ह्रदयाने विचार करणारा माणूस. . ३ (अंतिम)

काही वर्षापासून गुरुजी दत्तजयंतीला जालन्याजवळ अंबड नावाच्या एका गावी नेमाने जात असत. तिथे अण्णासाहेब जळगांवकर म्हणून एका गृहस्थांच्याकडे तीन दिवसांचा संगीत महोत्सव असे. दत्तजयंतीच्या आदल्या तीन दिवस रात्री या जळगांवकरांच्यावतीने याचे आयोजन केले जाते, गेल्या सुमारे 75-80 वर्षापासून. यांच्या संपर्कात गुरुजी केव्हातरी आले व नेमस्तपणे तेथे हजेरी लावू लागले. मी त्यांच्याबरोबर एकदा तिथे गेलोही होतो. त्यानंतर दोन एक वर्षानंतर त्याला जोडूनच आदल्या रात्री उदगीर जवळ एका गावी एक कार्यक्रम ठरला. तेव्हा आम्ही दोघांनी जायचे ठरविले. प्रथम उदगीर नंतर दुसऱ्या रात्री अंबड व तिसऱ्या संध्याकाळी औरंगाबाद आकाशवाणीतर्फे कार्यक्रम असे ठरले. त्यानुसार आम्ही पुण्याहून एका रात्री कुच केले. बसने. ती मराठवाड्यात नेणारी खासगी बस, तेव्हा रात्रभर जागून आम्ही पहाटे केव्हातरी एका हायवेवरच्याच छोट्या गावी उतरलो. खेड्यातलेच हॉटेल - ते इतके घाणेरडे होते की आम्ही आता झोप वगैरे जाऊ दे म्हणून समोर एका धाब्यावर चहा वगैरे घेत बसलो. काही वेळाने आम्हाला पं. शौनक अभिषेकी व पं. अतुल उपाध्ये पण सामील झाले. मग दिवसभर गप्पाटप्पांतच वेळ घालविला. संध्याकाळी हॉटेलवाल्याशी भांडून  या तिघांसाठीतरी किमान एकेक गरम बादली पाण्याची मी सोय केली. त्यानंतर एका मोडक्या टेम्पोतून बसून खाचखळग्यातून आम्ही त्या गावी पोहोचलो. हा कार्यक्रम एका धार्मिक सोहळ्याला चिकटविलेला होता. रात्री उशीरा, सुमारे दोन अडीच हजार जनसमुदायासमोर - ज्यातले आमच्यासकट केवळ पंचवीस-तीस लोक (बहुधा इलाज नसल्याने) जागे असावेत, तिथे या तिघांचे गाणे बजावणे झाले. मी आता मात्र वैतागलोच होतो कारण हा कार्यक्रम त्यांनी व बहुधा सर्वांनीच केवळ एका ओळखीच्या माणसाचा आदर ठेवण्यासाठीच स्वीकारला होता असे वाटते. तर शेवटी पुन्हा त्या टेम्पोतून सकाळी आम्ही उदगीरला परतलो. मग शासनाच्या सात वाजताच्या एस.टी. त ती सुटण्याची प्रतीक्षा करत बसलो. तेव्हा दोन दिवस अजिबात झोप झालेली नव्हतीच, तर आता आपण दुपारी दोन वाजता अंबडला पोहोचल्यावर तिथल्या डाकबंगल्यात नेहमीप्रमाणे आपली व्यवस्था केली असेल तिथे जाऊन अंघोळी करून मस्त ताणून देऊ या, गुरुजी बहुदा माझी समजून घालितं असावेत. शेवटी ही साताची एस.टी. अकराला सुटली व पार दक्षिण मराठवाडा ते उत्तर मराठवाडा धूळ चाखत आमचा प्रवास एकदाचा संध्याकाळी साडेसात वाजता संपला. आम्ही डाकबंगल्याच्या स्टॉपवरच उतरलो. आत जाताच कार्यक्रमाच्या संयोजकांनी तुमचे कुठलेही आरक्षण केलेले नाही व एकही खोली शिल्लक नाही. बहुधा, गावाकडच्या अमुक हॉटेलमध्ये केले असावे  असे आम्हाला समजले. तिथून परत सायकलरिक्शाने सामान घेऊन गावाकडे. तिथल्या हॉटेलमध्ये आमची खोली ठेवली होती. त्या खोलीत पाय ठेवताच कुबट वास व प्रचंड धूळ यांनी आमचे स्वागत झाले. किमान ताजी हवा तरी यावी म्हणून सामान तिथल्या कॉटवर ठेवून (त्यातल्या त्यांत स्वच्छ जागा तीच होती), मी