे नांदिवडे-जयगड" अशी मला संथा
देत. त्यात अभ्यंकरकाका तर इथे येण्याआधी रत्नागिरीला अकाउंटंट होते आणि मधल्या आळीत रहायला होते. आमच्या (म्हणजे माझ्या) मधूकाकांचे ते भाडेकरू. ते नि आप्पा,  कोण कुणाला ओळख दाखवायला गेले हे सांगणे कठीण आहे.

सांगण्याचा मुद्दा असा, की अभ्यंकरकाकांची होती 'बॉबी' नामक दुचाकी. तिला स्कूटर म्हणावे की मोटरसायकल याबद्दल संभ्रम होता. चाके स्कूटरची आणि घडण मोटरसायकलची असे हे हायब्रीड वाहन होते. ते चालवताना एक वेगळीच गंमत येई.

'सामान्यज्ञान' या विषयाच्या भक्तांसाठी: हे वाहन 'एस्कॉर्टस' या आस्थापनेने तयार केले  सत्तरच्या दशकात. 'बॉबी' निर्माण करताना राज कपूर पुरता खंक झालेला असल्याने तो 'तरुणाई' ऊर्फ 'यंगिस्तान' (त्याला दोन्ही शब्द माहीत नव्हते;  सुखी होता लेकाचा) यांना भावेल अशा सगळ्या गोष्टी त्यात कोंबायला बसलेला होता. डिंपलला मिनी-मिनीस्कर्टमध्ये कोंबून झाल्यावर त्याचे लक्ष इतर गोष्टींकडे गेले. 'एस्कॉर्टस' ही त्याचे व्याही नंदा यांची कंपनी. त्यांचे उत्पादन असलेले हे वाहन त्याला भावले. 'फुकट्यात जाहिरात होते तर नाही कशास म्हणा?' या विचाराने नंदाही सुखावले.

नंतर 'बजाज'ने घडण स्कूटरची आणि चाके मोटरसायकलची अशी एम-फिफ्टी (पुणेरी भाषेत 'म-पन्नास') आणून फिटंफाट केली.

मोपेडस हा एक वेगळा प्रभाग. कायनेटिक ही संस्था ज्यामुळे ओळखली जाऊ लागली ती 'लूना' नामक अचाट गोष्ट या प्रभागाच्या संस्थापकांपैकी एक. सुरुवातीच्या एकप्रवासी लूनाला चक्क सायकलची सीट थोडी स्पंज वगैरे भरून लावली होती. आणि त्याचे पुढचे शॉक ऍबसॉर्बर इतके पुरातन होते की बहुधा राजा रामदेवरायाचे ते डिझाईन असावे. नंतर लूनाने टीएफआर, टीएफआर प्लस,  डबल प्लस अशा थोड्याथोड्या सुधारित आवृत्त्या काढल्या. पुढच्या आवृत्त्यांत शॉक ऍबसॉर्बर्सही जरा सुधारले.

या प्रभागाच्या संस्थापकांपैकी अजून एक म्हणजे 'सुवेगा'. ही चालवण्याचा योग कधी आला नाही, फक्त बघितली. पण 'बुढ्ढी घोडी लाल लगाम' म्हणजे काय हे तिच्याकडे पाहून अगदीच नीट कळले. 'सुवेगा'चा एकंदर आकार आणि डिझाईन पाहता तिचा आवेश
सिंहाने (सिंहीणीने) झेप घेतल्यासारखा असे. प्रत्यक्षात ती 'रॅले'च्या सायकलहून थोड्या जास्ती वेगात जाई एवढेच. आणि या 'सुवेगा'च्या पुढच्या दिव्याची एक गंमत होती. तो दिवा तिच्या हँडलला जोडलेला नसून देहाला जोडलेला होता. त्यामुळे जरी हँडल
उजवीकडे (वा डावीकडे) वळवले तरी दिव्याचा प्रकाशझोत तत्प्रमाणे लगेच वळत नसे.