दुपारचे ऊन चांगलेच चटकत होते. मी सायकल हाणत फिल्म इन्स्टिट्यूटमधून विद्यापीठाच्या वसतिगृहात पोचलो तेव्हा सुरेश संतापाने फणफणत खोलीच्या बाहेर येराझार्या घालत होता. त्याच्या हातात एक तार होती. मला पाहताच त्याच्या कुकरची शिट्टी वाजली. "ही खोली कुणाच्या नावावर आहे? तुझ्या की माझ्या?"
"तुझ्याच की" मी शांतपणे म्हणालो आणि खोलीत शिरलो. आता त्याचा व्हॉल्व्हच उडायला आला. "काय झाले" म्हणून मी विचारल्यावर त्याचा संतापस्फोट झाला आणि तार गादीवर फेकून खाऊ की गिळू या नरभक्षक नजरेने माझ्याकडे पाहत राहिला. "मग या सगळ्या @#$@# लोकांना तू तसे स्पष्ट सांगून टाक एकदा". जहरी नागानेही त्याच्या पायाशी बसून (वेटाळून) फूत्कारण्याचे धडे गिरवायला हरकत नव्हती.
झाले असे होते, की विद्यापीठातला तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम अपूर्ण ठेवून, तीन वर्षे जे अधिकृतरीत्या शिकलो त्याला सोडचिठ्ठी देऊन मी फिल्म-मेकिंगमध्ये लुडबूड करायला फिल्म इन्स्टिट्यूटच्या चकरा मारायला सुरुवात केली. तिथे एका ज्येष्ठ कॅमेरामनने मला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली, आणि मी फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स करणे हा पैशाचा आणि वेळेचा अपव्यय ठरेल असे जाहीर केले. त्यापेक्षा प्रत्यक्ष काम करूनच अनुभव मिळवावा, आणि तो अनुभव मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचेही त्यांनी कबूल केले. त्यासाठी माझ्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या चकरा सुरू होत्या. काहीच नाही, तर तिथल्या लायब्ररीत बसून पुस्तके वाचणे किंवा स्टुडिओत चाललेल्या (बहुतेक विद्यार्थ्यांच्या) फिल्म्सचे शूटिंग बघणे हे होतेच.
आता विद्यापीठातल्या निर्धारित अभ्यासक्रमाची वेळ जरी अधिकृतरीत्या संपली होती, तरी ती वेळ मी निर्धारित केलेली नसल्याने मला अर्थातच हे मान्य नव्हते. शिवाय विद्यापीठात राहणे हे बाहेर कुठेही राहण्यापेक्षा सवयीचे आणि स्वस्त होते. त्यामुळे मी अधिकृतरीत्या जरी राहू शकत नसलो तरी अनधिकृतरीत्या (बांडगूळ - parasite) म्हणून राहण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या तीन वर्षांच्या अधिकृत वास्तव्यात मी अनेक जणांना असा आसरा दिला असल्याने मला आसरा देण्याची कुणाचीतरी जबाबदारी लागत होतीच. तो मान मी सुरेशला दिला होता. उत्तर कानडा जिल्ह्यातून इंग्लिशमध्ये एम ए करायला आलेल्या सुरेशला एवढे करणे भागच होते. किमान सीमाभागातल्या अन्यायाची शिक्षा म्हणून.
आता यात एक अजून भानगड अशी होती, की तीन वर्षे अधिकृतरीत्या तिथे काढल्याने चौकीदारापासून ते रेक्टरपर्यंत सर्वांना मीच खोलीचा अधिकृत असल्याचा समज होई. आणि त्यामुळे सुरेशचे पित्त खवळे. एकदा तर हॉस्टेलला रेक्टरची 'सरप्राइज' व्हिजिट होती, तेव्हा चौकीदाराने सुरेशला रात्री अकरापर्यंत आतच सोडले नव्हते. "उगाच कशाला पॅरासाइट ठेवतो म्हणून मूळ मालकाला (म्हणजे मला!) शिव्या खायला लावतोस?" असा प्रेमळ दम भरून त्याने झोपाळलेल्या सुरेशला दामटून ठेवले होते. इकडे मी खोलीत बसून काही लिहीत असताना रेक्टर आले, आणि "काय सगळे ठीकठाक आहे ना?" अशी ओळखीची चौकशी करून गेले.
