ऑगस्ट २४ २००६

भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ३

ह्यासोबत

          याआधीच्या लेखात आपण भाषेच्या नैसर्गिक विकासाचे टप्पे व भाषेचा प्राथमिक विकास हा उत्क्रांतीचा वारसा आहे ते पाहिले.  या अनुषंगाने मेंदूच्या रचनेचा आढावा घेतला.  आता मानवाच्या मेंदूच्या कोणत्या भागात आणखी कोणती कार्ये चालतात ते पाहू.  या सर्वांचा आपल्याला भाषेचे बाजूकरण कसे होते, केव्हा होते , डावखुऱ्या माणसात त्याचा मेंदू कसे कार्य करतो हे समजवून घेण्यास मदत होईल.

मेंदूच्या अर्धगोलांत कार्याची विभागणी

मानवाचा डावा मेंदू अधिक प्रबल आहे हे सत्य असले तरी डाव्या आणि उजव्या मेंदूत उच्चस्तरीय बौद्धिक कार्याची विभागणी झाली आहे - विश्लेषण, उपलब्ध माहितीच्या आधारे निश्चित अशी कारणमीमांसा(analysis and deduction), एका वेळी एक आणि एकापाठोपाठ एक असे साखळी पद्धतीने विचार(serial thinking) ही कार्ये मेंदूच्या डाव्या अर्धगोलात होतात. समस्यांची तर्कशुद्ध बौद्धिक मीमांसा सुद्धा डाव्या अर्धगोलात होते.

उपलब्ध माहितीचे संकलन, थोड्या माहितीच्या आधारे बऱ्याच मोठ्या अंदाजाची बांधणी , वेगवेगळ्या विचारधारांचा एकाच वेळी पाठपुरावा(parallel thinking) ही कार्ये उजव्या अर्धगोलात होतात.  स्वाभाविक अंतःप्रेरणा व मनोभावना यांच्या आधारे एखादा प्रश्न सोडवणे, एखाद्या गोष्टीची चिकित्सा व उद्बोधन ही कार्ये मेंदूच्या उजव्या अर्धगोलात होतात.

थोडक्यात आपण ज्याला बौद्धिक म्हणतो ते मेंदूचे व्यापार डाव्या अर्धगोलात होतात. उजव्या हाताने कामे करणाऱ्या माणसाचा डावा अर्धगोल अधिक प्रभावी असतो. गणित, गहन शास्त्रीय प्रश्नांवर विचार , वाणीचे उद्बोधन , साहित्यलेखन ही डाव्या अर्धगोलाची मक्तेदारी आहे.  ज्या व्यक्ती गणितात प्राविण्य मिळवतात त्या उत्तम साहित्यिकही होऊ शकतात वा उत्तम साहित्यिक गणितात प्राविण्य मिळवू शकतात असेही म्हणता येईल, कारण ही दोन्ही कामे डाव्या अर्धगोलाची आहेत. कित्येकदा आवड, परिस्थिती व इतर काही कारणांनी हे प्रत्यक्षात शक्य होत नाही त्यामुळे मला भाषा जास्त येते, गणित कसे येणार असे गैरसमज सुद्धा निर्माण होतात.

जेव्हा माणूस बारकाव्यांचा, सूक्ष्म तपशीलांचा विचार करतो तेव्हा तो डावा अर्धगोल वापरतो. समीरकरणे सोडवताना डावा अर्धगोल वापरतो. पण माणूस जेव्हा व्यापक ,ढोबळ स्वरूपाची वैचारिक क्रिया करतो तेव्हा त्याच्या मेंदूचा उजवा अर्धगोल कार्यरत असतो. प्रदूषण वाढत राहिले तर मानवावर त्याचा काय परिणाम होईल असा व्यापक विचार माणसाच्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलात चालतो.

मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमध्ये संदेशांचे दळवळण सुरु असते. अनेक वेळा काही कारणाने डावा मेंदू निकामी झाला तर त्याचे काम उजवा भाग करतो असे सुद्धा आढळले आहे.

 मेंदूच्या उजव्या आणि डाव्या अर्धगोलांच्या कार्याची तुलना पुढील कोष्टकात केली आहे. जगण्यासाठी, संरक्षणासाठी लागणारे कौशल्य हे डाव्या मेंदूत रूजले आहे असे अनुमान त्यावरून काढता येईल.

