मार्च २८ २०२०

अखेर

टीपः अश्वत्थामा या कथेनंतर त्रिशंकू ही कथा आणि त्यानंतर 'अखेर' ही कथा अशी एक त्रिपदी डोक्यात होती आणि त्याप्रमाणे लिहिलीही. ही गोष्ट साधारण १९९० ते १९९२ दरम्यानची. मग त्या सगळ्या कथा हरवल्या.
त्यातली अश्वत्थामा ही कथा आठवेल तशी २००७ साली लिहिली. मग परत ताबूत थंडे पडले.
गेल्या महिन्यात बरेच जुनेपाने सामान हुसकणे जमले. त्यात त्रिशंकू आणि अखेर या दोन्हीही सापडल्या. मूळची अश्वत्थामा मात्र गेली ती गेलीच.

=========================================================

लांबलचक उजाड पसरलेला तो माळ आपल्या छातीवरचा वैराण रस्ता एखाद्या घावासारखा वागवत उभा होता. सूर्य नुकताच मावळला होता आणि त्या संधिप्रकाशात माळाचा विस्तार नजरेत मावत नव्हता. नुकतेच त्यांना उतरवून गेलेल्या बसने उडवलेली धूळ अजून हवेत रेंगाळत होती.
बेरडमाळावर उतरायचे म्हटल्यावर प्रथम कंडक्टरने आश्चर्याने तोंड वासले होते. मग गुरुजींच्या शर्टाच्या सोन्याच्या बटणांकडे, गळ्यातल्या साखळीकडे आणि बोटांतल्या अंगठ्यांकडे त्याने उघड उघड संशयाने पाहिले होते.
गुरुजींनी त्याच्या दंडाला बोट लावून चलण्याची खूण केली आणि ते पायांच्या कात्रीने तो माळ कापू लागले. अंधार दाटून आला तरी गुरुजींचा वेग मंदावला नाही. सराईतपणे ते पुढे पुढे चालत राहिले.
चालत चालत त्यांनी माळाची कड गाठली तेव्हा त्याचे वेळेचे भान निघून गेले होते. समोर नजर जाईल तितका समुद्र पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चमकताना दिसत होता. खालचा समुद्रकिनारा मात्र माडांच्या गर्दीत झाकला गेला होता आणि त्यांतून काजव्यासारखे दिवे लुकलुकत होते.
त्या दृष्याला डावी घालून गुरुजी वळले आणि मोठाल्या दगडांतून वाट काढत चालत राहिले. अचानक त्याच्या लक्षात आले की माळाचा एक भाग भाल्याच्या फाळाप्रमाणे समुद्रात घुसला होता आणि ते त्यावरून चालत होते.
ते त्या भाल्याच्या टोकाशी आले आणि एका चतकोर वाटेने खाली उतरू लागले.
गुरुजी त्या गुहेसमोर थांबले तेव्हा चंद्र चांगलाच वर चढला होता नि त्याचा प्रकाश गुहेसमोरच्या आटोपशीर अंगणात पसरला होता. अंगणामध्ये दगडांनी बांधून काढलेले एक पाण्याचे कुंड चकाकत होते.
गुरुजींनी त्या कुंडात उतरून हात-तोंड धुतले. त्यानेही तसेच केले. गुरुजींनी गुहेच्या तोंडाशी समुद्राला सन्मुख बैठक जमवली आणि त्याला बसण्याची खूण केली. ठिणगी पडावी तशी त्यांच्या बोटातली अंगठी चमकून गेली.
"अशा गूढपणे मी तुला इथे का आणले याचे तुला आश्चर्य वाटत असेल. माझ्या डोक्यावर तर परिणाम झाला नाही ना अशी शंकाही तुझ्या मनाला चाटून गेली असेल. " गुरुजींचा खर्जातला आवाज गंभीरपणे प्रकटला आणि गुहेतून येणाऱ्या मंद प्रतिध्वनीसकट स्वतःच्या ताकदीने उभा राहिला.
"नाही, तसं काही नाही" हे शब्द त्याच्या ओठांपर्यंत आले, पण गुरुजींनी बोटांनीच ते मागे ढकलले.
