आताशा मी फक्त बकाणे चिवड्याचे भरतो

संदीप खरे यांच्या 'नामंजूर' संग्रहातील आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो चे विडंबन. ८+८+८+२ मात्रा सांभाळायचा प्रयत्न केला आहे.


शिक्षणासाठी वसतिगृहात प्रथमच राहावयास आलेल्या आणि खानावळीच्या 'थाळी'ला कंटाळलेल्या विद्यार्थ्याचे हे 'मनोगत'. लेकरू प्रथमच घरापासून लांब राहणार म्हणून आईने चिकार खाऊ बरोबर दिला होता. वसतिगृहातल्या पोरांनी त्याचा फन्ना उडवला. आता उरला आहे तो फक्त आईच्या हातचा चिवडा...


आताशा मी फक्त बकाणे चिवड्याचे भरतो
आईघरचे जेवण आता उगीच आठवतो


घास नको मज कुठलाही अन् घोट नको आहे
जेवण कुठले? मुळात मजला भूक नको आहे
ह्या घासांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न गिळावे त्यांना, त्यांनी गिळू नये मजला
उपासमारीची माडी मी फुकाफुकी चढतो


आता आता हृदयी केवळ आई आठवते
जेवण म्हणता थाळी नाही पोळी आठवते
आता कुठल्या दिलखुष गप्पा उष्ट्या हातांनी
आता नाही भूकही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने खानावळीचे खाडे मी करतो


कळून येता पोटाची या इवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी खाण्याच्या मौजा
हाती नाही फिरकत कुठला शिरा आणि उपमा
राखण करीत बसती येथे सदैव ढेक्रा या
ढेक्रा देण्याचाही मजला कंटाळा येतो


- भोमेकाका
३१ ऑगस्ट २००६