खिडकी उघडली आणि पलीकडे असलेल्या शाळेच्या मुतारीची प्रचंड घाण खिडकीवाटे आत शिरली. इथेही परत थोडी भांडाभांडी करून गुरुजींसाठी एक बादलीभर पाणी मिळवले. व इतर काही शक्य नसल्याने हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला येऊन आम्ही दोघे बसलो. तेवढ्यांत संयोजकांचे तरुण व उत्साही स्वयंसेवक लगबगीने आले. खॉसाहेब आलात का? छान! या वेळेस या हॉटेलवाल्याने दोन दिवस हॉटेलच्या वतीने खोली देतो, असे सांगितल्याने डाकबंगल्याऐवजी इथे व्यवस्था केली. तेवढेच साठ रु. वाचले, आपल्याला माहीतच आहे की हे आयोजन अत्यंत थोड्या बजेटमध्ये चालते. तर तुम्ही आराम करा - आम्ही जरा औरंगाबादला जाऊन येतो. ते अमुक गवई विमानाने येणार आहेत त्यांना घेण्यासाठी आम्ही जात आहोत. हे ऐकताच माझा आतापर्यंतचा संयम सुटला व मी गुरुजींना बोलायला लागलो की पाहा तुम्हीच स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे - तुमच्यासाठी यांना साधी डाकबंगल्याची व्यवस्था करता येत नाही पण कुणासाठी तरी हे गाडी घेऊन शंभर की.मी. जाणार आहेत आणि परत त्यांना मात्र विमानाचे तिकीट वगैरे.. मी उपहासगर्भपणे तिरकसपणा चालू केला. यावर आनंद, अरे हे त्या अण्णांना फारसे माहीत नसणार - ते कोणकोणत्या गोष्टीत लक्ष घालणार म्हणून त्यांनी माझी समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
शेवटी रात्री तीन वाजता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. सुमारे पाच-सहाशे माणसांनी गुरुजी पोहोचताच टाळ्यांच्या कडकडांटात स्वागत केले. व त्यानंतर अजून थोडे करता करता, गुरुजींची तासाची हजेरी सुमारे अडीच तास रंगली.  उत्स्फूर्त दाद व अत्यंत रसिक श्रोतावर्ग, गुरुजींचे वाजविणे जे खुलले.. मी अवाक्‌च झालो. जो माणूस गेल्या दोन रात्री झोपला नव्हता, दिवसाही नुसता प्रवास - त्यांतच संयोजकाकडून झालेली प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मानहानी याचा कुठलाही मागमूगसही नव्हता. कार्यक्रमानंतर तृप्तीने व मिश्कीलपणाने माझ्याकडे त्यांनी पाहिले. त्या नजरेतून त्यांना बरेच काही सांगायचे होते. काही वेळाने अण्णांचा निरोप घ्यायला आम्ही गेलो की औरंगाबादला कार्यक्रम आहे लवकर जायला पाहिजे वगैरे. तर शिरस्त्याप्रमाणे पिठलभात खाऊन निघण्याचा आग्रह झाला. तेवढ्यांत तिथे डागरसाहेबही होते ते म्हणाले की आपण बरोबरच जाऊ या, म्हणून मग आम्ही थांबलो.



(थोडे विषयांतर करतो, तिथे डागरसाहेब आले आहेत म्हणून अण्णांच्या संगीत परिवारातील मंडळींनी - आपले आठ तानपुरे डागरसाहेबांच्या समोर ठेवले - तपासणीसाठी. डागर साहेबांनी एकेक करून दोन एक तासामध्ये सर्व तानपुरे ठीकठाक करून ते सर्वांना एकाच वेळीस छेडायला लावले. त्या मातीच्या भिंती असलेल्या मोठ्या दिवाणखान्यात त्या आठही तानपुऱ्यांचा एकत्र आवाज - हे आठवताना अक्षरशः अंगावर काटा येतो. सर्व भिंतीतून सर्व बाराही स्वर जिवंत झाल्याची जाणीव, ह्याच क्षणी मरण यावे.. मी तृप्त झालो ही एकच भावना माझ्या मनांत तरळली.)