"तू काय म्हणणार ते मला माहीत आहे. 'नाही, तसं काही नाही' असे तू म्हणणार, आणि त्यामागचे कारण तसे म्हटले नाही तर माझ्याबद्दल अनादर नि अविश्वास दाखवल्यासारखा होतो असे तुला वाटते हेही मी जाणतो. पण कोणत्याही विचार करू शकणाऱ्या माणसाच्या मनात तशी शंका उभी राहणारच. तरीही समजून-उमजून हा खेळ खेळणे समाजात वागताना गरजेचे असेलही कदाचित. पण इथे त्याची गरज नाही. "
त्यांच्या आवाज थोडासा कठोर झाल्यासारखा त्याला भासला. पण धूसर चंद्रप्रकाशात दिसणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर काहीही बदल दिसत नव्हता. ऐसपैस पसरलेले कपाळ, मागे वळवलेले केस, पाणीदारपणे चमकणारे डोळे, सगळे तसेच होते.
"शब्दांचे बुरखे पांघरत आपले खरे विचार लपवून ठेवण्याची ही वेळ नव्हे. कारण आपली ही भेट शेवटचीच ठरणार आहे. "
तो थरारला. अविश्वासाच्या नजरेने त्यांच्याकडे पाहताच ते मंदपणे हसले.
"बऱ्याच काळापूर्वी अशाच एका पौर्णिमेला मी इथे आलो होतो. त्या पहिल्या आणि शेवटच्या वेळी मला माझ्या गुरुंनी विद्यादान केले होते. आणि या समोरच्या कड्यावरून त्यांनी आत्मसमर्पण केले होते. जाताना मात्र खांदे वाकतील एवढे ओझे त्यांनी मला सुपूर्त केले होते.
"दिशाहीन आणि अर्थहीन अवस्थेत भटकताना मी त्यांच्यापाशी कसा पोहोचलो ते मलाही नीटसे स्मरत नाही.
"गाण्याची आवड जरी मला पहिल्यापासून असली तरी ते इतरांना फारसे कधी पटले नाही. वडील तर हाताच चाबूक घेऊनच मला दर सकाळी शेताकडे हाकलीत.
"त्या नापीक जमिनीत घाम गाळताना मी मात्र धुमसत होतो, आणि निष्ठेने गळा पोचेल तितका फिरवत होतो.
"तेवढ्यात आमच्या शेजारी एक नवीन कुटुंब शहरातून रहायला आले. त्यांचा मुलगा कुठल्याशा संगीताच्या परीक्षा पार करून आला होता. पण प्रत्यक्ष गाण्यापेक्षा त्याचा काथ्याकूट करण्याकडेच त्याचा कल जास्ती होता. संगीताचा इतिहास वा वर्गीकरणपद्धती यावर तो केव्हाही एक कंटाळवाणे प्रवचन झोडू शकत असे. त्याचे शुद्ध शास्त्रीय गायन या गावंढळ लोकांना काय कळणार असे तो एकदा म्हणताना मी ऐकले. संतापाने माझा जळफळाट झाला.
"तो काळ रेडिओचा नव्हता. आणि मी कधीच कुणाचे गाणे असे ऐकले नव्हते. पण माझ्या गळ्यावर माझा अजाण भरंवसा होता.
"गांवकऱ्यांनी मनधरणी केल्यावर त्याने मोठ्या उदारपणे महादेवाच्या उत्सवात गायचे कबूल केले. उत्सवाच्या दिवशी शहरातून त्याचे साथीदार, आणि तबला, तंबोरा अशी आपरुकीची वाद्ये आली. मी कार्यक्रम सुरू होण्याची धास्तावल्या अधीर मनाने वाट पाहत होतो.
"त्याने गायला सुरुवात केली.
"सुरुवातीला मी त्याकडे भारावून पाहत राहिलो. पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले की त्याच्या गाण्यामागचे सत्य जरी भक्कमपणे उभे होते तरी त्याचे गाणे मात्र अगदीच सुमार होते. त्याचा आवाज भसाडा होत. आणि कापूस पिंजत बसावे तसा तो शब्द चिवडत बसला होता. मध्येच धापा टाकत ताना मारत होता आणि आपल्या साथीदारांकडे साभिप्राय नजरेने पाहत होता. तेही मानेला झटके देत दात विचकत होते.
