...कुणी सुजवले अंग !

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ...निळसर झाले अंग !

...कुणी सुजवले अंग !

............................................

गालांचा का हा निळसर झाला रंग  !
मज नका विचारू, कुणी सुजवले अंग !!

पाहिले तिला ती मला भासली हूर
ती दिसली की मम मनी उठे काहूर
ती समीप येता...धडधडते हे ऊर
विसरुनी स्वतःला तिच्यात होतो दंग !

स्वप्नात खुणावे रोज मला ती आता 
मी तिला मारण्या ,मिठी धावत जाता
सोबतीस होती तिथे तिची पण माता... 
मातेने केला मम स्वप्नाचा रस भंग !

ही जिथे जिथे, तू तिथे तिथे येतोस...
पाहून हिला अन वेड्या गत हसतोस...
तू बऱ्याचदा मज गल्लीतही दिसतोस..
तू छळण्याचा का आहेस बांधला चंग ?

तू आजूबाजूला तिच्या जर दिसलास...
घेईन जीव जर पुन्हा बघून हसलास !
मी काल विसरलो त्या मातेचा ढोस... 
मज वाचवण्या तो आला ना श्रीरंग !

- केशवसुमार

रचनाकाल ः ५ व ६ सप्टेंबर २००७