एक भरमसाठ दिवस.
अंग मोकळं करीत पुढे पुढे जाणारा.
मला आठवतंय् तितकी आकर्षक एक वेश्या.
स्वदेहाचे भान विसरुन जगण्यातली अडचण दूर करणारी.
विदेही.
अनेक कोमेजलेल्या क्षणांना तिच्या बोलवण्याने उभारी आणणारा माझ्यातला अगतिक माणूस.
तिचे चापल्य सरस, भाषा नटवी अन् मागणे व्यवहारी.
क्षणाचा बंध, क्ष्णाचा आनंद, तिचे व माझेही हरवलेले गोत्र
क्षणापुरतेच एकत्र.
क्षणाच्या बंधनापूर्वी ती बोलते एकाशी.
काही अंतरावर उभ्या असलेल्या एकाशी.
तोही अगतिकच का? मी विचारात.
पण ती सांगते येते,
तो माझा प्रियकर.
जाईल तो, पण येणार आहे पुन्हा,
तू गेल्यावर.
माझे सगळे सोस गळून पडतात.
ती निरागसपणे त्याच्याविषयी बोलू लागते.
इतकी निरागस की मला चटके सहन होते नाहीत.
प्रश्न तिच्या इच्छेचा नाही, कारण तिला इच्छा अशी नाहीच.
मला प्रश्न तिच्या प्रेमाचा.
माझं प्रेम हरवलं म्हणून तिच्या कुशीत प्रेम शोधायला निघालेला मी मलाच विचारतो,
किंचित प्रेम कदाचित मिळेल.
पैसे देऊन मिळेल.
पण ती तुझी नाही रे.
ती जो निघून गेला त्याची.
तू जी निघून गेली तिचा.
कसा हिशेब लावणार आहेस?
केविलवाणं हसत मी तिचा हात हातात घेतो.
आणि म्हणतो,
तूही माझी नाहीस.
शरीर विकत तू प्रेम पूर्णत्वाला नेशील.
आणि तसे घडोच.
तुझे प्रेम जिवंत राहोच.
तुझा मनीचे तुला मिळो.
ती सगळं ऐकून घेते.
अस्वस्थ दिसते.
क्वचित दिसली असावी अशी अस्वस्थ.
पण हे तिचं नाही.
हे तिच्यातल्या अगतिक सवाष्णीचं.
मी तिला सोडून चालू लागतो.
अगतिक पुरुषाला बरोबर घेऊन.
अगतिक सवाष्णीला मागे ठेऊन.
(पूर्वप्रसिद्धी - मिळूने साऱ्याजणी, दिवाळी २००६)