ह्रदयाने विचार करणारा माणूस. . .२

आज मी ब्रह्म पाहिले ... हे काही वेगळे असेल का? या ही दिवसांत, अशा पद्धतीने जगणारी माणसे आहेत? .. पाटी कोरी होण्यास सुरुवात झाल्याने,  आयुष्यातल्या खऱ्या शिक्षणाला मघाशीच सुरुवात झाली होती.


'दैव देते पण कर्म नेते' हा वाक्प्रचार बहुधा कोकणस्थांमुळेच मराठी भाषेला बहाल झाला असावा. म्हणजे बघा ना! कोंकणात वस्ती, जिथे मागच्या वाडीत धोतरे वाळत घातली तरी भरतीनंतर काही मासे त्यांत अडकतील - व दारात नारळ, पण आम्ही मासे खाणार नाही.. अर्धपोटी राहिलो तरी बेहत्तर, हा बाणा माझ्या माहितीनुसार जगांत समुद्रकिनारी पिढ्यानपिढ्या वस्ती केलेल्या ह्या एकमेव जातीनेच बाळगला असावा. तर वाण नाही पण गुण असल्याने, माझेही नोकरी-व्यवसाय-संसार, म्हणजे जिवंत राहण्याचा - जगण्याच्या नव्हे - रहाटगाडग्यात गुंतून काही वर्षे -वाचन, संगीत शिक्षण वगैरे जगण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. पण सुमारे एका तपानंतर आपण फक्त जगांत राहत आहोत, जगणे कुठल्याकुठे गेले आहे, हे उमजू लागले. आपण अजाण ही जाण येण्यासाठीही तप लागतेच. तेव्हा ताबडतोब जाऊन पुन्हा गुरुचे पाय धरले. तो खरा गुरुच, ""मध्ये खंड पडल्याने विस्मरण झाले होते, पण हरकत नाही पुन्हा सुरुवात करा, कुठल्याही गोष्टीला वेळ यावीच लागते'' इतके बोलून आमच्या सहवासाच्या पुढील पानाला सुरुवात झाली.