औरंगाबादला पोचल्यावर मात्र चांगल्या हॉटेलमध्ये उतरून जेवण करून आम्ही ताणून दिली. संध्याकाळचा कार्यक्रम झाल्यावर गुरुजी माझ्याशी गप्पा मारू लागले. आनंद, तू काल म्हणत होतास त्यांत चूक नाही, परंतु तू अण्णांना पाहिलेस गेले 50 वर्षेतरी एका भक्तीने ते ह्या दत्तजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत, जो त्यांच्या वडिलांनी चालू केला. या आडगांवीसुद्धा या संमेलनाला अडाणी पण रसिक श्रोते उपस्थिती लावतात, तू पाहिलेच आहेस. इतर संमेलनांप्रमाणे इथे कुठलाही व्यावसायिक आश्रयदाता नाही, कार्यक्रमाच्या आसपास कुठेही चहा, वडे, भेळेच्या गाड्या नाहीत. उलट मध्यंतरात दोनदा जो चहा दिला जातो तो सर्व श्रोत्यांना संयोजक म्हणजे अण्णांच्यातर्फेच दिला जातो. हे सर्व मला माहीत आहे व या प्रेमासाठीच मी इथे येतो. आता अण्णा कुठेकुठे लक्ष घालणार - तेव्हा आपल्या थोड्याशा गैरसोयी झाल्या तरी मला त्यांचे व श्रोत्यांचे प्रेम जास्त महत्त्वाचे वाटते, सकाळी बघ - आपण पिठलभात न खाता निघणार म्हटल्यावर अण्णांना किती वाईट वाटत होते? आपण आग्रही राहिलो असतो तर त्यांनी आपल्याला जाऊही दिले असते, पण मला खात्री आहे त्यांना नक्कीच वाईट वाटले असते..



मी पुण्यांत आलो तेव्हा माझे इथे कोणीही नव्हते तेव्हा मी प्रथितयश वा मान्यता पावलेला कलावंतसुद्धा नव्हतो, आता आहे तिथे येण्यासाठी मला खूपच कष्ट घ्यायला लागले आहेत, वेगवेगळे बरेवाईट अनुभवही खूप पदरी आहेत पण त्या अनुभवांनी मला घडवले. विचार करायला शिकवले. सुरुवातीच्या काळांत निराशेचे प्रसंग, मानहानीचे प्रसंगही खूपच आले पण देवाच्या कृपेने मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही. प्रत्येक अनुभवातून शिकत गेलो.
सुमारे 30-35 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. एकदा पुण्यातले एक संगीत क्षेत्रातले मान्यताप्राप्त जाणकार,  पेशाने एक वैद्यकीय डॉक्टर असलेल्या माझ्या स्नेहीनी मला सांगितले की उस्मान मला परवाच अमुक अमुक प्रतिष्ठित उच्च सरकारी अधिकारी भेटले होते, त्यांच्या मुलाला सतार शिकवावी हे त्यांच्या मनांत आहे. मी त्यांना तुझे नांव सुचविले आहे. हा त्यांचा पत्ता. तू त्यांच्याकडे जा. तो काळ माझा पुण्यांत आर्थिकदृष्ट्यासुद्धा स्थैर्यासाठी धडपडीचा होता. तेव्हा चांगली शिकवणी मिळविणे हे महत्त्वाचे होतेच. मी डॉक्टरांचे आभार मानले व त्या पत्त्यावर गेलो. बाहेर वॉचमन व त्यानंतर पोर्चमधे नोकरांनीच माझे स्वागत केले. आत निरोप गेला कुठलेतरी एक मास्तर शिकवणीसाठी आले आहेत. मी किंचित खटटू झालो. जरा वेळाने मुलाच्या आई बाहेर आल्या व म्हणाल्या काय काम होते? मी अमुक अमुक - डॉक्टर अमुक तमुक यांनी साहेबांना माझे नांव सांगितले होते, कारण तुमच्या मुलाला सतार शिकायची आहे. हो, आम्हाला कोणीतरी एक मास्तर हवाच होता. पण तुम्हाला इंग्लिश येते का? कारण बाबाला तर एकही शब्द मराठी येत नाही. मी मुळातल्या स्वागताने वैतागलोच होतो. त्यातच हे भाषा प्रकरण.. मला किंचित चीडच आली होती. पण वर काही न दाखविता मी म्हटले "मला इंग्रजी येत नाही, पण बाबाला माझी भाषा नक्कीच कळेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका' मनातल्या मनांत मी विचार केला होता, की डॉक्टरांचा शब्द राखायचा म्हणून आजचा दिवस कसातरी मारून न्यायचा व नंतर डॉक्टरांना ही शिकवणी जमत नाही म्हणून कळवून टाकायचे. तर माझी मास्तरपदी नेमणूक झाली. व आठवड्यांत दोनदा या पद्धतीने शिकवणी ठरली. पहिल्यांदा बाबा म्हणजे विनय माझ्यासमोर आला त्याचा निरागस व समजूतदारपणा कुठेतरी मला स्पर्शून गेला. पहिल्याच दिवशी शिकविताना त्याची तन्मयता मला भावली.  नंतर आधीचा विचार झटकून मी ही शिकवणी सुरू ठेवली. काही दिवसातच विनयची प्रगती छानच होत होती, भाषेची अर्थातच कुठलीही अडचण कधीच आली नाही. त्यामुळे दरवेळी बंगल्यावर गेल्यावर "मास्तर आले' म्हणून पोर्चमधे मला बसवून आत वर्दी जायची, त्याकडे मी दुर्लक्ष करू लागलो. फी ही अर्थात वेळच्यावेळीस मिळायची, शिकवणीची वेळ संपता संपता चहाही यायचा. पण मुख्य म्हणजे विनयच्या प्रगतीमुळे मी खूश होतो. अजूनपर्यंत साहेब मला फक्त एकदाचं जेमतेम भेटले होते.
याच सुमारास कधीतरी सरकारतर्फे संगीतातल्या माझ्या सहभागाबद्दल सत्कारासाठी माझी निवड झाली,  ज्या मुख्य पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला गेला, ते होते "साहेब'. पुढच्या वेळीस विनयच्या शिकवणीकरिता गेलो,  तेव्हा मी आलो म्हटल्यावर साहेब स्वतः बाहेर आले व या या म्हणून मला त्यांच्या खास दिवाणखान्यात घेऊन गेले. व मग बरोबरच चहा वगैरे झाल्यावर, विनयसाठी निरोप गेला, तुझे गुरुजी आले आहेत. मास्तरपदावरुन मला गुरुजी पदावर बढती मिळाली होती. मी शिकवणीसाठी गेल्यावर "बाबाचे गुरुजी आले आहेत हा निरोप जाऊ लागला, तसेच  साहेब घरी असले की पहिल्यांदा त्यांच्या बरोबर चहाफराळ होऊन मगच माझी शिकवणी सुरू होई.
काही दिवसानंतर साहेबांची बदली मुंबईला झाली. पण जाण्यापूर्वी तुम्हीच विनयला शिकवायचे - येण्याजाण्याच्या खर्चाची मुळीच चिंता करायची नाही - अशी चोख व्यवस्थाही झाली होती.  त्यावेळीस योगायोगाने मला बऱ्याचदा उत्तर हिंदुस्थानात कार्यक्रम मिळू लागले. पुण्यातून रेल्वेची व तिकिटाची सोय होत नसल्याने, माझ्या दौऱ्याची तिकिटे बऱ्याचदा मुंबईलाच साहेबांकडून माणूस पाठवून काढली जाऊ लागली. व नंतर आदल्यादिवशी त्यांच्याच घरी राहून दुसऱ्या सकाळी  मला आगगाडी पकडण्यापर्यंत मदत करायला साहेबांचाच कोणी ना कोणी माणूस असायचा. एकदा माझी गाडी सकाळी सातच्या सुमारास मुंबईहून निघणार होती. रिझर्वेशन होतेच. आदल्या रात्री मी विनयच्या घरी. ड्रायवरला सकाळी सहा वाजताच बोलाविले होते. रात्री पावसाची संततधार सुरू झाली. मी तयार होऊन, सामान समोर ठेवून व साहेब नाईटसूट व हवाई चपला या वेषांत चहा घेत ड्रायवरची वाट पाहत बसलो होतो. सहा वाजले - सव्वा सहा झाले तरी त्याचा पत्ता नाही, शेवटी साडेसहा वाजले तेव्हा तो येणार नाही असे वाटले व साहेब तातडीने उठले व म्हणाले मीच तुम्हाला आता सोडतो. कारण आत्ता टॅक्सीही मिळणे शक्य नाही. तर कसेतरी सामान गाडीत