अश्या गोष्टींनी सुरेशचे डोके प्रमाणाबाहेर उठत असे. आज माझ्यासाठी तार आली होती, आणि तारवाल्याने ती सुरेशला देण्यास ठाम नकार दिला होता. "खोलीचे मालक कुठे आहेत, त्यांच्यासाठी तार आहे" हे चार वेळेला ऐकल्यावर डेव्हिड लॉजच्या पुस्तकात डोके खुपसून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार्या सुरेशचे डोके आता चांगलेच फिरले.
त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी तार बघितली. नाहीतरी हल्ली हॉस्टेलमधल्या बंगाली लोकांबरोबर हिंडायला लागल्यापासून अतिरेकी भावनांचे प्रदर्शन करण्याची त्याची हौस वाढतच चालली होती. त्याला दुर्लक्षच करून ताळ्यावर आणायला हवा होता. नाहीतर उगाच दिसेल त्या (आणि आपल्याला न झेपणार्या) मुलीच्या प्रेमात पडून (आणि तोंडावर आपटून) तो दाढी वाढवून कॉम्रेड होऊन बसला असता. हॉस्टेलला केरळमधून आणि बंगालमधून आलेल्या कॉम्रेड्सचा सुळसुळाट झाला होता नुसता. त्यात ह्या कानडी कॉम्रेडची भर पडली असती तर उच्छाद आला असता.
तार शिशिरची होती. GETTING MARRIED ON WEDNESDAY. COME AT LEAST NOW. हा शिशिर कोण? तर वेगळ्या वाटेवर चालायला मला प्रोत्साहन देणारा एक जिवलग मित्र. त्याने माझ्याबरोबरच पदवी घेतली होती. आणि दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून तो एक वर्ष कलकत्त्याला काढून आता गेले वर्षभर मद्रासला पी एच डी करत होता. तिथे त्याला ऍन नामक एक अमेरिकन ज्यू भेटली. आता त्यांनी लग्न करायचे ठरवले होते तर.
ते दोघेही जानेवारीत पुण्याला आले होते (शिशिर मूळचा पुण्याचा; त्याच्या आई-वडिलांचे इथे घर होते; त्याचे वडील शास्त्रज्ञ होते; सध्या आई-वडीलही मद्रासलाच होते). ऍनबरोबर मैत्री ही शिशिरबरोबरच्या मैत्रीमुळे हा हिशेब जाऊन आमच्या दोघांची स्वतंत्र मैत्री जमून गेली होती.
म्हणजे माझे दोन जिवलग एकमेकांशी लग्न करणार होते.
मद्रासला येऊन तुमच्याबरोबर काही दिवस राहीन अशी वचने मी जानेवारीनंतर आठवड्याला एक अशी दिली होती. पण फिल्म-मेकिंगचा कुठलातरी प्रॉजेक्ट अंतिम टप्प्यात आलेला असे (तो प्रत्यक्षात कधीच उतरत नसे ते सोडा) आणि माझे जाणे सारखे पुढे पुढे जाई. म्हणून दोघांनी आता at least असे सणकावले होते.
आज सोमवार. उन्हाळी सुट्ट्या चालू झालेल्या होत्या. रेल्वेचे रिझर्वेशन द्यायला माझा काकोबा बसला नव्हता. त्यामुळे बसने मजल दरमजल करीत मद्रास गाठणे एवढाच उपाय होता. बंगलोरपर्यंत जाऊन बस बदलायला लागेल असा अंदाज मी बांधला (माझा भूगोल तसा बरा होता).
परत चांदण्यात पळापळ. अखेर बसचे एक तिकिट मिळाले. गुरुवर्य सोडायला नटराज हॉटेलजवळच्या बस-स्टँडवर आले आणि त्यांनी मद्रासमधला एक पत्ता दिला. "जमल्यास भेट याला".
ही सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस वोल्व्हो, एअरबस आदि प्रकार नव्हते. व्हिडिओ कोच नावाचे खटारेच असत. त्यातल्या एका सीटवर डोके टेकून बसलो आणि दणदणाटी व्हिडिओच्या आवाजात झोपायचा प्रयत्न करू लागलो. यश अर्थातच आले नाही. बस बंगलोरला कधी पोचेल याची ड्रायव्हर, क्लीनर आणि सहप्रवासी यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांचा ल सा वि काढला तर "मद्रासची बस मिळेल" असे उत्तर आले. त्या आशेवर बसून राहिलो.