मधल्या वेळांत गुरुजींचे राहण्याचे ठिकाण बदलून आता ते एरंडवण्यात भक्तिमार्गावर राहायला आले होते. तर ह्या गुरुकुलाच्या बदललेल्या ठिकाणी माझे येणेजाणे सुरू झाले. बदल फक्त ठिकाणाचा होता, बाकी सर्व गोष्टी पूर्वीसारख्याच.
एके दिवशी संध्याकाळी मी आठच्या सुमारास पोहोचलो. पाच सात शिष्यांचा घोळका, कुणालातरी शिकवणे चालूच होते. "किती वाजले' मध्येच थांबून एक प्रश्न - कुणीतरी म्हणाले "साडे आठ' - "साडे आऽठ' किंचित त्रासलेला आवाज. पुन्हा कांहीतरी वाजवून शिकवणे चालूच. पण दहा पंधरा मिनिटातच पुन्हा प्रश्न दाराकडे नजर टाकत, किती वाजले.
माझ्या लक्षांत आले की काहीतरी बिनसले आहे. कारण हे वेळेबद्दल प्रश्न कशासाठी?
त्या शिष्यांत मी थोडाफार वयाने व अनुभवाने मोठा असल्याने गुरुजींनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ती दाना तुला माहीत आहे ना? दाना म्हणजे एक अमेरिकन मध्यमवयीन स्त्री, गुरुजींच्याकडे शिकण्यासाठी म्हणून परदेशातून काही दिवसासाठी येऊन राहिली होती. त्यांच्याकडेच राहणे, जेवणखाणं वगैरे. तर आज ती दुपारी माझ्याकडे काहीतरी सतारीबद्दल भुणभूण करत होती. पहिल्यांदा मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती आपला हट्ट सोडत नव्हती. तेव्हा मी तिला थोडासा रागावलो, तर ती थोडी दुखावून आंत गेली.  मला वाटले थोड्या वेळानंतर मूड ठीक झाला की येईल - पण साधारणपणे चारच्या सुमारास ती आतून बाहेर आली व काहीच न सांगता दरवाजा उघडून बाहेर पडली. मी कुणालातरी शिकवत असल्याने मलाही तिला काही विचारता आले नाही. आणि आता तर नऊ वाजत आले. त्यामुळे मला काळजी वाटू लागली आहे.'' तो अस्वस्थपणा मघापासूनच चांगलाच जाणवत होता.
मग ती कुठे गेली असेल या वर इतर शिष्यमंडळी व गुरुजींचा जावई यांचे तर्कवितर्क सुरू झाले. गुरुजी हे पाश्चिमात्य थोडेसे स्वकेंद्रित असतात. तुमच्या बोलण्याने ती दुखावली असली तरी फक्त तेवढेच नसून, इथे सारखी इतकी माणसे असतात त्यामुळे तिला जो एकांत अभिप्रेत असावा तो मिळत नसेल तर काही वेळात ती परत येईलच.. मी एक अंदाज व्यक्त केला. पण ती इतकी मूर्ख कशी, तिने गुरुजींना काही सांगून जायला नको का? तिला शिष्टाचार नाहीत का? एका गुरुजींच्या बंगाली शिष्याची शिष्यभक्तीची पोटतिडीक उफाळून आली. अशा इतरांच्या चाललेल्या सर्व निरर्थक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून - गुरुजी मला म्हणाले, चल आपण खाली जाऊन रस्त्यावर उभे राहून तिची वाट पाहू या. आम्ही सर्व मंडळी खाली. आता नेमके काय करायचे हे कोणालाच सुचत नव्हते. निरर्थक बडबड व भक्ती व्यक्त करण्यापेक्षा - गुरुजींना सांगून त्यांचा जावई - महेश व मी आसपासची मैदाने, फिरण्याची ठिकाणे, फर्ग्युसनचा रस्ता वगैरे ठिकाणी ती दिसते आहे का.. म्हणून मोटरसायकलवर चक्कर टाकून आलो. गुरुजी व काही शिष्यगण - बंगालीबाबूंसकट कोपऱ्यावरच होते. सुमारे अकरा वाजायला आले होते. मी दिसताच गुरुजी म्हणाले आपण जाऊन पोलिसांना माहिती देऊ या. (बहुधा बंगालीबाबूंचा प्रस्ताव असावा) पाश्चिमात्य लोकांचा बऱ्यापैकी अनुभव असल्याने 'हा राईचा पर्वत होतो आहे' हे माझे मत होते. तेव्हा मी गुरुजींना विचारले की तिचे त्यांच्याकडचे राहणे त्यांनी किंवा तिने जवळच्या पोलीसठाण्यांत कळविले आहे का? म्हणजे? गुरुजींचा प्रश्न - पोलीस प्रकाराचा माझा अनुभव व आपल्याकडचे सर्वसाधारणपणे ठाऊक असण्याची शक्यता नसलेल्या नियमांची मी माहिती सांगितली, मग मलाच जाणवले की त्यामुळे जे जास्तीच काळजीत पडले. तेवढ्यांत एक रिक्षा थांबली व त्यातून दाना उतरून घराकडे चालायला लागली. गुरुजींना तुम्ही एकटेच तिच्याशी बोला व घराकडे जा असे म्हणून मी इतर सर्वांना दटावून मागाहून चलायला सांगितले. पण तरीही बंगालीबाबूंनी आपल्या गुरुभक्तीचा ठोस पुरावा देण्यासाठी, गुरुच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर तोंडसुख घेतलेच. त्यामुळे तर ती भलतीच गांगरून गेली व आपण भयंकर काहीतरी केले असे फारसे कारण नसताना तिच्यात एक गुन्हेगारी भावना निर्माण झाली. आम्ही घरांत पोहोचलो व भाभींना गुरुजींनी कॉफी टाकायला सांगितली. त्या सुमारे चाळिशीच्या आसपास असलेल्या शिष्येची ह्या माणसाला लागलेली काळजी, तिच्या समाजरितीनुसारचे तिचे वागणे, व दुसरीकडे आपल्या समाजरितीनुसार गुरुभक्तीच्या प्रेमाची सक्ती, याचा समतोल राखण्यासाठी त्यांची शांतपणे चाललेली कसरत व सहनशीलता, हे पाहून मला त्यांच्या भावनांची एक नव्यानेच ओळख झाली.


 कधीकधी विनोदाने ते म्हणतातच,  ''मी गुरु आहे पण कलियुगांतला, तेव्हा शिष्यांनी माझी काळजी घ्यायच्या ऐवजी त्यांचीच काळजी मला करावी लागते, काय योग असतात. ''



