...वाटसरू जातिवंत !

...वाटसरू जातिवंत !

जगण्याचा एक एक क्षण शिळा झाला
आणला मी ढकलत...इथवर आला...

इथवर आला...आता पुढे करू काय ?
पाहीन मी वाट, कधी फुटतील पाय...

फुटतील पाय तेव्हा दिसतील वाटा
वाटांवरी असेल का फक्त एक काटा ? 
 
फक्त एक काटा
किंवा असतील काटे ?
असतील काटे आणि वेडेविद्रे फाटे ?

वेडेविद्रे फाटे जरी असतील तरी
चुकवत चुकवत जाईनच घरी !

जाईनच घरी पण माझे कुठे घर ?
पाताळाच्या खाली किंवा नभाच्याही वर ?

नभाच्याही वर नशिबात वणवण...?
होणार का तिथेसुद्धा शिळा क्षण क्षण ?

...शिळा क्षण क्षण कुठे ढकलावा मग ?
पाताळाच्या खाली तरी कुठे स्थिर जग ?

कुठे स्थिर जग असे नसतेच मुळी
असे काही असण्याची कल्पनाच खुळी !

कल्पनाच खुळी तरी सुरूच तपास...
चुळबुळे पुन्हा पुन्हा अर्धमेली आस...

अर्धमेली आस मला मरू देत नाही...
... जगू देत नाही...काही करू देत नाही !

करू देत नाही काही... काय करू मग ?
नवे जग सापडेतो रोज तगमग....!!

रोज तगमग...रोज रोज उलघाल...
तगमग...उलघाल...अशी वाटचाल...

अशी वाटचाल... जिला नाही कधी अंत...
थकणार मी न...वाटसरू जातिवंत !

- प्रदीप कुलकर्णी