सकाळपासूनच तापायला सुरुवात झाली. धारवाडनंतरचा प्रदेशही तसा वैराणच. गावोगावचे मचूळ पाणी पिऊन घसा कोरडा करत बसलो. सिगरेट ओढली तर घशातून काटेरी फांदी गेल्यासारखे वाटले. वाचायला पुस्तक होते, पण बसच्या भणाणणार्या आवाजाने डोके सुन्न होत चालले होते. शिवाय रात्रीची फारशी न झालेली झोपही गुंगी आणत होती.
तुमकूरला पोचलो आणि गाडी बंद पडली. 'काय झाले आहे' असे विचारता क्लीनरने थेट 'तीन तास लागतील' असे मुद्द्याचे उत्तर देऊन टाकले. मद्रासची बस मिळेल का याचे चिंतन करत बसलो. सुदैवाने बस दोन तासातच दुरुस्त झाली. बंगलोरला पोचलो तेव्हा रात्र झालेली होती.
आधी मद्रासच्या बसची चौकशी केली. समोरूनच ती सुटते असे कळले. पटकन तिकिट मिळवून त्यात बॅग टाकली. तोसुद्धा व्हिडिओ कोचच होता.
परत प्रवास सुरू झाला. गुंगी येऊ लागली. त्यात काही चित्रे, काही अनुभूती एकत्र फेर धरू लागले. सगळे व्हिडिओ कोच खटारे असतात ... 'आरामदायी' खुर्च्या तशा नसतात ... खिडक्यांच्या काचा सगळ्या बंद होत नाहीत, त्यातून रात्रीही धूळ आत येते ... ड्रायव्हर मधूनच खिशातून चपटी काढून त्यातील जळजळीत द्रव्य घशाखाली उतरवतो ... व्हिडिओवर लागलेला सिनेमा कुणीतरी कुत्र्या-मांजरांच्या आवाजात डब केलेला दिसतो....
बसने एक मोठे वळण घेऊन बैठक मारली. मी गुंगीतून खाडकन जागा झालो. कुठलेतरी छोटे गाव आले होते. कुठले गाव ते बघण्याचा प्रयत्न केला. पाट्या होत्या, पण एक अक्षर कळले नाही. अर्थात कळले असते तरी काय झाले असते?
या आधीचे सगळे बस प्रवास रत्नागिरी-पुणे, पुणे-चाळीसगांव, दिल्ली-जयपूर असे झाले होते. तेव्हा ठीक होते. संगमेश्वर आहे, चिपळूण आहे, कोयनानगर आहे, पाटण आहे, उंब्रज आहे, सातारा आहे, की शिरवळ आहे यावरून आपण अजून किती वेळात पोहोचू याचा अंदाज येत असे. इथे गावांची नावे कळून काय करणार होतो? मुकाट डोळे मिटून मद्रासच्या रिक्षावाल्यांना कसे निस्तरावे याचे चिंतन करत बसलो. तिथले रिक्षावाले नाठाळ असतात आणि तमिळशिवाय एक शब्दही बोलत नाहीत हे शिशिरने आधीच सांगितले होते. मला तमिळमधले तसे दोन-तीन शब्द येत होते, पण ते शब्द वापरले असते तर त्या रिक्षावाल्याने मला इस्पितळात (आणि रिक्षावाला अधिक तगडा असता तर शवागारात) पोचवले असते.
पूर्व किनारपट्टी असल्याने पहाटे पाचलाच फटफटायला लागले. मी कावळ्यासारखा माना वेळावून (मला खिडकीजवळची जागा मिळालेली नव्हती) खिडकीतून बाहेर बघू लागलो. एका मोठ्या शहराच्या उपनगरासारखा भाग दिसला. आता मोठे शहर म्हणजे मद्रासच असणार, म्हणून परत पाट्या वाचायचा प्रयत्न चालू केला. आणि लॉटरी लागली!
एका औषधांच्या दुकानावर + चिन्हाखाली Adyar अशी जादूची अक्षरे दिसली! शिशिरची इन्स्टिट्यूट तिथून जवळच आहे एवढे माहीत होते. मी ताबडतोब "stop, रोको, थांबा, दाडाव (कुणी बंगाली ड्रायव्हर असलाच तर!) असा बहुभाषिक गलका माजवून दिला. भाषेचा प्रश्नच उरला नाही. ड्रायव्हर मंगोलियन असता तरी झक्कत थांबता!