भरून, त्याच वेषांत साहेब, असे आम्ही स्टेशनवर पोहोचलो. पाऊस चालूच होता. तेव्हा माझी बॅग, सतार हे पाहून साहेबांनी पटकन्‌ माझी बॅग घेतली व सतार तुम्ही सांभाळा, मला काही ते जमणार नाही म्हणून एका हातात बॅग, एका हातात छत्री, माझ्या हातांत सतार असे एका छत्रीतून आम्ही दोघेजण स्टेशनामध्ये शिरलो व नंतर पळत पळत माझा रिर्झवेशनचा डबा शोधून साहेबांनी माझी बॅग पार डब्यापर्यंत आणून दिली व मग एकदम साहेबांच्या आपल्या वेषाबद्दल लक्षांत आले व तातडीने साहेब माझा निरोप घेऊन दिसेनासे झाले. या गोष्टीला आनंद आज झाली असतील बरीच वर्षे, आज विनय एका बॅंकेत उच्चपदस्थ अधिकारी आहे दिल्लीला पण अजूनही वर्षातून दोनदातरी वेळ काढून - सतार घेऊन विमानाने पुण्याला येतो. त्याची प्रगती तू पाहिली आहेसच. तसेच मी कधीही दिल्लीला गेलो तर दुसरीकडे उतरलेले साहेबांना अजिबात चालत नाही. तर आनंद मी त्या वेळी जर मान अपमान ह्या चक्रात राहिलो असतो तर त्याच्यासारख्या एका उत्तम शिष्याला मुकलो असतो व त्याला आयुष्यांत सतार व संगीत यातून मिळणाऱ्या आनंदापासून मी वंचित केले असते. एका निरागस माणसावर मी अन्यायच नसता का केला? तसेच साहेबांसारखा एक उत्तम स्नेही मला नसता मिळाला.



एकदा पुण्याच्या आर. टी. ओ मध्ये माझे काहीतरी काम होते. मी तिथे गेलो व इकडे तिकडे बराच हिंडलो तरी मला कुणीच काही दाद लागू देत नव्हते. पैशाची भाषा मला समजतच नाही व एजंट ह्या प्रकाराची मला चीडच आहे. तेव्हा दोन एक तास खर्च झाल्यावर मी ठरविले की आपण आर.टी.ओ. साहेबांनाच भेटायचे व त्यांच्या कानावर आपले काम घालायचे. त्यांच्या खोलीबाहेर जाऊन मी माझ्या नावाची चिठ्ठी पाठवली. बसा म्हणून निरोप आला, पण अर्धा पाऊण तास झाला तरी बोलविणे काही येईना. मधल्या वेळेत काही लोक तर सरळ दार उघडून आत ये जा करीत होते. तासाभराने मात्र माझा संयम सुटला व मी सरळ दरवाज्यावर टिचकी मारून अर्धवट दरवाजा उघडला व येऊ का विचारत खोलीत प्रवेश केला- एकदम चमकून पण रागानेच साहेबांनी मला विचारले की तुम्ही न सांगता आत कसे काय आलात? साहेब मी चिठ्ठी पाठवून एक तास झाला. मग मी कामात आहे दिसत नाही का? मी कोण आहे माहीत आहे का? मी चिडलो होतोच पण तरीही "साहेब मी तुमच्या ऑफिसात व आता तुमच्या केबिनमध्ये आलो आहे, तेव्हा तुम्ही कोण आहात हे मला नक्कीच व चांगलेच माहीत आहे. पण साहेब तुम्ही नक्की कोण आहात हे तुम्हालाच माहीत आहे का हो? - साहेब चमकले - व म्हणाले या बसा, आनंद नंतर माझे काम दहा मिनिटांत झाले हे तुला सांगायला नकोच. पुढे तर माझ्या बऱ्याच कार्यक्रमांना हे साहेब आलेले मला कळायचे.



माझ्या दृष्टीने कळायला सोपी पण वळायला प्रचंड अवघड अशी ही "हृदयातून विचार' करण्याची पद्धत सहवासातील वेगवेगळ्या प्रसंगातून ऐकून, समजून घेताना ह्या माणसाच्या मनापासूनचा प्रामाणिकपणा, हळवेपणा याचाही मला खूपदा प्रत्यय आला.  माझ्या सारख्या सर्वच दृष्टीने लहान असलेल्यासमोरही, आपली एखादी चूक मान्य करताना नेहमीचाच सहजपणा असे.. हे तर कुठेच काही नसलेल्यांनाही जमेल का माहीत नाही.



