दुचाकी वाहने - आठवणीतली (भाग २)

बारावी झाल्याझाल्या मी पुण्यात आलो.

आणि त्याच दरम्यान भारतात एक आगळे वाहन आले. इंड-सुझुकी. फक्त १०० सीसी असूनही तिला चार गियर होते. तिचे स्पीडोमीटर कन्सोल अविश्वसनीय होते. दोन कोपऱ्यात दोन पिवळसर 'टर्न इंडिकेटर्स', मधोमध 'न्यूट्रल'चा हिरवा,  त्याच्या आजूबाजूला 'हाय बीम'चा निळा आणि 'ऑईल'चा लाल इंडिकेटर. अगदी दिवाळीच होती. गियर शिफ्ट लिव्हर 'हील-टो' या (तोवर) अभूतपूर्व प्रकारातली होती. 'किक'ला एक झकास बाक होता. 'पिक-अप' अकल्पित होता.

तिच्या अगदी पाठोपाठ हीरो होंडा, यमाहा आर एक्स १०० आणि कावासाकी बजाज हजर झाले. लौकरच त्यांची विभागणी अशी झाली: सुझुकी म्हणजे शांत, सुखदायक आणि समतोल अनुभव. हीरो होंडा म्हणजे अविश्वसनीय मायलेज आणि टुकार पिक-अप. यमाहा म्हणजे अविश्वसनीय पिक-अप आणि टुकार मायलेज. कावासाकी बजाज ही परत समतोल. म्हणजे सगळेच टुकार.

तशी बुलेटचीही 'मिनी बुलेट' ही २०० सीसीची मोटरसायकल होती. पनवेलच्या दातेकाकांकडे होती ती. ती घेऊन मी एकदा पनवेल-पुणे-सांगली असे केले होते. सांगलीच्या त्यांच्या मेव्हण्याकडे ती पोहोचवायची होती म्हणून. ती सरकारी कर्मचाऱ्यासारखी होती. वेगाने पन्नाशी ओलांडली की तिची निवृत्तीची भाषा सुरू होई.

हे 'छोट्या' मोटरसायकल्सबद्दल झाले. यमाहाने बुलेटला नडण्यासाठी आर डी ३५० नामक सुतळीबाँब आणला होता. पण त्याची वातच जास्ती सुरसुरली.

एव्हाना बजाजच्या 'सुपर' आणि 'चेतक' या नवीन स्कूटर्स सगळीकडे पसरू लागल्या. 'प्रिया'लाच चार गियर बसवले की "नवीन" उत्पादन झाले असा बजाजचा विक्रेता-केंद्रित बाजारातला माज त्यात दिसून येत होता.

'चेतक'चे उत्पादन निर्यातीसाठी असल्याने ती खरीदण्यासाठी काही रक्कम विदेशी चलनात मोजावी लागते अशी वदंता होती. अखेर तिचा निर्यातीचा बेत बहुधा कायदेशीररीत्या बारगळला असावा, कारण ती रुपयांत खरीदता येऊ लागली.

ही उत्पादनेही लोकांनी चढाओढीने घेतली हे सांगणे नलगे. 'स्कूटर' या प्रकारामध्ये दुसरे भरंवशाचे असे होते तरी काय दुसरे?

वेस्पा एल एम एल (लोहिया मशीन्स लिमिटेड) एन व्ही आणि वेस्पा पी एल १७० या स्कूटर्सही थोड्याफार दिसू लागल्या. आणि त्या थोड्याफारच राहून कमीकमी होत गेल्या.

वेस्पा एल एम एल एन व्ही ही का फसली याचे कारण सरळसाधेसोपे होते. 'परमिट राज'मध्ये लोणच्यासारख्या मुरलेल्या बजाजला केवळ उच्च तंत्रज्ञान वापरून तोंड देता येत नाही हे लोहियांना कळेस्तोवर वेळ उलटून गेली होती. हे बेहिशेबी लोहिया राम
मनोहर लोहियांचे कुणी नातलग असावेत बहुधा.

वेस्पा पीएल १७० स्कूटरचा जीव फारच लहान होता. आणि तिचे मागचे चाक काढण्यासाठी तिचा सायलेन्सर काढावा लागे अशी वदंता होती. खरे काय ते माहीत नाही, कारण मी चालवताना ती कधी पंक्चर झाली नाही.

