वंदे मातरम्

बंकिमचंद्रांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम् हे गीत बंगाल मधील मुला मुलांच्या ओठी गायले जाऊ लागले. एकमेकांना भेटल्यावर 'नमस्कार' असे म्हणण्याऐवजी लोक 'वंदे मातरम्' असे म्हणू लागले. अर्थातच सरकाराला हे परवडण्यासारखे नव्हते. लवकरच वंदे मातरम् चा उच्चार हा देखील अपराध ठरू लागला.


खुदीराम बोस या शाळकरी मुलाला हा शब्द विलक्षण आवडला. त्याने हे गीत संपूर्ण पाठ केले व ते जास्तीत जास्त मित्रांना ऐकवण्याचा ,माहीत करून देण्याचा व त्याचा अर्थ समजावून सांगण्याचा ध्यास घेतला. १९०६ मध्ये मिदनापूर येथे भरलेल्या सरकारी प्रदर्शनात अनेक चित्रे, कठपुतळ्या वगरेद्वारे देखावे निर्माण केले होते. त्यातून असा संदेश दिला जात होता की मायबाप इंग्रज सरकार दयाळू व न्यायप्रिय असून ते समाजाच्या उन्नतीसाठी व भारताच्या कल्याणासाठी किती झटते आहे. या प्रदर्शनस्थळी १६ वर्षांचा खुदिराम आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होता. तो तिथे प्रदर्शन पाहायला नव्हता आला तर तो पत्रके वाटत होता. या पत्रकाचे शीर्षक होते 'सोनार बांगला'. या पत्रकात इंग्रजांचे जुलूम व अंदाधुंद कारभार यांचा पाढा वाचला होता व अनेक उदाहरणेही दिली होती. या पत्रकात 'वंदे मातरम्' ही घोषणाही ठळक अक्षरात झळकत होती. काही सरकारधार्जिण्यांनी ही खबर पोलिसांना दिली. पोलिसाने हटकले व खुदीरामच्या हातातली पत्रके हिसकावून घेतली. त्याने खुदीरामला दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्याच्या बेसावधपणाचा फायदा घेत खुदीरामने त्याच्या नाकावर जोरदार ठोसा हाणला व त्याच्या हातातील पत्रके खेचून घेत पोबारा केला. अर्थात तो पकडला गेला, पण लहान वय पाहून त्याला सोडून दिले गेले.


बंगालच्या फाळणीने अस्वस्थ झालेले बंगाली तरुण काय करायचे याचे बेत करत होते. अनुशिलन समिती व अशा अनेक संघटना जन्माला आल्या होत्या. सरकारही खवळले होते. वंदे मातरम् असे म्हणणे हा राजद्रोह घोषित केला गेला ओता. अस्मिता दडपण्यासाठी सरकार देशभक्तांचा छळ करीत होते. वंदे मातरम् या प्रसिद्ध वर्तमानपत्राचे संपादक बिपीनचंद्र पाल यांच्यावरही खटला भरला गेला. न्यायालयासमोर जमलेले लोक वंदे मातरम् च्या घोषणा देत होते. त्या निःशस्त्र जनसमुदायावर अमानुष लाठीहल्ला झाला. न्यायाधीश किंगज्फोर्ड अन्याय व जुलूम यांची पराकाष्ठा करत होता. चळवळ दडपण्यासाठी सरकारने खास निवडलेल्या क्रूर प्रशासकांपैकी तो एक होता. अशाच एका खटला ऐकण्यासाठी जमलेल्या जनसमुदायावर एका मस्तवाल इंग्रजी पोलीस अधिकाऱ्याने अचानक नाहक हातातली लाठी गोल फिरवत लोकांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी सुशीलकुमार सेन हा महाविद्यालयीन विद्यार्थी एकटा पुढे आला व त्याने त्या इंग्रजाची लाठी खेचून घेत त्याला जाब विचारला व पिटून काढला. सुशीलला सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलल्याबद्दल अटक करून किंग्जफोर्ड पुढे केले गेले. त्याने त्या लहान मुलाला १५ फटक्यांची सजा सुनावली. त्या मुलाने वंदे मातरम् चा घोष करत ते फटके सहन केले. लोकांनी त्याचा जयजयकार केला व सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी त्याच्या गळ्यात पदक घातले. मात्र लहान मुलाला निर्दय शिक्षा सांगणाऱ्या जुलमी न्यायाधीशाला अद्दल घडवण्याचा निश्चय क्रांतिकारकांनी केला.