ते विनोदाने म्हणतात तरी प्रत्यक्षांत हा माणूस इतरांची किती काळजी घेतो हे मी पदोपदी अनुभवले आहे. कुठल्याही कार्यक्रमानंतर नऊ साडेनऊ वाजून गेले तर सर्व स्त्रीवर्ग शिष्यांना घरी पोहोचवणे हा त्यांनी स्वतः:वर घेतलेला भार मी कमी करण्याचा विडा उचलला होता, तरीही ते काम झाल्यावर घरी गेल्यावर मलाही त्यांना एकदा रिपोर्ट करावा लागे. याचा काही वेळी सामान्य दृष्टिकोनातून अतिरेकही होई. ते मजेशीरही असे. जसे जयाची स्वतः:ची गाडी असे, मग ती तिच्या गाडीतून व तिच्या पाठोपाठ गुरुजी आपल्या गाडीतून पार ती स्वतः:च्या बिल्डिंगमध्ये शिरेपर्यंत इतकेच नाही तर मग पाच मिनिटे तिच्या बिल्डिंग बाहेर गाडी थांबविणे व तिच्या खिडकीत लाइट दिसला की मगच घरी जाणे.
पण हे स्त्रियांच्या नाही तर इतरांच्या बाबतही तसेच, त्यांच्या घरच्या एका पार्टीत दत्ताजी मारुलकर होते - ते घरी व्यवस्थित पोहोचतात हे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. माझा निवास दत्ताजींच्या अलीकडे, पण मी दत्ताजींनी सांगूनही त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो. तर दत्ताजी मला म्हणाले मी तुझ्यापेक्षा मोठा माणूस माझे तू ऐकले पाहिजेस. तर दत्ताजींना मी म्हटले तुम्ही म्हणता ते अत्यंत योग्य पण मला गुरुची आज्ञा आहे आणि तुमचीही - गुरू आज्ञा ही श्रेष्ठांच्यापेक्षा महत्त्वाची तर मी काय करू तुम्हीच सांगा - अर्थातच दत्ताजी निरुत्तर. पण पुढच्या वेळेपासून तुझा शिष्य तुझीच आज्ञा मानणार, तो मला घरी सोडणारच - हा शिरस्ताच पडला. पण हे इथे संपायचे नाही, मी घरी गेल्यावर फोन करून मीही सुखरूप पोहोचलो, हे सांगावेच लागे.
याच सुमारास त्यांच्या मनांत एक संगीताला वाहून घेतलेली संस्था काढावी हा विचार होता. नावही पक्के झाले होते "नाद' पण त्याला साजेलसे एक चिन्ह असावे याबाबत चर्चा चालू होत्या. इतर मंडळींच्यासाठी मी तसा नवीनच असल्याने माझी भूमिका श्रोत्याचीच असायची. त्यांच्या जावयानेच याबाबत पुढाकार घेतला होता व बऱ्याच आर्टिस्ट मित्रांची मदत घेऊन बरीच वेगवेगळी डिझाइन्स समोर ठेवली जायची. पण गुरुजींच्या मनांस काही उतरत नव्हते. एकदा हा विषय निघाला असता - गुरुजी म्हणाले की ॐ कारातून नादाची निर्मिती झाली व नाद हा आकार नसलेला म्हणजे निराकार पण सर्वव्याप्त असतो, तेव्हा असे काहीतरी चिन्ह असावे. हे कुठेतरी माझ्या डोक्यात शिरले. तेव्हा एक दिवशी ऑफिसवर काम करीत असता सहज संगणकावर या कल्पनेवर रेखाटणे करू लागलो. व त्यातच एक छान डिझाइन तयार झाले. त्याचा नमुना घेऊन मी संध्याकाळी गुरुजींच्याकडे गेलो व ते दाखविले. त्यांना ते आवडले व म्हणाले हेच मला अभिप्रेत होते. व मग ताबडतोब जावयाला व यात लक्ष घालणाऱ्या इतर शिष्यांना फोन करून बोलावून घेतले व हेच मला पाहिजे होते हे सांगून त्यावर लगेच शिक्कामोर्तब झालेसुद्धां. वर आनंद तू माझ्या मनांतले बरोबर ओळखलेस अशी शाबासकी मला मिळाली. दानाचा प्रसंग व हे चिन्ह मला त्यांच्या खूप जवळ घेऊन गेले.


