आणि मी यू.के. ला जाऊन आले....३

      मग मी भारतातच विकत घेतलेले IPRE कंपनीचे यू. के. चे सिम कार्ड फोनमध्ये टाकले व केदारला फोन लावला. हे कार्ड घालण्यासाठी मला बरीच झटापट करावी लागली. आधीचे एअरटेलचे सिम कार्ड काही केल्या निघतच नव्हते. त्याच्यावरचे झाकण घट्ट बसले होते. १५ ते २० मिनिटे माझा हाच उद्योग चालला होता. शेवटी एकदाचे ते निघाले व मी केदारला पोचल्याचे कळविले. रात्री ९.१५ वाजता मी हॉटेलवर पोचले. 

    मला पाहिल्यावर तेथील स्वागतिकेने लगेच माझे नाव असलेला एक फॉर्म माझ्या समोर ठेवला व भरायला सांगितला. मी तो भरला व तिने मला खोली क्र. १७ ची किल्ली दिली. मी जायला निघाले पण माझ्याकडील सामान पाहून तीही माझी एक बॅग घेऊन माझ्याबरोबर आली. खोली बरीच आतल्या बाजूला होती. ती मला माझ्या खोलीत सोडून परतली.
    माझ्या कंपनीतील सहकारी अजेय आधीच येथे आलेला होता. मी त्याला डॉनिंग्टन मॅनॉर हॉटेलला पोचल्यावर फोने केला होता. तो नंतर माझ्यासाठी पाव भाजी घेऊन आला. मग मी ती खोलीत खाल्ली. एकदम चविष्ट झाली होती. मग फ्रेश होऊन केदारला पुन्हा हॉटेलवर पोचल्याचा फोन केला व झोपून गेले. आता मात्र शांत झोप लागली.
    दुसऱ्या दिवशी सोमवार होता व लगेचच ऑफीस जॉइन करायचे होते. माझे सहकारी अजेय व अभिजीत मला हॉटेलवरून पिक अप करतील व ऑफीसनंतर गाडीने पुन्हा हॉटेलवर सोडतील असे ठरले होते. त्याप्रमाणे अभिजीत बरोबर ८ वाजता आला. मी ६ वाजता उठून माझे आवरून तयारच होते. अजून तसे फ्रेश वाटत नव्हते कारण झोप पूर्ण झाली नव्हती. पण काही इलाज नव्हता.
    हॉटेलमधून बाहेर पडले आणि झोंबणारे वारे कानांवर आदळू लागले. मी आदल्याच दिवशी रात्री पोचल्याने सामान जास्त काढले नव्हते. त्यामुळे टोपी घातली नव्हती. पण ते वारे आणि थंडी पाहून येथे कानटोपीशिवाय बाहेर पडायचे नाही हे ठरवून टाकले.
    ऑफीस गाडीने ७-८ मिनिटांच्या अंतरावर होते. तिथे गेल्यावर अँडीने माझी सर्वांशी ओळख करून दिली. माझी बसण्याची जागा दाखवली. सकळचा वेळ लॅपटॉप जोडणे, सर्वांना पोचल्याचे इमेल करणे इ. मध्ये गेला. मग दुपारपासून प्रशिक्षण सुरू झाले. १२ वाजता जेवणाच्या सुट्टीत मी बरोबर आणलेली पुरणपोळी खाल्ली. मी बरोबर पुरणपोळ्या व गुळाच्या पोळ्या आणल्या होत्या. माझा पहिला आठवडा तर त्यावरच गेला. मी मांसाहार करत नसल्याने मला तिथे फारसे पर्याय नव्हते. म्हणून मी ही तजवीज केली होती. 
    जेवणानंतर पुन्हा थोडेसे प्रशिक्षण होऊन मग मला सराव करण्यास सांगण्यात आले. माझे काही फारसे लक्ष लागत नव्हते कारण मला सगळेच नवीन होते. सारखी घरच्यांची, आरोहीची आठवण येत होती. शेवटी एकदाचे ५ वाजले आणि मी हॉटेलवर परतले. आता रात्रीपर्यंत काय करायचे हा माझ्यापुढे प्रश्न होता. पण झोप झालेली नसल्याने लवकर जेवून झोपून जावे असे ठरविले.
(क्रमशः)