या दरम्यान आलेली एक महत्त्वाची दुचाकी म्हणजे कायनेटिक होंडा. ही आली साधारणपणे इंड-सुझुकीबरोबरच. पण 'स्कूटर' असूनदेखिल इतके प्रागतिक विचार बाळगणारी दुचाकी हे अभूतपूर्व होते. अर्थात इथेही हीरो होंडाच्या जाहिरातीत म्हटल्यासारखेच ("इटस द होंडा इन इट दॅट मेक्स इट अ हीरो") होते. पण एकंदरीत, कुणाच्या का कोंबड्याने होईना, स्कूटरच्या क्षेत्रात उजाडायला लागले होते हे खरे.

कायनेटिकने (लाडके नाव 'कायहो' किंवा 'कायनी') स्त्रियांना अभूतपूर्व स्वातंत्र्य दिले. त्याआधी स्कूटर चालवणाऱ्या स्त्रिया फारतर शेकडा पाव टक्का.

इथे शेकडा म्हणजे 'एकूण जनसंख्या' नसून 'शिकलेल्या स्त्रिया' असे अभिप्रेत आहे. आणि ही टक्केवारीही पुण्यातली.  महाडातली वा कराडातली नव्हे. अर्थात तिथे स्कूटरच स्थानिक लोकसंख्येच्या जेमतेम पाव टक्का असत म्हणा.

थोडक्यात,  वेगळ्या अर्थाने कायनेटिक होंडाने स्त्रियांना रस्त्यावर आणले. नंतर या प्रभागात बजाज सनी, बजाज स्टाईल, टीव्हीएस स्कूटी आदी बरीच चिल्लरपार्टी आली नि गेली. पण होंडा ऍक्टिवा येईस्तोवर फारसे लक्ष देण्यासारखे काही घडले नाही.

माझा वर्गमित्र हिमांशू याने कायनेटिक घेतल्यावर एकदा एका आगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले. गियरवाल्या स्कूटर्स बंद करण्यासाठी इग्निशन बंद करण्याची गरज नसे. चालू स्कूटर गियरमध्ये टाकून क्लच सोडताना पाय ब्रेकवर दाबून धरला की काम होत असे. कायनेटिकला ही सोय नव्हती. हिमांशूच्या कायनेटिकचा इग्निशन स्विच एकदा खराब झाला. खराब म्हणजे, तो कायम 'चालू' स्थितीतच रहायचा. त्यामुळे स्कूटर चालू करणे ही अडचण नव्हती. पण बंद कशी करायची? शेवटी उपाय सापडला. तो म्हणजे सायलेन्सरच्या धूर ओकणाऱ्या नळकांड्यावर पादत्राणाचा तळवा दाबून धरणे नि घुसमटवून एंजिनचा मृत्यू घडवून आणणे.

म्हातारीला लिपष्टिक-पौडर फासून षोडषा म्हणण्याच्या आपल्या अट्टहासाला जागून 'बजाज'ने सुपर FE नामक एक स्कूटर बाजारात आणली. यातली FE ही अक्षरे 'फ्यूल एफिशियंट' याचा शॉर्ट फॉर्म होती. दीडशेऐवजी सव्वाशे सीसी एंजीन केले की लगेच फ्यूल
एफिशियंसी वाढली म्हणून समजा असे हा सोपा हिशेब होता. आणि डिझाईनच्या दृष्टीने एक मोठा फरक झाला - बजाज स्कूटर्सच्या इतिहासात पहिल्यांदाच इग्निशन स्विच आला.

त्याआधी होते असे, की पुढच्या किल्लीने (ती किल्ली लावण्याची जागा आणि कोन ज्या कुणी डिझायनरने ठरवला असेल त्याला डिझायनिंगमधले नोबेल मिळायला हरकत नव्हती) फक्त हँडल लॉक होत असे. तेसुद्धा हँडल डावीकडे वळलेले असेल तर. जर का हँडल उजवीकडे वळलेले असताना ती किल्ली फिरवून लॉक केली तरी हँडल मोकळेच असे - डावीकडे वळवेपर्यंत. डावीकडे वळून एक विशिष्ट कोन गाठला की 'कट्ट' आवाज करीत ते लॉक होई. उजवीकडे वळलेले हँडल सरळ करून स्कूटर चालवायला सुरुवात केल्यानंतर जर डावीकडे हँडल वळवले तर धराशायी व्हायचा प्रसंग येई. तसे होऊ नये म्हणून बॅटिंगला येण्याआधी फलंदाज अंगाला आळोखेपिळोखे देतो तसे स्कूटर चालू करण्याआधी तिचे हॅंडल डावी-उजवीकडे दोनचारदा वळवून घेण्याची सवय त्या काळात बऱ्याच जणांना लागली.

