ऑफ़ीस मधून घरात पाउल ठेवताच तुम्हाला बायकोने विचारले "काय हो, जमलं का ?" तर तुमची काय प्रतिक्रिया असते?
तिने नक्की कशाचं जमलं का विचारले हे कळायला मार्ग नसल्याने सर्व साधारण नवरा (त्यात मी पण आलोच) भांबावून जातो ( प्रामाणिकपणे सांगायचे बरं का !!)
अशा वेळी सावध उत्तर म्हणजे "नाही अजून".
"अहो, असं काय करताय, दुपारी तर फ़ोनवर म्हणालात ना, जमतय बहुधा असं" अशी थोडी लिंक हातात आली की मग पुढचा बुरुज लढायला आपण तयार.
तर हा "जमलं" शब्द वाक्यात घालुन अनेकजण आपल्याला प्रश्न विचारत (खरं म्हणजे सतावत) असतात. या शब्दाच्या पुढे आणि मागे येण्याऱ्या शब्दजुळणी ने केवढ्या वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात..."जमलं बुवा एकदाचं" असं म्हणणारा माणूस त्याच्या मुलीच्या लग्नाचच बोलतोय असेच बऱ्याचदा वाटणे सहाजिक आहे. सध्या मुलांचे वडील असे वाक्य टाकत असतात असेही ऐकण्यात आले आहे.
"जमलं" हा शब्द आयुष्याला चिकटलेला आहे. तुम्हाला सांगतो या शब्दाने जे काही वाक्यप्रयोग येतात त्यांचा आपल्या आयुष्याशी ईतका दाट संबंध असेल असे आधी मलाही वाटले नव्हते. असं पहा, लहानपणी शाळेत एका वर्गातून दुसऱ्या वर्गात असे नियमीत पणे एकदाचे पदवीचे पेढे हातावर ठेवले की नातेवाईक आणि शेजारी "आता नोकरीच जमलं की सुटलात" असे म्हणून मोकळे. पुर्वी हे ईतक्यातच संपत असावे.
आता ईंग्लीश माध्यमाच्या शाळेच्या प्रवेशाचा नुसता अर्ज पहाटे ४ वाजल्यापासून रांग लावून आणला की , सध्याचा पालक, "चला ईथपर्यंत तर जमलं" असे म्हणत एक एक मैलाचा दगड (मुलाखत, अंतीम यादीत नाव, रिक्षावाले काका) पार करत पुन्हा पुन्हा तेच "ईथपर्यंत जमलं" असे वाक्य टाकत असतो. गेल्याच आठवड्यात ११वी चा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यॉच्या पालकांनीही "जमलं बुवा एकदा प्रवेशाचं" असाच काहीसा निश्वास टाकला असेल.
कॉलेजच्या प्रवेशाचे जमणे, नोकरीचे जमणे आणि लग्न जमणे या महत्त्वाच्या "जमणाऱ्या" गोष्टी.
बाकी घरी केलेले आईसक्रीम जमणे असो किंवा रोहिणीमावशीच्या मनोगतवरील पाकक्रियेप्रमाणे बनवलेले गोड लिंबू लोणचे असो , "जमलं का ?" या प्रश्नाला "हो" असे उत्तर आले की झाले. कांद्याच्या पिठल्यापासून ते सवाई गंधर्वच्या मैफ़िली अश्या कितीतरी जमणाऱ्या गोष्टी आहेत.
मुलीला अडलेले सुडोकू बाबांनी सोडवून दिले की "बाबा तुम्हाला जमलं की" या वाक्यात बाबांची हुशारी (?) व्यक्त होते . तर वर्षारंभी रोज सकाळी फ़िरायला जाण्याचा "पण" केलेला नवरा बाटाच्या दुकानात पळण्यासाठीचे बूट घ्यायला शिरला, की लगेच "अहो आपले घर ४ थ्या मजल्यावर तर आहे. लिफ़्ट ऐवजी जिना वापरा असे मी कितीदा सांगीतले, एवढे जमले तरी पुरे !! "
अश्या मंडळींच्या (चारचौघात केलेल्या) टिपण्णीने नवऱ्याचा व्यायाम करण्याचा उत्साह एकदम गार !!!
स्फ़ुट लेखन "जमले का ?" याचे उत्तर वाचकांनीच द्यावे आणि या "जमणाऱ्या" गोष्टींच्या यादीत भर घालावी ही विनंती
विनम्र - शशांक