आनंद आपणच कितीवेळा क्षुद्रतेने विचार करीत असतो नाही.. बऱ्याच्यावेळी समोरच्याला सहजतेने घेणे हा पाश्चात्यांचा गुण आपल्यात नसतो, व आपल्यावर खजील होण्याची वेळ येते. एकदा माझ्याबरोबर निकोलही मिरजेला आला होता, त्यावर्षी तिथल्या उरुसांत मी हजेरी लावली होती. सतारीचेही काही काम करून घ्यायचे होते. दोन तीन दिवसानंतर आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने परत निघालो. मला वाटते ओगलेवाडीला आमची गाडी थांबली होती. एका विक्रेत्याकडून निकोलने टाईम्स विकत घेतला व पन्नास रु.ची नोट दिली. तो म्हणाला साहेब सुट्टे द्या - माझ्याकडे एवढे सुटटे नाहीत. माझ्याहीकडे सुटे नव्हते, तेव्हा मी म्हटले सुटे नसतील तर पेपर नको. निकोलने अजून कांहीतरी विकत घेतले तरीही त्या माणसाकडे सुट्टे नव्हते. पण त्याला गिऱ्हाईक सोडवेना, म्हणून तो म्हणाला मी सुटटे घेऊन येतो. मी निकोलला म्हटले आपली गाडी सुटेल, तर पेपर नको घ्यायला, पण तो पर्यंत ओके म्हणून त्या विक्रेत्याला निकोलने संमतीही दिली होती. तो विक्रेता आपल्या पेपरचा गठ्ठा तिथेच प्लॅटफॉर्मवर ठेवून सुटे आणायला गेला सुद्धा. मी निकोलला उगीचच शहाणपण शिकवायला सुरुवात केली, की आता पैसे गेले, तो परत येणार नाही. यावर गुरुजी तो येईल, तुम्ही असे का म्हणता, त्याचा रोजचा धंदा आहे, निकोल उत्तरला. तुला ह्या लोकांबद्दल माहीत नाही, मी आपलेच घोडे पुढे रेमटायला सुरुवात केली. तो गाडी हालल्यानंतर त्याचा गठ्ठा घेऊन जाईल.. वगैरे. . निकोलचे फक्त, डोंट वरी गुर्जी, म्हणून प्लॅटफॉर्मवरच्या इतर गडबडीचे कुतूहलाने निरीक्षण चालले होते. घंटा झाली, गाडी हालली.. त्या माणसाचा मागमूसही नव्हता.. माझ्या चेहऱ्यावर आपले म्हणणेच खरे ठरल्याचा विजयी भाव तरळू लागला.. व मी काही बोलणार, एवढ्यांत चालत्या गाडीच्याच गतीने एक माणूस खिडकीचा गज धरून पळू लागला, एका मुठीने त्याने पैसे माझ्या हातात कोंबले व साहेब येळ लागला जरा.. बराबर हाईत समदे.. हे म्हणेपर्यंत गाडीने वेग घेतला. निकोल फक्त म्हणाला.. मी म्हटले होते ना की गुरुजी तो माणूस नक्की येईल.. मी इतका खजील झालो होतो की त्या प्रवासभर मी निकोलच्या नजरेला नजर मिळवू शकलो नाही.. अजूनही  धावत खिडकीतून माझ्या हातात पैसे कोंबणाऱ्या त्या माणसाचा चेहरा मला आठवतो.



