जगण्यास का फुकाची येते अशी खुमारी?

गझलेस एक कविवर घेतात कैक वर्षे 
खोड्या, तुझे खुजेपण दिसते इथे प्रकर्षे

 
अशा प्रकारे कविवरांच्या प्रतिभेस द्विपदीरुपी वंदन करून त्यांची "जगण्यास अमृताची आली जणू खुमारी" ही गझल वाचून आम्हांस आलेल्या खुमारीतून स्फुरलेल्या काही लडबडत्या ओळींची सुमने त्यांच्या चरणी वाहत आहोत. 

 
जगण्यास का फुकाची येते अशी खुमारी?

रिचवीत रोज प्याले, चढली किती उधारी!!

 
थकलीस तू न केव्हा रात्रीत जागताना.....

येऊ दिली न मीही अन्‌ नीज भरदुपारी!

 
नाही दिलीस जर तू मज ऐसपैस जागा

पडवीत मैत्रिणीच्या टाकेन मी पथारी!

 
पोहे भडंग झाले! वांगी भरीत झाली!

पार्टी करू, चला रे! जय्यत असे तयारी!

 
आजन्म हिंडलो मी मागून बायकोच्या....

केली तिने खरेदी, झालोय मी भिकारी!

 
दोघांमध्ये हिरीरी वादात जिंकण्याची;

नवर्‍यास जिंकला तर घडते उपासमारी!

 
होऊन 'भाग्य' आलो होतो घरी तुझ्या मी....

खोगिर, लगाम घालुन केलीस तू सवारी!

 
वटवट पुरे, धरावा केव्हा तरी अबोला;

ऐकू तरी किती मी बेसूर 'राग'दारी?

 
आभास हा कुणाचा? चारू असे कुणाची?

करतोय कोकिळाची का काक उस्तवारी?

 
                 ...........श्री. खोडसाळ

विडंबनतंत्रज्ञान विभाग,

काव्यवातनिर्मूलनशास्त्र महाविद्यालय, मराठी आंतरजाल