"मला एकदम पिशाच्च संचारल्यासारखे झाले आणि मी ताडकन उभा राहिलो. तो जे जे गाईल ते ते गाऊन दाखवण्याचे मी त्याला आव्हान दिले.
"जमलेल्या लोकांच्यात खळबळ पसरली. त्याने छद्मी हसून आपल्या साथीदारांकडे पाहिले.
"मी निर्भयपणे वाट काढीत त्याच्यापर्यंत पोचलो आणि त्याने नुकतीच घेतलेली मुळमुळीत, गेंगाणी तान मी घेतली. लोकांची कुजबूज एकदम थांबली आणि ते अपेक्षेने त्याच्याकडे पाहू लागले.
"त्याचे छद्मी हसू विझले होते. धीर करून त्याने पुढे गायला सुरुवात केली. पण मी सावलीसारखा त्याच्या मागे होतोच. त्याचा आवाज वर चढेना. मी वरच्या पट्टीत जाऊन थांबलो आणि अपेक्षेने त्याच्याकडे पाहू लागलो. घाम टिपत त्याने गाणे थांबवले.
"लोकांच्या टाळ्या कडाडल्या, आणि कुजबुजीचा प्रवाह पुन्हा धोधो वाहू लागला. आता कुत्सितपणे हसण्याची माझी पाळी होती.
"गर्दीतून वाट काढत एक साधू माझ्याजवळ आला आणि त्याने आपले हिरवे-घारे डोळे माझ्यावर रोखले. मी शहारलो. 'हे कुत्सित हसू जेव्हा तुझ्या चेहऱ्यावरून नाहीसे होईल तेव्हा आपली पुन्हा भेट होईल' एवढेच बोलून तो गर्दीत दिसेनासा झाला.
"पडेल चेहऱ्याने गवईबुवा आपल्या साथीदारांशी चर्चा करीत होते. मला स्वर-तालाचे ज्ञान कसे नाही, माझा आवाज नुसताच जोरकस कसा आहे पण त्याला बंदिस्तपणा कसा नाही, गायन म्हणजे पैलवानकी नव्हे अशी त्यांची बोलणी चालली होती.
"संगीताच्या पढिक विद्वानांशी ती माझी पहिली भेट.
"मी घरी पोचल्याबरोबर छंदीफंदीपणा केल्याबद्दल वडिलांनी माझी खेटरांनी पूजा बांधली आणि ठणकणारे अंग संभाळीत मी पुन्हा शेतीच्या कामाला लागलो.
"थोड्याच दिवसांनी पावसाबरोबर कसल्यातरी रोगाची साथ पसरली आणि आमच्या घरात माझ्याखेरीज कुणीही उरले नाही.
"सर्वांना अग्नी देऊन आल्यावर मी गाठोडे खांद्यावर मारले नि बाहेर पडलो.
"झोपायच्या वेळेला मी एका गावात पोहोचलो. वेशीवरच्या देवळातून भजनाचा घोष ऐकू येत होता. भारल्यासारखा मी देवळात गेलो आणि बुवांमागोमाग गायला सुरुवात केली. माझ्या खणखणीत आवाजाने सर्वजण चमकले. माझ्याबरोबर राहता राहता बुवांना घाम फुटल्यावर मी तुच्छतेने त्यांच्याकडे पाहिले आणि त्या गावातून निघून गेलो.
"त्यानंतर त्या भागात माझ्याभोवती गूढतेचे एक वलय निर्माण झाले. नरभक्षक वाघासारखा मी रात्र पडेस्तोवर गावाबाहेर दबा धरून बसत असे आणि मग गावात शिरून जिथे भजन चालू असेल तिथे जाऊन बुवांची फजिती करीत असे. माझ्या गर्वाला मर्यादा उरली नव्हती. अखेर माझ्या भीतीने त्या पंचक्रोशीतली भजने थांबली.
"असाच भटकंतीत असताना मी एका अरण्यात नदीकाठी असलेल्या एका आखीव देवळाच्या ओसरीत विसावलो. आत पुजारी बहुधा पूजेची खटपट करीत असावा. त्याच्या पुटपुटण्याचा आवाज गाभाऱ्यातून बाहेर पाझरत होता. त्याचा अंधुक प्रतिध्वनी त्याची साथ करीत होता.
