अदितीचे दुःखद निधन

मनोगत ह्या संकेतस्थळाच्या स्थापनेपासून सदस्य असलेल्या अदितीचे काल पहाटे प्रदीर्घ आजारामुळे पुण्यात दुःखद निधन झाले. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची अदिती संगणक क्षेत्रात कार्यरत असतानाच शास्त्रीय गायनाचे रीतसर शिक्षण घेत होती, लेखन करीत होती. वेगवेगळे लेखनप्रकार लीलया हाताळणाऱ्या अदितीने मनोगतावर व इतरत्र विपुल कथा, कविता, व ललित लेखन केले. पुस्तक परीक्षणे लिहिली. अनुवाद करण्याचा तिला छंद होता. शर्लॉक होम्सच्या हेरकथांचा अनुवाद करणे तिला विशेष आवडे. अतिशय आजारी असतानाही तिने यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी मस्ग्रेव्हांचा रिवाज हा 'द मस्ग्रेव्ह रिच्युअल' ह्या होम्सकथेचा अनुवाद केला. इतकेच नव्हे तर एक शब्दकोडेही रचून पाठवले. मडो आणि काउ! आणि लखलख चंदेरी  हे तिचे अलीकडील लेख वाचून लेखिका गंभीर आजारी असल्याची पुसटशी शंका तरी येईल का? हे पाहिल्यावर रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या कटकटींनी वैतागून "छ्यॅ! अशात काय कपाळ कविता लिहिणार! " म्हणणाऱ्या माझी मला लाज वाटू लागते.

अदिती गेली. जाण्याचे वय नसताना, अवेळी, रांग मोडून पुढे निघून गेली. इथल्या काव्यशास्त्रविनोदाची संकुचित मैफल सोडून सरस्वतीच्या स्वर्गीय मैफलीचा आनंद घेण्यासाठी निघून गेली. विलियम वर्ड्सवर्थच्या शब्दांत तिला श्रद्धांजली वाहतोः

"शी शॅल बी स्पोर्टिव्ह ऍस द फॉन
दॅट वाइल्ड विथ ग्ली अक्रॉस द लॉन
ऑर अप द माउंटन स्प्रिंग्ज;
ऍंड हर्स शॅल बी द ब्रीधिंग बाम
ऍंड हर्स द सायलेन्स ऍंड द काम
ऑफ म्यूट इन्सेन्सेट थिंग्ज. "

ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.

('अदिती' ह्यांचे मनोगतावरील प्रकाशित साहित्य येथे वाचावे : समग्र 'अदिती' : प्रशासक)