आणि मी यू.के. ला जाऊन आले....६

    आणि गाडी थोडीशी वेडीवाकडी चालू लागली. काय झाले आहे ते पाहण्यासाठी ड्राइव्हरने गाडी उभी केली. माझ्या पोटात गोळाच आला. आणि मनात विचार येऊ लागले. 'आता मी विमानतळावर कशी पोचणार? माझे विमान चुकणार तर नाही ना? '

    ड्राइव्हरने पाहून सांगितले की पंक्चर झाले आहे. तो खूपच आश्चर्यचकित झाला होता. म्हणाला गेल्या २७ वर्षात असे कधी झाले नव्हते. मी विचारले 'किती वेळ लागेल? ' तर तो म्हणाला १० ते १५ मिनिटे. माझ्याकडे स्टेपनी आहे. मग मला थोडे बरे वाटले. माझा घाबरलेला चेहेरा पाहून तो म्हणाला 'काही काळजी करू नको. मी तुला वेळेवर विमानतळावर पोचवतो'. मग त्याने आणि अभिजीतने मिळून चाक बदलले आणि आमची गाडी पुन्हा सुरू झाली. मी मनोमन देवाची प्रार्थना केली की 'देवा, आता कुठलाही अडथळा न येता मला माझ्या आरोहीजवळ पोचव'.
    अशा तऱ्हेने साधारण ५.३० वाजता आम्ही विमानतळावर पोचलो. उतरताना ड्राइव्हरने पुन्हा विचारले 'आता काही काळजी नाही ना? आपण वेळेआधी पोचलेलो आहोत. मोबाईल इ. काही गाडीत राहिले नाही ना? 'अशी त्याने आठवणही केली. त्याचे आभार मानत मी उतरले. मग अभिजीतनेही माझा निरोप घेतला. आता मी एकटीच उरले होते. 
    सामान घेऊन विमानतळामध्ये प्रवेश केला. पहिली काही मिनिटे काहीच सुधरले नाही. एक रिकामा बाक दिसला त्यावर बसले व केदारला फोन केला की मी हीथ्रोवर पोचले आहे. पण काहीच कळत नाहीये. तो म्हणाला जरा आजूबाजूला चौकशी कर. मग लांबवर एक स्क्रीन दिसला. त्यावर माझ्या विमानाच्या क्रमांकासमोर लिहिले होते की चेक इन ६.२५ ला सुरू होईल. केदारने मला सांगितले होते की विमानतळावर पोचल्यावर तुला तुझा बोर्डिंग पास प्रिंट करून घ्यावा लागेल. तिथे एक माणूस कोणाला काही मदत लागली तर करत असल्याचे मला दिसले. मग मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की 'मला बोर्डिंग पास प्रिंट करायचा आहे. मला सांगाल का कसा करायचा? 'मग त्यांनीच मला प्रिंट करून दिला. पहिली पायरी तर झाली. आता ६.२५ वाजण्याची वाट बघत बसले. ६.२५ ला चेक इन काउंटर सुरू झाले. मी मोठी बॅग चेक-इन केली. 'मला शाकाहारी जेवण हवे' असे त्या ऑफिसरला सांगितले. येताना मी ते सांगायचे विसरले होते. बॅगांना टॅग्ज लागले आणि पुढे सरकले. सिक्युरिटी चेक साठी सरकत्या जिन्याने खाली जायचे होते. तिथे भली मोठी रांग होती. जाण्याआधी तिथे एक माणूस उभा राहून पर्फ्युम्स इ. गोष्टी जर बॅगेत असतील तर काढून पॉलिथीनमध्ये ठेवा असे सांगत होता. माझ्या बॅगेत काही नव्हते म्हणून मी पुढे गेले. सिक्युरिटी चेक होऊन बाहेर पडले. तिथे एक भला मोठा वेटिंग एरिआ होता. त्यावेळी ७.१५ झाले होते. आणि विमान ९.२५ चे होते. माझ्याकडे २ तासांहून जास्त वेळ होता. मग तिथे एका बाकावर बसून बरोबर आणलेले सँडविच खाल्ले आणि तिथल्या दुकानांमध्ये थोडा वेळ फिरले. फ्रेश होऊन आले. तिथल्या मदतकक्षातून कळले की ८.३० च्या सुमारास विमानाचा गेट क्र. कळेल. तोपर्यंत माझ्याच विमानाने जाणाऱ्या काही लोकांना मी हेरून ठेवले होते. ८.३० झाले तरी आमच्या विमानाचा गेट क्र. काही स्क्रीनवर झळकेना. म्हणून आमची घालमेल सुरू झाली. शेवटी एकदाचा झळकला आणि मी त्या दिशेने जाण्यासाठी निघाले. मुंबई विमानतळावर वेटिंग एरिआ जवळच गेटस होती. इथेही असेच असेल ह्या भ्रमात मी होते. दिशादर्शक खुणांच्या मदतीने गेटकडे निघाले तर असे लक्षात आले की तिथे जाण्यासाठी लिफ्टने जायचे आहे!!! मग घाबरत घाबरतच त्या लिफ्ट मध्ये शिरले. पण तिथे मला माझ्याच विमानाने जाणाऱ्या एक मराठी काकू भेटल्या व मला जरा बरे वाटले. मग त्या लिफ्टमधून उतरून खूप वेळ चालत गेलो. सरकत्या जिन्याने गेलो. आणि शेवटी एकदाचे ते गेट आले. तिथे खुर्च्यांवर सगळ्यांना बसविले. मी त्या काकूंशी गप्पा मारत बसले. 
(क्रमशः)