काळे किट्ट आणि काटकुळे रिक्षा ड्रायव्हर मुंडू गुडघ्याच्याही वर खोचून कोपर्यावर जमू लागले होते. त्यातल्या एका भल्या माणसाने मला 'फिल्म इन्स्टिट्यूट'जवळ दहा रुपयांत न्यायचे कबूल केले. त्या अंतराला नेहमी चार रुपये पडतात हे (नेहमीप्रमाणेच) नंतर कळले.
शिशिरच्या इन्स्टिट्यूटचे वसतिगृह मजेदार होते. चौकीदार अनुपस्थित होता, त्यामुळे माझा मीच आत झालो आणि निरीक्षण सुरू केले. षट्कोनाला षट्कोन जोडून मधमाशीचे पोळे करावे तसा त्याचा आकार होता. षट्कोनाच्या प्रत्येक बाजूवर राहण्याच्या खोल्या आणि स्वच्छतागृह-स्नानगृह संकुले. खोल्यांखोल्यांतून छतचक्रांचे भणाण आवाज. मला मुंबईत असल्यासारखे वाटले.
अचानक एका स्वच्छतागृह-स्नानगृह संकुलातून एक मुलगी बाहेर आली. मी गळपटलो. आपण मुलींच्या वसतिगृहात आलो आहोत, भाषा माहीत नाही, आता ही अम्मा "अय्योय्यो तेवडिंगला पो सीघ्र" असे काहीतरी ओरडणार, मग रजनीकांत, विजयकांत (किंवा आपला अशोक सराफ) यांसारखे दिसणारे भयाण राक्षस येणार आणि आपली हाडे खिळखिळी करणार. रजनीकांत असेल, तर माझीच एक सिगारेट ष्टाईलमध्ये पेटवून, ती तोंडात तिरकी धरून अजून हाणामारी करणार.....आपण तेव्हा खरोखरचे बेशुद्ध पडावे की आताच बेशुद्ध पडल्याचे नाटक करून पाहावे हे मी ठरवेपर्यंत तिने मान वर करून माझ्याकडे पाहिले.
आणि काहीसुद्धा केले नाही. म्हणजे, किंचितसा प्रश्नार्थक चेहरा करून माझ्याकडे पाहण्यापलीकडे.
मी चाचरत शिशिरची खोली विचारली. नाकानेच कोपर्यातली खोली दाखवून ती एका हातात टूथब्रश आणि दुसर्या हातात टूथपेस्ट फलकावत निघून गेली.
हे co-ed hostel होते तर! 'पुरोगामी' पुण्यातून मी आल्याने असली वाभरट कल्पना माझ्या मनात येणे शक्यच नव्हते! मुलींच्या वसतिगृहाकडे जायला वेगळे फाटक असणारे माझे कॉलेज!
जाऊन शिशिरच्या खोलीचे दार ठोकले. झोपाळलेल्या डोळ्यांनी त्याने दार उघडले. आणि मला बघितल्यावर मागे वळून "sweety, look who is here" एवढेच बोलून त्याने मला घट्ट मिठी मारून गुदमरून टाकले. त्याच्या मागोमाग आपले निळे डोळे उघडायचा प्रयत्न करीत ऍन उगवली. तिने "Oh, baba P" असा चीत्कार केला, आणि मिठी मारण्याचा प्रयत्नही न करता मला थेट उचलूनच घेतले.
आता हे baba P प्रकरण. ऍन आणि शिशिर जेव्हा पुण्याला आले होते, तेव्हा आम्ही जगातल्या यच्चयावत लोकांची स्त्री आणि पुरुष अशी सनातन विभागणी करून टाकली होती. 'स्त्री'ला maa आणि पुरुषाला baba असे संबोधन जोडून त्यापुढे त्या व्यक्तीच्या आडनावातील पहिले इंग्लिश अक्षर अशी आमची व्यवस्था होती. त्यामुळे मी baba P, ऍन (स्निट्झर) maa S, शिशिर baba B अशी नामकरणे झाली होती.
आत खोलीत जाऊन मी आधी लग्न कधी आहे याची चौकशी केली. कारण दाटून आलेली झोप अंगावर उतरायच्या आत लग्न लागले असते म्हणजे निवांत जरा झोपलो तरी असतो. लग्न रजिस्टरच आहे, आणि ते शिशिरच्या आई-वडिलांच्या घराजवळ कोडंबक्कम येथे रजिस्ट्रारच्या कार्यालयात व्हायचे आहे हे कळले. आणि लग्नाला जाण्याची वेळ आपल्याच हातात आहे हेही.