थोड्याच दिवसात प्रभातरोडला गुरुजींच्याच जया जोग या शिष्येने एक मोठा हॉल संगीतसाधनेसाठी दिला, जेथे संगीतशिक्षणाचे काम पुढे सुरू झाले. त्याला आम्ही नादमंदीर म्हणतो. शिष्यांनीच आपापल्या कुवतीनुसार तो हॉल सजविण्यास मदत केली. एक दिवशी तिथे बसलो असता, अमेरिकेतील एक शिष्य तिथे आला व गुरुजींना वेळ होताच काही रेखाटणे दाखविण्यास सुरुवात केली. आम्हाला कळेना हे काय आहे. काही वेळाने या ख्रिसच्या खोलीचे एक काम आहे मी जाऊन येतो, म्हणून ही गुरुशिष्य जोडी बाहेर पडली. मला विषय कांहीच माहीत नव्हता. ते गेल्यावर जयाने चिडाचीड सुरुवात केली, आपली कामधंदे सोडून हे नसते धंदे करायची काय गरज वगैरे.. तर हा शिष्य अमेरिकेहून आला होता व त्याने एक खोली भाड्याने घेतली होती, तिथे डासांचा बराच उपद्रव होता म्हणून खिडक्यांना जाळ्या बसवायच्या त्याचे सामान आणण्यासाठी गुरू शिष्याला घेऊन - त्याला पुण्याची माहिती नसल्याने - बोहरेआळीत खरेदीला गेले होते.. अर्थातच गुरुजींच्या गाडीतून. साधारणपणे दोन तासाने गुरुजी परतले. सर्व सामान मिळाले आता उद्या दुपारी आम्ही त्या जाळ्या तयार करून बसविणारं. तुम्हाला याची काय गरज आहे, त्याची खोली तिथले डास तो पाहून घेईल ना.. जयाने आपल्या रागाला मोकळीक दिली. हेच हेच मी तुम्हाला सांगतो .. मनाचे कंगोरे जरा घासा. तो इतक्या लांबच्या देशातून येथे आला आहे,  कोण कुठला.. तिथल्या एका दौऱ्यात एका कार्यक्रमांत माझी सतार याला आवडली, तिथे दोन आठवड्यांत जे काही पाच सहा कार्यक्रम होते, त्या त्या ठिकाणी हा न चुकता आला, माझी ओळख करून घेतली, तर मला संगीत शिकायचे आहे व ते तुमच्याकडूनच म्हणून हा नंतर संधी मिळताच पुण्याला आला आहे, सहा महिने येथे राहणार आहे.. याच शिक्षणासाठी. ज्याला मांडी घालून बसता येत नव्हते, जी आपल्या दृष्टीने साधी गोष्ट आहे, तर आता दोन आठवड्यानंतर तो कसातरी बसायला शिकला आहे, इतका त्याला शिकण्याचा ध्यास आहे. परत एवढे तो करतो ते प्रेम असल्याखेरीज? तो इथे नवीन, त्याची किमान सोय होते की नाही हे पाहायला नको का? तुम्ही डोक्याने विचार करता.. पण माझे विचार हृदयातून होतात. मी असाच आहे आणि असाच राहणार .. गुरुजी पोटतिडिकेने बोलत होते.



ह्या "हृदयातून विचार करण्याचा' नंतर मला पदोपदी अनुभव येत गेला. याच सुमारास कधीतरी त्यांच्या कांहीतरी प्रकृतीच्या बारीकसारीक तक्रारी होत्या. दिवसभर बैठे काम, प्रवास दौरे, जागरणे व खाण्यापिण्याची बऱ्याचवेळा वेळअवेळ हे तर पाचवीलाच पुजलेले - तेव्हा गुरुजी ह्या सर्व दिनक्रमात तुमचा व्यायाम वा विरंगुळा होत नाही तर आपण तुम्ही पुण्यांत असलात की फिरायला जात जाऊ या का? असे सुचविले. त्यांनाही ती कल्पना एकदम पटली. व दुसऱ्या दिवसापासून सकाळी आम्ही टेकडीवर फिरायला जायला लागलो. यासाठी असे ठरले होते की सकाळी 6.05 ला मी त्यांच्या फोनवर एक निघाल्याची खूण म्हणून रिंग टाकायची व निघायचे - मी पोहोचेपर्यंत ते तयार होऊन त्यांच्या बिल्डिंगच्या खाली येऊन उभे रहात. तिथून मोटरसायकल कांचन गल्लीच्या तोंडाशी ठेवून आम्ही टेकडी चढायचो. हा मला त्यांचा मिळालेला सहवास म्हणजे अक्षरशः पर्वणीच होती, या निमित्ताने होणाऱ्या गप्पा - माझ्या आयुष्यातला तो बहुमूल्य ठेवा आहे. परंतु काही दिवसाने माझ्या एक विचित्र गोष्ट लक्षांत आली. एखाद्या दिवशी रात्री जागरण झाले किंवा अचानक कुठेतरी जायला लागले -किंवा गुरुजी रात्री क्रिकेट बघण्याने उशिरा झोपले - की माझी रिंग गेली की पटकन्‌ फोन उचलला जायचा व आनंद काल उशीर झाला तर आज नको जायला असे सांगत.  माझ्या लक्षांत आले की हा गृहस्थ माझी रिंग येणार, मी निघणार व खाली येणार व मला हेलपाटा पडणार हे टाळण्यासाठी पहाटे पासूनच माझ्या रिंगची वाट पाहतं जागा राहायचा.. बरं मला फोन करणार नाही , का तर मला आधी कशासाठी उठवायचे म्हणून. थोडक्यात हा ही प्रकार त्यांना त्रास देणाराच ठरू नये म्हणून हे फिरणे मीच बंद करून टाकले.


. . .क्रमशः