"मला अचानक सुरसुरी आली आणि मी आठवेल ते गायला सुरुवात केली. मी किती वेळ गात होतो मला आठवत नाही. गाभाऱ्याच्या दरवाज्याकडे लक्ष जाताच मी थबकलो. माझ्या गाण्याचे प्रतिध्वनी हळूहळू विरळ झाले.
"दरवाज्यात एक वृद्ध उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर लहान मुलाची निरागसता होती. त्याची मान नाही-नाही म्हणत हलत होती. 'अहंकाराची वस्त्रे उतरवल्याखेरीज काहीही साधत नाही', तो पाऊसधारेच्या निर्मळपणे म्हणाला. हळूहळू सरकत त्याने उंबऱ्यावर बसकण मारली. आणि गायला सुरुवात केली.
"क्षणार्धात माझी मान शरमेने खाली झुकली. त्याचा आवाज सुरेल आणि खणखणीत होता. त्यातून एक भव्यदिव्य चित्र आकार घेत होते. त्यात धूसर, तांबूस, किरमिजी रंग भरले गेले आणि त्यांच्या साक्षीने तो परमेश्वराची आळवणी करीत होता. पण त्या आळवणीत 'मला मोक्ष दे' अशी तोंड वेंगाडणारी याचना नव्हती, तर तो जणू बरोबरीच्या नात्याने परमेश्वराशी संवाद साधत होता.
"त्या गाण्याच्या नशेतून बाहेर पडल्यावर मी भानावर येऊन त्याच्याकडे पाहिले.
"बसल्याजागीच त्याचे प्राणोत्क्रमण झाले होते.
"कुणीतरी खेचत नेल्यासारखा मी तिथून चालत निघालो आणि अशाच पौर्णिमेच्या रात्री याच सुमारास आपण आत्ता बसलो आहोत तिथे येऊन पोहोचलो.
"या अंगणामध्ये धुनी पेटवून मला आमच्या गावात गूढपणे भेटलेला तो हिरव्या-घाऱ्या डोळ्यांचा साधू बसला होता. जणू माझीच वाट बघत.
"'होय, मी तुझीच वाट बघत होतो', तो साधू म्हणाला. मी दचकलो आणि माझ्या हातातले गाठोडे खाली पडून या दरीत दिसेनासे झाले. तो या सर्व गोष्टींकडे संतोषाने पाहत होता.
"'तुझ्या शरीराखेरीज बाकीचा भूतकाळ आता नाहीसा झाला', तो समाधानाने म्हणाला. 'नाहीतरी शरीराखेरीज बाकीच्या कुठल्याही गोष्टींना काळ नसतो. ही गोष्ट इतकी जुनी आहे आणि ती गोष्ट तितकी जुनी आहे या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. कारण हे जुने-नवेपण आपणच आपल्या अनुभूतीमार्फत लादत असतो. माझ्या दृष्टीने म्हणशील तर आयुष्य म्हणजे एका क्षणाचाच खेळ आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत तो एकच क्षण पसरला आहे. गेलेला क्षण किंवा येणारा क्षण आणि आपण आत्ता अनुभवत असलेला क्षण शेजारी शेजारी मांडून निरखता येत नाहीत तोपर्यंत भूतकाळ आणि भविष्यकाळ या शब्दांना आपले अज्ञान झाकायला पांघरलेल्या मुखवट्यांखेरीज काय अस्तित्व आहे? आकाशातल्या चांदण्यांचे किंवा समुद्रातल्या पाण्याचे मी दहा समान भाग करू शकेन. आणिक कोणी सात भाग करू शकेल, आणिक कोणी सतरा. कारण आकाशात चांदण्या किती वा समुद्रात पाणी किती हे कुणालाच ठाऊक नाही. भाषेच्या कुंपणात एकदा स्वतःला घालून घेतले म्हणजे त्या कुंपणापलिकडे काहीही नाही हे सिद्ध करणे अवघड नाही.
"कारण त्यापलिकडे काही आहे हे भाषेच्या बेडीत जखडून घेऊन दाखवता येत नाही. आणि त्या कुंपणापलिकडे स्वतः गेले गर भाषेच्या बंधनात जखडलेल्या लोकांशी संवादाचे मार्ग बंद होतात.
