ऑक्टोबर २६ २००४

अकरावा अध्याय

[३३]

अर्जुन म्हणाला

करूनि करूणा माझी बोलिलास रहस्य जे ।
त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥

उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर ।
कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥

तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे ।
ते चि मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरूषोत्तमा ॥ ३ ॥

तू जरी मानिसी शक्य मज ते रूप पाहणे ।
तरी योगेश्वरा देवा दाखवी ते चि शाश्वत ॥ ४ ॥

श्री भगवान् म्हणाले

पहा दिव्य तशी माझी रूपे शत-सहस्र तू ।
नाना प्रकार आकार वर्ण ज्यात विचित्र चि ॥ ५ ॥

वसु वायु पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी ।
पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली ॥ ६ ॥

इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर ।
माझ्या देहांत एकत्र इच्छा-दर्शन हे तुज ॥ ७ ॥

परी तू चर्म-चक्षूने पाहू न शकसी मज ।
घे दिव्य दृष्टि ही माझा ईश्वरी योग तू पहा ॥ ८ ॥

संजय म्हणाला

महा-योगेश्वरे कृष्णे राया बोलूनि ह्यापरी ।
दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी ॥ ९ ॥

बहु डोळे मुखे ज्यांत दर्शने बहु अद्भुत ।
बहु दिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु ॥ १० ॥

दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी ।
आश्चर्ये भरला देव विश्व-व्यापी अनंत तो ॥ ११ ॥

प्रभा सहस्र-सूर्यांची नभी एकवटे जरी ।
तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चि ती ॥ १२ ॥

सारे जगांतले भेद तेंव्हा कालवले जसे ।
देहांत देव-देवाच्या देखिले तेथ अर्जुने ॥ १३ ॥

मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले ।
प्रभूस हात जोडूनि बोलिला नत-मस्तक ॥ १४ ॥

[३४]

अर्जुन म्हणाला

देखे प्रभो देव तुझ्या शरीरी ।
कोंदाटले सर्व चि भूत-संघ ॥
पद्मासनी ध्यान धरी विधाता ।
ऋषींसवे खेळत दिव्य सर्प ॥ १५ ॥

लेऊनि डोळे मुख हात पोट ।
जिथे तिथे तू चि अनंत-मूर्ते ॥
विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ ।
तुझ्या न मी देखत विश्व-रूपी ॥ १६ ॥

प्रभो गदा-चक्र-किरीट-धारी ।
प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड ॥
डोळे न पाहू शकती अपार ।
ज्यांतूनि हे पेटत अग्नि-सूर्य ॥ १७ ॥

तू थोर ते अक्षर जाणण्याचे ।
तुझा चि आधार जगास अंती ॥
तू राखिसी शाश्वत-धर्म नित्य ।
मी मानितो तू परमात्म-तत्त्व ॥ १८ ॥

किती भुजा वीर्य किती पसारा ।
डोळे कसे उज्ज्वल चंद्र-सूर्य ॥
हा पेटला अग्नि तुझ्या मुखात ।
तू ताविसी सर्व चिआत्म-तेजे ॥ १९ ॥

दाही दिशा विस्तृत अंतराळ ।
व्यापूनि तू एक चि राहिलासी ॥
पाहूनि हे अद्भूत उग्र रूप ।
तिन्ही जगे व्याकुळली उदारा ॥ २० ॥

हे देव सारे रिघती तुझ्यांत ।
कोणी भये प्रार्थित बद्ध-हस्त ॥
मांगल्य-गीते तुज सिद्ध संत ।
परोपरी आळविती समस्त ॥ २१ ॥

आदित्य विश्वे वसु रुद्र साध्य ।
कुमार दोघे पितृ-देव वायु ॥
गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध ।
सारे कसे विस्मित पाहताती ॥ २२ ॥

अफाट हे रूप असंख्य डोळे ।
मुखे भुजा ऊरू असंख्य पाय ॥
असंख्य पोटे विकराळ दाढा ।
ह्या दर्शने व्याकुळ लोक मी हि ॥ २३ ॥