आणि इग्निशन होते कुठे? तर उजव्या हाताला हॉर्न आणि लाईट स्विचचा जो छोटासा खोका होता त्यामध्ये एक तीन स्क्वेअर मिमिचे काळे बटन एखाद्या पुटकुळीसारखे (नि तेवढेच) बाहेर आलेले होते. बाहेरच्या दिशेला. म्हणजे ऍक्सिलरेटरवर मूठ आवळली की अंगठ्याला लागून. ते दाबले की सर्किट ब्रेक होऊन एंजीन बंद होत असे. त्याहून कायम उपाय शोधायचा असेल तर मागची डिकी उघडून त्यात असलेला एक मेटल स्विच ऑफ करावा लागे. मागल्या डिकीत काही सामान असेल आणि खड्ड्यातून जाताना ते उसळून तो स्विच बंद झाला तर "चालता चालता अचानक बंद पडली की हो" अशी 'मेकॅनिकली चॅलेंज्ड' जनतेची अवस्था होत
असे.

'बजाज स्कूटर्सच्या इतिहासात पहिल्यांदाच' असे लिहिले खरे, पण चूभूदेघे. कारण 'चेतक'ला दिव्याच्या डोक्यावर एक इग्निशन स्विच पाहिल्याचे अंधुक आठवते. 'चेतक' माझ्या हातात कधी आली नाही त्यामुळे खात्री नाही.

तर सुपर FE ला इग्निशन स्विच आला. शिवायल हॉर्न युनिटला एंजीन किल करण्यासाठी एक वेगळा स्विच आला. तो दिसायला दिव्याच्या बटनासारखाच होता. आणि त्यावर On/Off असे सोप्या भाषेत न लिहिता दोन अगम्य आकृत्या काढलेल्या होत्या. त्या आकृत्या तशाही कळत नसत. त्यावरचा रंग उडाल्यावर तर मजाच मजा.

एंजीन किल करण्यासाठी इग्निशन स्विच असताना सहा इंच अंतरावर दुसरे बटन कशासाठी दिले होते हे राहुल बजाजनाच माहीत. कदाचित जमनालाल बजाज यांची अंतिम इच्छा असावी.

या सुपर FEचे मायलेज लिटरला चाळीस ते पंचेचाळीस पडे. तोवरच्या बजाज स्कूटर्स चाळिशी गाठायलाही नकार देत त्यातुलनेत हे चांगलेच होते. आणि एंजीन सव्वाशे सीसी म्हणजे फार लहान नव्हते. त्याआधी बजाजने 'कब' नावाची एक शंभर सीसीची स्कूटर आणून पाहिली होती. गतीच्या दृष्टीने ती अगदीच अगतिक होती.

बजाज कब ऐंशीच्या स्पीडने पळवल्याचा दावा करणारे काही लोक असत तेव्हा. उडत्या तबकड्या बघितल्याचा दावा करणारेही काही लोक असत तेव्हा.

नंतर गियर्ड स्कूटर्समध्ये 'बजाज'ने आणली ती चेतक क्लासिक. दीडशे सीसी. एव्हाना लिपष्टिक-पौडर फासायचे तंत्रही जमले होते,  त्यामुळे म्हातारी निम्म्या वयाची वाटू लागली.

थोडेसे मोपेडसच्या क्षेत्राबद्दल. टीव्हीएस XL (पुणेरी भाषेत 'तवस क्षल') ही लूनाची बरीचशी सुधारलेली आवृत्ती होती. सुधारणा म्हणजे पिक-अपच्या बाबतीत. शून्य ते तीस या वेगात ती बहुतेक वेळेस स्कूटर्सनाही मागे टाके. त्यामुळे सिग्नलहून झपाट्याने निघायला ती बरी पडे. लूना त्याबाबतीत अगदीच मिळमिळीत होती. त्यात डबलसीट असली तर बघायला नको. एकदा वर्गातले तीन टोळभैरव अंतुरकरच्या लूनावर ट्रिपलसीट अलकाला सिनेमा पहायला गेले. खंडुजीबाबा चौकातल्या सिग्नलला थांबून ते पुढे निघाले
तर कोपऱ्यावरच्या पोलिसाने मागून चालत येऊन त्यांना पकडले.