"भाषेत सर्व काही सामावले आहे हे दाखवण्यासाठी त्या कुंपणात वेगवेगळे तुकडे पाडून त्याला कला, शास्त्र असली नावे चिकटवली जातात आणि बाहेर काही असेल का असे कुतूहल मनी बाळगणारे त्यात गुरफटत जातात.
"जाणता, वा अजाणता, तू त्या कुंपणाबाहेर निरखायचा प्रयत्न केलास खरा, पण त्या कुंपणापलिकडे पाहता आले तर आपला जय झाला अशी भाषेची बेडी नकळत तुझ्या पायात पडली होतीच. आज ती बेडी तू तोडलीस.
"मी कुणी ज्ञानी माणूस नव्हे. कारण ज्ञानप्राप्ती, सत्यप्राप्ती, मोक्षप्राप्ती या पुन्हा भाषेतल्याच भराऱ्या झाल्या. तसल्या चिठ्ठ्या डकवून प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. कारण खरे प्रश्न तिथे सुरू होतात.
"तेव्हा गुरू या नात्याने मी तुला उपदेश करीत नाहीये. तू जी वाट तुडवू पाहतो आहेस त्यातला काही भाग मी तुडवला आहे. पण मी कुठे पोहोचलो का, किंवा, त्या दिशेवरची ती एकच वाट होती का, मला माहीत नाही. त्यामुळे आढ्यतेने मी तुला उपदेश करण्यात काहीच अर्थ नाही. मला जाणवलेल्या काही गोष्टी मी तुला सांगतो आहे. त्या उपयोगाच्या आहेत की नाही हे तुझे तू ठरव.
"संगीताच्या बाबतीत मी एकच सांगू शकेन. भाषेच्या बेड्या तोडणारी ती एकच शक्ती मला माहीत आहे. पण मग आपण संगीताच्या बेड्यांनी जखडले जातो का, आणि भाषेच्या बेड्या खरोखर तुटतात की तो एक भास असतो हे मात्र मला अजूनही उमजलेले नाही.
"हे सर्व तुझे तुलाच शोधायचे आहे.
"अंतिम सत्य असे काहीतरी आहे आणि आपल्या जाणिवांमार्फत आपण त्याकडे पोचण्याचा प्रामाणिक यत्न करतो आहोत या संकल्पनेची बेडी काही मला तोडता आली नाही. ज्ञाताचे उत्तर अज्ञातात शोधण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे असेल, ती बेडी जर तुटली तर आपल्या जाणीवांना नवीन परिमाण प्राप्त होईल असे मला वाटते. यात काही अर्थ आहे की नाही, आणि तुला असे वाटेल की नाही हे मला माहीत नाही.
"गाणे मात्र मला जेवढे परिचित आहे असे मला वाटते ते मी तुला आत्ता दान करणार आहे.
"एवढे सगळे सांगताना मला भाषेचाच आधार घ्यावा लागला ही आपली होणारी क्रूर थट्टा असेल, किंवा भाषेच्या कुंपणात कधीतरी परतावेच लागते असे असेल.'
"गुहेच्या दारात बसून त्याने स्वरांना लवचिकपणे गोंजारायला सुरुवात केली. मागून येणाऱ्या खोल प्रतिध्वनीच्या संगतीने सूर मला वेढू लागले. खालून येणाऱ्या लाटांच्या धीम्या तालावर त्याचे गाणे सुरू झाले.
"त्याने खांद्याला धरून हलवले तेव्हा मी जागा झालो. 'माझी जाण्याची वेळ झाली', तो म्हणाला. मी वाकून त्याचे पाय पकडले. तो विषण्णपणे हसला. 'अखेर तू मला गुरू केलेस. माझ्याबद्दल आदर दाखवलास. मला जे जाणवते ते तू समजू शकत नाहीस आणि तुला जे जाणवते ते मी समजू शकत नाही. मग हा आदर कशासाठी?
"मी आता निघतो. माझी जाण्याची वेळ झाली हे मला कसे कळले याबद्दल आश्चर्य वा आदर बाळगू नकोस. कितीही जखडल्या गेल्या तरी संवेदना जाग्या ठेवल्या तर कुणालाही ते लख्ख दिसते.'
