ऑगस्ट २६ २००६

भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ४ (समाप्त)

ह्यासोबत

द्वैभाषिक मेंदू व भाषांचे बाजूकरण

                       हातांचा वापर व वाणी यांच्या केंद्रांची संलग्नता व त्यांचे अतूट नाते हा उत्क्रांतीने मानवाला दिलेला वारसा आहे.  उत्क्रांतीमध्ये मानवाला दोन भाषा शिकण्याची गरज निर्माण झाली नाही. तेव्हा दोन भाषा    शिकणे हे नैसर्गिक नाही. काही कारणाने सक्तीने दोन भाषा शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीमुळे दोन भाषा एकदम शिकण्यानेच ही मुले मागे पडतात असा समज बराच काळ होता पण आता तो गेल्या दशकातील संशोधनाने दूर झाला आहे.

                     जेव्हा लहान मूल सहाव्या वर्षापूर्वीच दोन भाषांच्या प्रभावाखाली असते तेव्हा ते अगदी नैसर्गिकरित्या दोन भाषा अवगत करते. दोन भाषा कानावर पडल्यामुळे त्यांच्या मेंदूत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. बोलताना काही वेळा एका भाषेत मूल  दुसऱ्या भाषेतला शब्द वापरते पण कालांतराने सुशिक्षित पालकांच्या मदतीने मुलाची प्रगती जास्त होते. अशा द्वैभाषिक मुलाच्या मेंदूचे बाजूकरण कसे होते? त्याची पहिली भाषा ही बहुधा ज्याच्या सहवासात अधिक काळ मूल राहते ती होते आणि ती डाव्या अर्धगोलात ठसते. तर दुसरी भाषा उजव्या मेंदूत केंद्रित होते असा अनुभव आहे. पण याबद्दल तज्ज्ञांमध्ये अजून एकमत नाही.द्वैभाषिकात दोन भाषांचे ज्ञान मेंदूत दोन वेगवेगळ्या ठिकाणी साठवले जाते.  अशा व्यक्तीमध्ये भाषाज्ञान व क्षमता यांची केंद्रे उजवीकडे स्थायी झाल्याने डाव्या अर्धगोलाची बरचशी कामे उजवा अर्धगोल स्वीकारतो. उजवा मेंदू डाव्याचे विश्लेषणात्मक काम स्वीकारतो व स्वतःचे कामही जास्त चांगले करतो असे आढळून येते.

          जी मुले सहाव्या वर्षापूर्वी दोन भाषा चांगल्या आत्मसात करतात ती जास्त चांगले शैक्षणिक यश मिळवतात असा आता अनुभव आहे. कनेडियन मानसतज्ज्ञ वॉलेस लॅम्बर्ट याच्या संशोधनातून असे आढळले आहे की दोन भाषा उत्तम जाणणारी द्विभाषिक मेले प्रत्येक परीक्षेत एकभाषी मुलांच्या पुढे असतात.

          दुसऱ्या भाषेचे ज्ञान आणि ती भाषा बोलण्याची क्षमता यांचे स्थायीकरण उजव्या अर्धगोलात होते त्यामुळे तो अधिक प्रज्वलित होतो व उच्च बौद्धिक क्षमतेत भर टाकतो असा अर्ध सुद्धा द्विभाषिक मुलांवर केलेल्या संशोधनातून निघतो आहे. म्हणजे उजवा अर्धगोल डाव्या गोलाचेही काम करतो आणि उजव्याचेही .असेच निष्कर्ष जगाच्या इतर बहुभाषिक देशात झालेल्या संशोधनानंतर निघाले आहेत.

जागतिकीकरणाचे परिणाम

                  आजवर जगावर डाव्या मेंदूचे वर्चस्व होते असे म्हणायला हरकत नाही. शाळा कॉलेजात, आर्थिक व्यवहारात यश मिळवून देणारी विश्लेषणक्षम बुद्धिमत्ता ही डाव्या अर्धगोलाची मक्तेदारी. पण आता केवळ तर्कशुद्ध विचार करुन काम करता येणे याबरोबर विविध भाषा येणे हेसुद्धा जरूरीचे आहे. जागतिकीकरणाने जगात झपाट्याने बदल होत आहेत. जगभरातील तर्कशुद्ध विचार करून होणारी कामे, तसेच उद्योगधंद्यांची सर्विस ऑपरेशन्स, ग्राहकसेवा केंद्रे अशी कामे कमी खर्चात  जगातील पूर्वेकडचे देश आनंदाने करायला तयार आहेत. भारत आणि चीन या स्पर्धेत पुढे आहेत. थोडक्यात सांगायचे तर इंग्रजी बोलू शकणारा भारत देश पश्चिमेकडची बौद्धिक कामे कमी खर्चात करू शकतो तर पश्चिमेची अवजड कारखानदारी चीनकडे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

               भविष्यात असे व्यवसाय निर्माण होतील की ज्यासाठी मानवाला उजवा व डावा अशा मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांकडून कामे करून घेण्याची गरज निर्माण होईल.  उजवा अर्धगोल  जरी मेंदूच्या डाव्या अर्धगोलाच्या प्रभावाखाली असला तरी अगदी लहानपणीच मुलांना दोन भाषा शिकवून त्यात पारंगत केले तर दुसरी भाषा उजव्या अर्धगोलात स्थीर होईल. ती भाषा शिकताना मेंदूचा उजवा अर्धगोल जागृत होईल, हा जैविक नियम आहे. त्यामुळे भविष्यात अशी द्वैभाषिक मुले अधिक चांगले व्यावसायिक यश संपादन करू शकतील.

काही चित्रे

टेंपोराल लोब

temporallobe

 मानवाचा मेंदू - उजवा व डावा अर्धगोल

cerebrumsmall

 

 आभार

  1. language introductory Readings, Ed, Virginia Clark et al 1994
  2. Higher Congnitive Functions, डॅनियल ट्रेनेल, ह्युमन प्रेस २०००
  3. रिवेंज ऑफ द राइट ब्रेन- डॅनियल पिंक, वायर्ड मॅगऍझिन , फेब-२००५
  4. द इफेक्ट्स ऑफ बायलिंग्विझम ऑन द इन्डिव्हिज्युअल-लॅम्बार्ट वॅलेस ई, न्युयोर्क अकॅडमिक प्रेस, १९७७ 
  5. लॅन्वेज डेव्हलपमेंट- अ बायोलॉजिकल रिव्हियू- विजय सबनीस
  6. विकिपिडिया
  7. वेटिंग

 

Post to Feedचांगली लेखमाला
आभार
मनःपूर्वक आभार/आवडले
सहमत.
एक शंका
असाच प्रश्न
उत्तरे
छान
छान
हार्दिक अभिनंदन !
वा! सुंदर

Typing help hide