वसंत पोतदार हा वादळी माणूस गुरुजींचा चांगला मित्र. स्वभाव व वागणुकीने दोन टोके. पण एकमेकावर अत्यंत प्रेम. गुरुजींच्या मुळेच माझी त्याच्याशी ओळख झाली पण गाठी पटकन जमून गेल्या. एकदा वसंताने नाशिकला काहीतरी कार्यक्रम आयोजित केला होता. तीनतीनदा फोन करून, दमही देऊन, मी नक्की येणार याची त्याने खात्री करून घेतली. गेल्या दिवसापासून बडदास्त उत्तमच ठेवली होती, एक दिवसाची कार्यशाळा, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम त्यानंतर मित्रांच्या बरोबर साग्रसंगीत मैफिल - तीन दिवस उत्तम गेले होते. पण काही वेळाने वसंताचा नेहमीप्रमाणे अतिरेक झालाच. व नकळत कशावरूनतरी वादावादीला सुरुवात झाली. तुर्यावस्थेत गेल्यावर वसंताचा परत सवयीप्रमाणेच अतिरेक, आता आम्ही पूर्ण गप्प होतो व तो एकटाच बोलत होता. शेवटी झोपायला रात्री तीन वाजले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमची बस असल्याने आम्ही निघालो. वसंताने आधीच सांगितले होते की मी उठणार नाही तुमची बस फारच लवकर आहे. त्यामुळे त्याचा बिछान्यातच निरोप घेऊन गुरुजी निघाले. पण गुरुजी कुठेतरी खिन्न होते. कारण अर्थातच माझ्या लक्षांत आले होते, पण मी तरी काय बोलणार.  जरा वेळाने गुरुजींनीच बोलायला सुरुवात केली की दोन दिवस इतके सुंदर गेले होते पण शेवटी वसंताचा अतिरेक होतोच आणि मग त्याला अजिबात भान राहत नाही. दोन दिवसाच्या आनंदाला चांगलाच छेद मिळाला होता. प्रवासभर गुरुजी तसे अस्वस्थच होते. मग प्रवासभर वसंताचे गुण काय आहेत, त्याचे व्यक्तिमत्त्व कसे दिलदार आहे, याचे बरेच किस्से, त्यांच्या सहवासाच्या बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या - पण या सगळ्याच्या शेवटी समेवर येताना, त्याचा अतिरेकी स्वभावाला जर त्याने लगाम घातला तर तो कसा मस्त माणूस आहे, हे पालुपद येई व पुन्हा ते खिन्न होत.
घरी पोहोचल्यावर विश्रांती घेऊन मी संध्याकाळी पुन्हा नादमंदीरात गेलो. चारपाच शिष्यांच्या गराड्यांत काहीतरी शिकवणे चालू होते. मी जाताच, एकदम थबकले.  आता प्रवासातले  मळभ त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हते. अरे! आनंद बरे झाले आलास, मी तुझीच वाट बघत होतो. मला समजेना, कारण पुण्याला आम्ही दोन वाजता पोहोचलो होतो, रस्त्यात त्यांना सोडून मी घरी गेलो होतो, मध्ये जेमतेम चार तासच गेले असतील आणि हे माझी वाट पाहत आहेत?. . पुढे  त्यांनीच उलगडा केला, तू मला सोडून गेलास आणि घरांत पोहोचलो तेव्हा ही मला म्हणाली की नाशिकहून वसंताचा दोनदा फोन येऊन गेला, आपली बस तासभर उशीरा आली होती, ती पोहोचण्याच्या सुमारास त्याने फोन केला व तासाभराने पुन्हा एकदा., तेव्हा जरा फ्रेश व्हावे व मग त्याला फोन करावा असा विचार केला, तसा मी फारसा उत्साही पण नव्हतो. पण पंधरा मिनिटातच त्याचा फोन आला. अरे, उस्मान माझे चुकले - मी भरकटतं तुला व आनंदला कांहीही बोलत गेलो. मला क्षमा कर! आणि पुन्हा पुढच्या महिन्यांत तू व आनंदने इथे यायलाच पाहिजे आहे. आनंद माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तेव्हा माझे चुकले हे तूच त्याला सांगायला, मला जमणार नाही, तू सांग आणि तोही नक्कीच  समजून घेईल कारण त्याच्यावरही तुझ्यासारख्या चांगल्या गुरुचेच संस्कार आहेत... आणि पुढच्या महिन्यांत तुम्ही दोघांनी नक्की यायलाच पाहिजे.. नाहीतर मी तिथे येऊन तुमच्याशी भांडेन... वगैरे.  मी तुला सांगत नव्हतो का.. की हा अतिशय दिलदार व मोकळ्या मनाचा माणूस आहे म्हणून.. ..
हे बोलत असताना एकीकडे डावी बोटे सतारीवर फिरतच होती. व नंतर डोळे मिटून एकदम आतापर्यंत हळूवारपणे, लाडिकपणे चाललेले स्वरांच्या छेडण्याचे परिर्वतन होऊन एकदम बागेश्रीतील द्रुत गतीने वातावरण भरून टाकले. गेल्या काही दिवसांत मूड असलेल्या बागेश्रीत ते शिरले सुद्धा, मी व इतर उपस्थित पुढचा तासभर त्यात विहार करीत राहिलो.