कायनेटिकची एक 'स्पार्क' नामक मोपेडही आली. तिला दोन(च) गियर होते. त्यामुळे ती चालवताना सतत काहीतरी चुकल्यासारखे वाटत राही. आणि तिला इग्निशनची भानगड नव्हती. फक्त एक हँडल-लॉक. आणि ते कुठल्याही यू-क्लिप वा हेअरपिनने विनतक्रार खुले होई. त्यामुळे विद्यापीठातल्या अनिरुद्धची स्पार्क ही त्याकाळात सामायिक मालकीची होऊन गेली.

पावसाळ्याच्या काळात ही स्पार्क पाणीभरल्या खड्ड्यातून गेली की सिलेंडरवर पाणी उडून ती हमखास बंद पडे. मग दोन मिनिटे शांत उभे राहावे लागे. तापलेल्या सिलेंडरवरील पाण्याची वाफ होऊन गेली की ती परत चालू होत असे.

या क्षेत्रात नंतर आलेल्या मोपेडस म्हणजे टीव्हीएस स्कूटी आणि बजाज सनी. स्कूटी एक माणूस वाहून नेण्यासाठी ठीक होती. सनीमध्ये फारतर माणसाची सावली वाहून न्यायची ताकद होती.

त्या काळातले आठवणीतले एक गंमतीदार वाहन म्हणजे होंडा स्ट्रीट. एम एटीसारखी रचना, गियर पायात, आणि क्लच नाही! शिवाय रोटरी गियर - म्हणजे एक-दोन-तीन-चार असे गियर खाली दाबत गेले आणि चौथ्यानंतरही अजून खाली दाबले की न्यूट्रल!

मोटरसायकलींच्या क्षेत्रात एव्हाना चांगलीच गर्दी झाली होती. हीरो होंडा, टीव्हीएस सुझुकी या एकेका ब्रँडसच्याच डझनावारी मोटरसायकली आल्या. सुझुकी फिएरो स्टायलिशपणामुळे लक्षात राहिली. बजाजने स्कूटर्स बंदच करून मोटरसायकल्सवर लक्ष
केंद्रित केले.

मृत्यूपंथाला लागलेल्या कायनेटिक होंडाला मोक्ष देणारी दुचाकी म्हणजे होंडा ऍक्टिवा. त्याचेच वेष बदलून केलेले रूप म्हणजे डिओ (वा डायो). आणि गियरवाल्या मंडळींसाठी एटर्नो (वा इटर्नो). पण एटर्नो जरा अवघड प्रकरण होते. खूपच मोठा बोंगा, आणि गियर बदलण्याची पद्धती एकदम वेगळी. बजाजला कसे, पहिल्या गियरसाठी क्लच दाबून मूठ आभाळाच्या (म्हणजेच आपल्या) दिशेने वळवावी लागे. दुसऱ्यापासून पुढच्या गियरसाठी त्याच्या विरुद्ध दिशा. एटर्नोसाठी पहिल्या गियरपासून सगळेच गियर खालच्या
दिशेने पडत. त्यामुळे चालवताना बरेच गोंधळायला होत असे.

तसे सुरुवातीच्या काळात सुझुकी आणि होंडा चालवताना होई. सुझुकीचे गियर सगळे पावलाच्या पुढच्या भागाने खालच्या दिशेला पडत. होंडाचे बरोबर उलटे - टाचेकडून खालच्या दिशेला. यमाहा अजूनच अत्रंग. पहिला पावलाच्या पुढल्या भागाने खाली. बाकीचे
टाचेकडून खाली.

ऍक्टिवा जबरदस्त चालली. एटर्नो एवढी मागे पडली की शेवटी त्याचे उत्पादन बंद झाले. ऍक्टिवा आणि डिओसारखी अजून एक एव्हिएटर नामक दुचाकी बाजारात आहे. नुसते डिझाईन ढिंगचॅक आहे, बाकी सगळे तेच. त्याच सेगमेंटमध्ये हीरो ग्रुपची प्लेझर आहे. 
ताकदीला जरा कमी पडते, पण शहरात ठीक ठीक.

त्याहून जरा मोठी म्हणजे ११० सीसी ची टीव्हीएस वीगो. आता नवीन ऍक्टिवाही ११० सीसी आहे.

त्याहून वर म्हणजे सुझुकी ऍक्सेस आणि महिंद्र रोडिओ. दोन्ही १२५ सीसी.