दरम्यान किंग्जफोर्ड ला बढती देण्यात आली, तो मुजफ्फरनगर येथे रुजू झाला. अर्थात त्याला सजा देण्यात यामुळे काहीच फरक पडणार नव्हता. ही कामगिरी खुदीरामने मागून घेतली. तू ही कामगिरी घेतो आहेस खरा पण तुला त्याचे परिणाम माहीत आहेत का? असे विचारताच त्याने शांतपणे सांगितले की हो माहीत आहे, फारतर फार फाशी देतील. मग ही कामगिरी खुदीरामवर सोपवली गेली व त्याच्या जोडीला प्रफुल्ल्कुमार चाकी या त्याच्याच वयाच्या मुलाची निवड झाली.


३० एप्रिल १९०८. खुदीराम व चाकी युरोपिअन क्लब येथे दबा धरून बसले होते. किंग्जफोर्ड ची बग्गी येताच खुदीरामने अगदी जवळ जात आंत बाँब फेकला. कानठळ्या बसवणारा आवाज व पाठोपाठ किंकाळ्या ऐकू येताच कामगिरी फत्ते असे समजून खुदीराम व चाकी तेथून पळाले. कामगिरी फत्ते झाली तरी सावज हुकले होते. त्या गाडीत नेमका किंग्जफोर्ड नव्हताच तर त्याच्या मित्राची पत्नी , मुलगी व त्याचा नोकर हे होते.


लोहमार्गाच्या कडेने रात्रभर धावून, खणाचीही उसंत घेऊन खुदीराम सकाळी लाखा गावात पोचला. तो भयंकर थकला होता त्याने थोडी विश्रांती घेतली. भूक लागल्यामुळे तो बाजारात खायला घेण्यासाठी गेला. मक्याच्या लाह्या खाता खाता त्याने बॉम्बहला व त्यातून किंग्जफोर्ड वाचल्याची चर्चा ऐकली. तो उत्तेजित होऊन उद्गारला,' किंग्जफोर्ड वाचला? तो कसा काय?' यामुळे अनेकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. हा मुलगा या गावातला नसावा हेही लोकांच्या लक्षात आले. तो पाणी पीत असतानाच दुकानदाराने गस्तींवरच्या शिपायाला खुणेने बोलावले आणि खुदीराम पोलिसांच्या हाती सापडला. पाठोपाठ प्रफ़ुलल चाकी सुद्धा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मात्र आपण पोलिसांच्या हाती कधीच जिवंत पडणार नाही अशी प्रतिज्ञा केलेल्या प्रफुल्लने गोळी स्वतःवर झाडून घेत हौतात्म्य पत्करले खुदीरामला खटला चालून आधी ठरलेली फाशीची शिक्षा झाली. त्याच्या चेहऱ्यावर यत्किंचितही भय वा चिंता नव्हती. त्याचा निर्विकार चेहरा पाहून त्याला विचारले की त्याला या शिक्षेचा अर्थ माहीत आहे काय? त्याने सांगितले की मला अर्थ तुमच्याहून व्यवस्थित समजतो. हिंदुस्थानातील इंग्रजावर बाँब टाकणाऱ्या पहिल्या वीराला पाहायला खूप गर्दी जमली होती. तुला काही सांगायचे आहे का असा पश्न विचारतात खुदीरामने सांगितले, की "होय, मला बाँब  कसा करायचे आहे ते सर्वाना सांगायचे आहे. अर्थातच ही विनंती अमान्य झाली.


दिनांक ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी अवघा १८ वर्षे आणि ८ महिने वयाचा खुदिराम 'वंदे मातरम्' च्या घोषणा देत फासावर गेला.


 khudiram_bose