"माझ्याकडे पाठ वळवून तो चालू लागला आणि त्या कड्यावरून त्याने खाली उडी घेतली.
"त्यानंतर मी परत समाजात आलो. प्रसिद्ध झालो. मानमरातब मिळू लागले. ते मी नाकारले नाहीत. कारण मान मिळवण्याचा अट्टाहास करणे आणि ते मिळत असताना नाकारण्याचा अट्टाहास करणे मला सारख्याच क्षुद्रतेचे वाटते.
माझ्या या निर्विकारपणामुळे माझ्याभोवती शाब्दिक पंडितांनी एक वलय निर्माण केले. माझ्या गाण्यातली आशयघनता, त्यातील विश्वव्यापक अनुभूती अशा शब्दांचा खल सुरू झाला.
"मला या शब्दांचा अर्थ माहीत नाही. मला या शब्दांचे आकर्षण वाटले असते, जर त्या पंडितांच्या जाणीवांचा थांग मला लागला नसता तर. पण केव्हा ना केव्हातरी त्यांच्या अनुभूतीचा तळ मला दिसून गेला. ज्याची खोली कळू शकते त्या गोष्टीबद्दल आदर वा आकर्षण का वाटावे?
"संगीत मात्र मला एकंदरीत हुलकावण्या देत राहिले. संगीतच असे नव्हे, तर एकूणच जीवन.
"संगीतामार्फत संवाद साधू शकेन असे वाटणारी एक व्यक्ती माझ्या जीवनात येऊन गेली.
"ती एक नर्तकी होती. एका देवळाच्या मंडपात एका धुकट पहाटे ती नृत्य करताना मला दिसली. तिचे शरीर, तिचे मन, तिचे अस्तित्व, सर्व आपल्यासोबत  वाटचालीला असावे अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.
"बसल्या जागेवरूनच मी गायला सुरुवात केली. नृत्य थांबवून ती माझ्याकडे येऊ लागली. आमची नजरानजर होताच झळझळीत धग माझ्या रक्तातून पसरली. भाषा, संगीत, आपले अस्तित्व, हे सगळे मी दुरून न्याहाळू लागलो. मंत्रून घातल्यासारखी ती चालत होती.
"एवढ्यात तिच्या पायातळी एका नागाने फडा काढला. चाबकाचा फटकारा मारावा तेवढ्या ताकदीने तो फडा तिच्या पोटरीवर आपटून त्याने तिला दंश केला आणि तो खाली पडला.
"दहा पावलांचे अंतर मी तोडेपर्यंत तिने डोळे मिटले होते. मी अविश्वासाच्या नजरेने खाली पसरलेल्या नागाकडे पाहिले. सर्व अंग दगडांनी ठेचला गेलेला तो नाग मृत्यू पावला होता. पण मरताना असेल नसेल ते विष एकवटून त्याने त्याच्या मरणाला जबाबदार असलेल्या मानवजातीचा हिशेब चुकता केला होता.
"तेव्हापासून आपल्या संवेदनांविषयी माझ्या मनात एक अविश्वासाची भावना कायम घर करून राहिली.
"मी संगीताचा पिच्छा पुरवला. पण ती भावना काही मनातून गेली नाही. आणि त्यामुळेच कदाचित, संगीतातही माझे मन पूर्णांशाने रमले नाही.
"परवा गाताना मला अचानक जाणीव झाली की संगीताच्या क्षेत्रात माझ्याकडून घडणारी अत्त्युच्च कामगिरी ती हीच. खरोखरीच तसे असेल, किंवा पुढे जात राहण्याची माझी उभारी मोडून पडली असेल.
"दोन्हींचा अर्थ माझ्यादृष्टीने एकच. माझी वेळ संपली.
"माझ्या गुरूंनी मला दिला तसा मी तुला गाण्यातून निरोप देऊ शकत नाही. कारण माझ्यालेखी गाण्याची माझी पात्रता संपली आहे. "
ते चालत कड्याच्या टोकावर गेले आणि त्यांनी आपले शरील खाली लोटून दिले.
सर्वत्र शांतता पसरली होती आणि समुद्र खिन्नपणे चमकत होता.

Post to Feed
Typing help hide