 मेंदूचा डावा अर्धगोल                 मेंदूचा उजवा अर्धगोल

खोल विचार, विश्लेषणशक्ती      ढोबळ , स्थूलमानाने विचार

गणिते, शास्त्रे                         संगीत, रंग, चित्रे

कालाधिष्ठीत विचार                  स्थलाधिष्ठीत विचार   

वाणीच्या ध्वनींचे बोधन             निःशब्द अभिव्यक्ती

बौद्धिक प्रक्रिया                      भावनिक प्रकिया

 भाषेचे बाजूकरण(lateralization of language)

 अगदी अनादिकालापासून उजव्या हाताने माणूस शस्त्रे बनवायला शिकला व सहकाऱ्यांशी ध्वनिसंवाद करू लागला. तेव्हापासून उजवा हाताच्या स्नायूंचे कार्य व वाणीकार्य डाव्या मेंदूत बिंबले आहे.  पण हे वाणीचे बाजूकरण जन्मतः झालेले नसते. ते ठराविक वयात सुरू होते. साधारण हे बाजूकरण सहाव्या वर्षी सुरू होते व अंदाजे बाराव्या तेराव्या वर्षी पूर्ण होते असे संशोधकांचे म्हणणे आहे. बाजूकरणाविषयी एकमत असले तरी ते केव्हा पूर्ण होते याविषयी एकमत नाही.  हे बाजूकरण एकदा पूर्ण झाले की नवीन भाषा शिकणे बरेच कठीण होते. हे पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही भाषांविषयी आढळले आहे. जसजसे हे बाजूकरण डाव्या मेंदूत पक्के होते तसतसे इतर भाषांचे, ध्वनींचे, उच्चाराचे विविध पर्याय मेंदूतून नाहीसे होतात.  मग दुसऱ्या भाषेचे उच्चार सहज प्राप्त होत नाहीत ते शिकावे लागतात. परभाषिकांना आपल्या भाषेतील व आपल्याला परभाषेतील उच्चार हुबेहूब करता येत नाहीत असा एकंदरीत अनुभव आहे. म्हणूनच दुसरी भाषा शिकण्याची सुरूवात लहानपणी व लवकरात लवकर करायची असते.   वाणीचे शुद्ध उच्चार लहानपणी मेंदूत ठ्सणे का आवश्यक आहे ते आपल्या लक्षात आले असेलच.  ध्वनीभांडार कमी असणारी भाषा जे बोलतात त्या माणसांना इतर भाषा शिकणे अधिक अवघड जाते.  उदाहरण म्हणून स्पॅनिश भाषीक लोकांना इंग्रजी शिकणे अवघड जाते असे आढळते.                     

          भाषातज्ज्ञ वाणीचे उच्चार (phonotics,) उच्चारसंहिता (phonology), भाषेचे व्याकरण? (syntax) ,  शब्दसंग्रह ? (lexicon), भाषार्थ?(semantices) आणि भाषाप्रयोग ?( pragmatics) असे पाच भाग करतात. ह्यात पहिले तीन सहाव्या वर्षाअगोदर मेंदूत बिंबवायला हवेत. मग शाळकरी वयात हस्ताक्षर, शुद्धलेखन, वाड्मयीन भाषा, निःशब्द अभिव्यक्ती यांचा अधिक विकास होतो.

डावखुरा माणूस व भाषा

वर केलेली सर्व विधाने उजव्या हाताने काम करणाऱ्या माणसाला लागू होतात. मग डावखुऱ्या माणसाचे काय बरे? आरशातल्या प्रतिमेप्रमाणे त्याचे वाणीकार्य उजव्या अर्धगोलात होते का? नाही. याचे कारण असे की बहुतेक डावखुरी माणसे दोन्ही हाताचा वापर करत असतात. त्यांच्याही मेंदूचा डावा अर्धगोलच अधिक प्रबल असतो. जी १-२ % माणसे खरी डावखुरी असतात, सर्व कामे डाव्या हातानेच करतात, त्यांचा मात्र उजवा अर्धगोल प्रबल असतो. त्यांच्या वाणीचे बाजूकरण उजव्या अर्धगोलात होते. खऱ्याखुऱ्या डावखुऱ्या मुलाला जर आईवडिलांनी सक्तीने उजवा हात वापरायला लावला तर त्याच्या वाणीत तोतरेपणा निर्माण होऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

पुढील भागात द्वैभाषिक माणसाचा मेंदू कसे काम करतो ते पाहूया. मानवाच्या मेंदूत डावा अर्धगोल अधिक प्रबल असला तरी उजव्या अर्धगोलाकडून जास्त काम करवून घेतले तर त्याची क्षमता वाढू शकते हे सुद्धा पुढील भागात स्पष्ट होईल.

क्रमशः

विनंतीः 

योग्य मराठी शब्द मिळाले आहेत असे वाटत नाही.  मनोगताच्या मुख्य पानाच्या डावीकडील कोपऱ्यात "मनोगत विशेष" या सदरात मराठी शब्दांसाठी दुवा आहे, सर्व मनोगतींनी त्यावर टिचकी मारून  वेळोवेळी मराठी प्रतिशब्दात भर घालावी अशी त्यांना विनंती. त्यामुळे सर्व सदस्यांना अधिकाधिक मराठी शब्द वापरून लेखन करता येईल. 

Post to Feedसुंदर
उत्तम
माहितीपूर्ण
आभार
छान
छान लेख माला
माहितीपूर्ण मालिका !

Typing help hide