भेदूनि आकाश भरूनि रंगी ।
फाडूनि डोळे उघडूनि तोंडे ॥
तू पेटलासी बघ जीव माझा ।
भ्याला न देखे शम आणि धीर ॥ २४ ॥

कराळ दाढा विकराळ तोंडे ।
कल्पांत-अग्नीसम देखतां चि ॥
दिङ्-मूढ झालो सुख ते पळाले ।
प्रसन्न हो की जग हे तुझे चि ॥ २५ ॥

अहा कसे हे धृतराष्ट्र-पुत्र ।
घेऊनिया राज-समूह सारे ॥
हे भीष्म हे द्रोण तसा चि कर्ण ।
हे आमुचे वीर हि मुख्य मुख्य ॥ २६ ॥

जाती त्वरेने चि तुझ्या मुखांत ।
भयाण जी भ्यासुर ज्यांत दाढा ॥
दातांत काही शिरली शिरे जी ।
त्यांचे जसे पीठ चि पाहतो मी ॥ २७ ॥

जसे नद्यांचे सगळे प्रवाह ।
वेगे समुद्रांत चि धाव घेती ॥
तसे तुझ्या हे जळत्या मुखांत ।
धावूनि जाती नर-वीर सारे ॥ २८ ॥

भरूनिया वेग जसे पतंग ।
घेती उड्या अग्नि-मुखी मराया ॥
तसे चि हे लोक तुझ्या मुखांत ।
घेती उड्या वेग-भरे मराया ॥ २९ ॥

समस्त लोकांस गिळूनि ओठ ।
तू चाटितोसी जळत्या जिभांनी ॥
वेढूनि विश्वास समग्र तेजे ।
भाजे प्रभो उग्र तुझी प्रभा ही ॥ ३० ॥

सांगा असा कोण तुम्ही भयाण ।
नमूं तुम्हां देव-वरा न कोपा ॥
जाणावया उत्सुक आदि-देवा ।
ध्यानी न ये की करणी कशी ही ॥ ३१ ॥

श्री भगवान् म्हणाले

मी काळ लोकांतक वाढलेला ।
भक्षावया सिद्ध इथे जनांस ॥
हे नष्ट होतील तुझ्या विना हि ।
झाले उभे जे उभयत्र वीर ॥ ३२ ॥

म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ति ।
जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी ॥
मी मारिले हे सगळे चि आधी ।
निमित्त हो केवळ सव्य-साची ॥ ३३ ॥

द्रोणास भीष्मास जयद्रथास ।
कर्णादि वीरांस रणांगणात ॥
मी मारिलेल्यांस फिरूनि मारी ।
निःशंक झुंजे जय तो तुझा चि ॥ ३४ ॥

[३५]

संजय म्हणाला

ऐकूनि हे अर्जुन कृष्ण-वाक्य ।
भ्याला जसा कापत हात जोडी ॥
कृष्णास वंदूनि पुनश्च बोले ।
लवूनिया तेथ गळा भरूनि ॥ ३५ ॥

अर्जुन म्हणाला

जगी तुझ्या युक्त चि कीर्तनाने ।
आनंद लोटे अनुराग दाटे ॥
भ्याले कसे राक्षस धाव घेती ।
हे वंदिती सिद्ध-समूह सारे ॥ ३६ ॥

प्रभो न का हे तुज वंदितील ।
कर्त्यास कर्ता गुरू तू गुरूस ॥
आधार तू अक्षर तू अनंता ।
आहेस नाहीस पलीकडे तू ॥ ३७ ॥

देवादि तू तू चि पुराण आत्मा ।
जगास ह्या अंतिम आसरा तू ॥
तू जाणतोसी तुज मोक्ष-धामा ।
विस्तारिसी विश्व अनंत-रूपा ॥ ३८ ॥