मी सुझुकी घ्यायला म्हणून तीनचार वेळेस गेलो. एकदा दोन महिन्यांचे वेटिंग म्हणून सांगितले. एकदा चार. एकदा म्हणाले की आम्ही बुकिंग घेणे तात्पुरते थांबवले आहे. मग ऍक्टिवा घ्यायला गेलो. तर तिचे डिझाईन बदलले असून आता पुढच्या बाजूला डिकी लावता
येणार नाही असे कळले. स्कूटरला डिकी नसेल तर मोटरसायकल काय वाईट? अर्थात हा केवळ सात्त्विक आणि वायफळ संताप. तीस वर्षे नियमितपणे स्कूटर वापरणाऱ्याला मोटरसायकल कधीही 'आपली' वाटत नाही हेच खरे. सामान ठेवायची अजिबात सोय नाही म्हणजे काय? मागे डिकी लावून घेतली तरी तिचा आकार फार फार मर्यादित.

ऍक्टिवाला सीटखाली जागा असते त्यापेक्षा जास्त जागा तरी मिळेल म्हणून मग रोडिओ घेतली. तिची पेट्रोल टाकी समोरच्या बाजूला डिकीच्या जागी असल्याने सीटखाली जागा जास्त मिळाली. मोठे हेल्मेट, जॅकेट, गॉगल, दोनचार पुस्तके/मासिके, अर्धा किलो
बाकरवडी एवढे एकदम एकावेळेस त्यात आरामात बसते. बाह्य आकार ऍक्टिवापेक्षा स्कूटीसारखा, म्हणजे छोटा आहे. त्यामुळे ८ बीएचपी (नवीन ऍक्टिवाएवढीच) ताकद असली तरी कमी बोजामुळे पळवायला सोपी पडते.

रोडिओ म्हणजे पूर्वीची कायनेटिक फ्लाईट. महिंद्राने कायनेटिक ग्रुप विकत घेतल्यावर फ्लाईटलाच पंजाबी ड्रेस ऐवजी स्कर्ट गुंडाळला. मग स्पीडोमीटर डिजिटल केला, त्यात ट्रिपमीटरही घातला, डिजिटल घड्याळ घातले, किमी/मैल दोन्हीमध्ये अंतर मोजण्याची सोय घातली, बॅकलिट डिस्प्लेसाठी पाचसात वेगवेगळ्या रंगाचे दिवे लावले (एका वेळी एकच रंग निवडता येतो), आरसे 'फोल्डिंग ऑन इंपॅक्ट' या प्रकारातले केले, सीटखाली दिवा बसवला (सीट वर करून डिकी उघडली की तो आपोआप लागतो),  पुढच्या बाजूला मोबाईल चार्जर दिला. थोडक्यात, कोंबडी तीच ठेवून मारता येईल तेवढा मसाला मारला.

एकंदरीत रोडिओबद्दल मी तसा समाधानी आहे. लांब म्हणजे पुणे-लोणावळा नि पुणे-सातारा असे चारदोन वेळेस केले. सहज जमले. लोणावळ्याला तर डबलसीट गेलो होतो. गावातही पळवापळवीला सोपी पडते.

मोटरसायकल घ्यावी असा विचार मधूनच बळावून जातो. तेवढ्यापुरता सगळ्या उपलब्ध मोटरसायकल्सचा सर्व्हे होतो आणि 'भला बिचारा ठणठणपाळ' यावर गाडे येते. त्यामुळे एवढ्यात तरी कुठले नवीन दुचाकी वाहन माझ्या रडरवर येण्याची शक्यता धूसर दिसते
आहे.

दुचाकी वाहनांवरचा एकंदरीत प्रवास एव्हाना काही लाख किलोमीटर्समध्ये गेला आहे. त्यातले 'लक्षात राहिलेले प्रवास' यावर पुढचा लेख लिहावा असे मनात आहे. तसेच आठवणीतली चारचाकी वाहने आणि त्यांमधून केलेले प्रवास याबद्दलही लिहिणार
म्हणतो.

तब्येत तशी ठीकच आहे. पण मग हे 'आत्मचरित्र' मोडमधले लिखाण करण्याकडे का कल झुकतो आहे कुणास ठाऊक?

टीपः इथे नोंदलेली तांत्रिक माहिती आठवणीतली आहे. त्यात चूक आढळून आल्यास दोष वाचणाऱ्याचा असेल. हे मान्य नसल्यास चडफडत बसावे.