कधी कळणार?

अमर्याद हा स्तब्ध एकान्त सारा

तयामाजि एका मनाचा पसारा

कुणी नाही त्या त्रास द्यायास येथे

तरी का मनी एक कल्लोळ दाटे

कुणाशी इथे भांडणे तंडणे वा

कुणाशी करावा मात्सर्य हेवा

तरी का उरे दु:ख ते विश्वभारे

तरी का न तुटती विश्लेष सारे

मनाचे किती हेर येथेच फिरती

मनाला नसे का तयांचीच गणती

कधी हे कधी ते उभारूनि यावे

मनाला कधी ना कसे ते कळावे

मनाचा पसारा मनीं होय सारा

दुजाला परी दोष हा न्याय न्यारा

मनीं आकळावे मना ओळखावे

स्वत:ला स्वत:पासुनी वाचवावे