तू अग्नि तू वायु समस्त देव ।
प्रजापते तू चि पिता वडील ॥
असो नमस्कार सहस्र वार ।
पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा ॥ ३९ ॥

समोर मागे सगळीकडे चि ।
असो नमस्कार जिथे जिथे तू ॥
उत्साह सामर्थ्य तुझे अनंत ।
तू सर्व की सर्व तुझ्या चि पोटी ॥ ४० ॥

समान मानी अविनीत-भावे ।
कृष्णा गड्या हाक अशी चि मारी ॥
न जाणता हा महिमा तुझा मी ।
प्रेमे प्रमादे बहु बोल बोले ॥ ४१ ॥

खेळे निजे स्वैर चि खात बैसे ।
चेष्टा करी सर्व तुझ्या समोर ॥
जनी मनी वा तुज तुच्छ लेखे ।
क्षमा करी भान तुझे कुणास ॥ ४२ ॥

आहेस तू बाप चराचरास ।
आहेस मोठी गुरू-देवता तू ॥
तुझी न जोडी तुज कोण मोडी ।
तिन्ही जगी ह्या उपमा चि थोडी ॥ ४३ ॥

म्हणूनि लोटांगण घालितो मी ।
प्रसन्न होई स्तवनीय-मूर्ते ॥
क्षमा करी बा मज लेकराते ।
सखा सख्याते प्रिय तू प्रियाते ॥ ४४ ॥

अपूर्व पाहूनि अपार धालो ।
परी मनी व्याकुळता न जाय ॥
पुन्हा बघू दे मज ते चि रूप ।
प्रसन्न होई जगदीश्वरा तू ॥ ४५ ॥

घेई गदा चक्र किरीट घाली ।
तसे चि पाहू तुज इच्छितो मी ॥
अनंत बाहूंस गिळूनि पोटी ।
चहू भुजांचा नट विश्व-मूर्ते ॥ ४६ ॥

[३६]

श्री भगवान् म्हणाले

प्रसन्न होऊनि रचूनि योग ।
हे दाविले मी तुज विश्व-रूप ॥
अनंत तेजोमय आद्य थोर ।
जे पाहिले आजवरी न कोणी ॥ ४७ ॥

घोकूनिया वेद करूनि कर्मे ।
यजूनि वा उग्र तपे तपूनि ॥
देऊनि दाने जगती न शक्य ।
तुझ्याविना दर्शन हे कुणास ॥ ४८ ॥

होऊ नको व्याकुळ मूढ-भावे ।
पाहूनि हे रूप भयाण माझे ॥
प्रसन्न-चित्ते भय सोडुनी तू ।
पहा पुन्हा ते प्रिय पूर्व-रूप ॥ ४९ ॥

संजय म्हणाला

बोलूनि ऐसे मग वासुदेवे ।
पार्थास ते दाखविले स्वरूप ॥
भ्याल्यास आश्वासन द्यावया तो ।
झाला पुन्हा सौम्य उदार देव ॥ ५० ॥

अर्जुन म्हणाला

पाहूनि हे तुझे सौम्य मानुषी रुप माधवा ।
झालो प्रसन्न मी आता आळो भानावरी पुन्हा ॥ ५१ ॥

श्री भगवान् म्हणाले

हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन ।
आशा चि राखुनी ज्याची झुरती नित्य देव हि ॥ ५२ ॥

यज्ञ-दान-तपे केली वेदाभ्यास हि साधिला ।
तरी दर्शन हे माझे नलाभे लाभले तुज ॥ ५३ ॥

लाभे अनन्य-भक्तीने माझे हे ज्ञान-दर्शन ।
दर्शने होय माझ्यांत प्रवेश मग तत्त्वतां ॥ ५४ ॥

माझ्या कर्मांत जो मग्न भक्तीने भरला असे ।
जगी निःसंग निर्वैर मिळे तो मज मत्पर ॥ ५५ ॥

अध्याय अकरावा संपूर्ण

Post to Feed
Typing help hide