...वाटसरू जातिवंत !
जगण्याचा एक एक क्षण शिळा झाला
आणला मी ढकलत...इथवर आला...इथवर आला...आता पुढे करू काय ?
पाहीन मी वाट, कधी फुटतील पाय...फुटतील पाय तेव्हा दिसतील वाटा
वाटांवरी असेल का फक्त एक काटा ?
फक्त एक काटा किंवा असतील काटे ?
असतील काटे आणि वेडेविद्रे फाटे ?वेडेविद्रे फाटे जरी असतील तरी
चुकवत चुकवत जाईनच घरी !जाईनच घरी पण माझे कुठे घर ?
पाताळाच्या खाली किंवा नभाच्याही वर ?नभाच्याही वर नशिबात वणवण...?
होणार का तिथेसुद्धा शिळा क्षण क्षण ?...शिळा क्षण क्षण कुठे ढकलावा मग ?
पाताळाच्या खाली तरी कुठे स्थिर जग ?कुठे स्थिर जग असे नसतेच मुळी
असे काही असण्याची कल्पनाच खुळी !कल्पनाच खुळी तरी सुरूच तपास...
चुळबुळे पुन्हा पुन्हा अर्धमेली आस...अर्धमेली आस मला मरू देत नाही...
... जगू देत नाही...काही करू देत नाही !करू देत नाही काही... काय करू मग ?
नवे जग सापडेतो रोज तगमग....!!रोज तगमग...रोज रोज उलघाल...
तगमग...उलघाल...अशी वाटचाल...अशी वाटचाल... जिला नाही कधी अंत...
थकणार मी न...वाटसरू जातिवंत !- प्रदीप कुलकर्णी