शिवाय आमचा पुण्यातला एक मित्र अजय उंब्रजकर हाही संशोधनाच्याच निमित्ताने काही आठवड्यांसाठी शिशिरच्याच इन्स्टिट्यूटमध्ये आला होता. आणि शिशिरचा कलकत्त्याच्या दिवसांतला एक मित्र प्रशांत अधिकारी (ऊर्फ 'सरका/सरकीलाल' - हे त्याला IIT-K मध्ये मिळालेले नाव होते; त्याचा अर्थ माहीत नव्हता आणि नाही) हाही होता. प्रशांत हा मूळचा कन्नड, पण जन्मला आणि वाढला दिल्लीत. त्याला त्यामुळे पटकन तोंडी हिंदीच यायचे. पण आमच्या सगळ्यात त्यालाच सर्वात जास्त (म्हणजे चक्क रिक्षा ड्रायव्हरला पत्ता समजावून सांगण्याइतके आणि नंतर भांडण्याइतके) तमिळ येत होते.
वराकडचे वर्हाड झक्क जमले. ऍनच्या बाजूने अमेरिकेतून कुणी येणार नव्हते. त्यामुळे मी पक्ष बदलून वधुपक्षाची बाजू निभावायचे जाहीर केले.
"तू झोप सावकाश. संध्याकाळी बघू लग्नाचे" असे आश्वासन मिळाल्यावर मी लगेच भूसमांतर झालो. तिपारी उठल्यावर अंगात मुरलेला आळस झटकत लग्नाला जायला तयार झालो. अजयला काम होते, त्यामुळे तो थेट नंतर शिशिरच्या आई-वडिलांच्या घरीच येणार होता. म्हणजे वरातीत वधू-वर धरून चारजण.
वरात रिक्शातून निघाली. दोन रिक्षा करण्याचे पैसे खर्चण्यापेक्षा एकाच रिक्शात मी, ऍन आणि सरकीलाल मागे सीटवर, आणि चिडपिड्या शिशिर ऍनच्या मांडीवर असे आसन्-व्यवस्थापन केले. अजय कामात होता, तो थेट शिशिरच्या आई-वडिलांच्या घरी पोचणार होता.
कोडंबक्कमचे रजिस्ट्रार कार्यालय शिशिरच्या आई-वडिलांच्या घराजवळच एका बैठ्या बंगल्यांच्या वसाहतीत होते. आम्ही ते चालतच गाठले.
तिथल्या माणसांना ऍनसारखा गोरेपणा बहुधा एवढ्या जवळून पहिल्यांदाच बघायला मिळाला होता. त्यामुळे संध्याकाळी कार्यालय सुटायची वेळ झाली तरी बरीच मंडळी थांबून होती.
लग्न पटकन पार पडले. साक्षीदार म्हणून मी आणि सरकीलालने सह्या ठोकल्या. परत वरात चालत निघाली. अजय थेट घरी पोचला.
जेवणाचा बेत मी बल्लवाचार्य (अर्थातच नावापुरता; कामाला सगळ्यांना जुंपले!) होऊन हातात घेतला. पुर्या, फ्लॉवरबटाटा रस्सा, भात, आणि गुलाबजाम असा बेत होता. गुलाबजामकरता चितळ्यांचे तयार मिक्स वापरले. फक्त त्यात गुलाबजाम वळताना मध्ये एक चिमूट साखर घालायची, म्हणजे तळताना उष्णतेने ती वितळून गुलाबजाम आतूनही गोड होतो ही माहिती सांगून (आणि तसे करून दाखवून) शिशिरच्या पाककलानिपुण आईकडूनही वाहवा मिळवली!
जेवण झाल्यावर मग परत वरात निघाली. आता जोडप्यासकट आम्ही पाचजण होतो. मग थोडा प्रवास लोकल रेल्वेने केला. मुंबईतल्या प्रवासाची सवय असलेल्या अजयला आणि मला स्वप्नात असल्यासारखेच वाटले. लोकलच्या डब्यामध्ये रात्री नऊ वाजता आम्ही धरून दहा जण!
मग उरलेले अंतर एकाच रिक्शात (अजय ड्रायव्हरला सोबत करायला बसला) काटून आम्ही परत वसतिगृहात आलो.
मला शिशिरच्या खोलीत सोडून नववधू-वर ऍनच्या खोलीत गेले.
सणसणणार्या पंख्याखाली झोपताना अचानक मला मुंबईत असल्याचा भास झाला.