निरोप

आठवणींच्या बंद खणांचा निरोप घेऊ दे
मोहमयी बेधुंद क्षणांचा निरोप घेऊ दे

मिणमिणणारी दीपकगात्रे विझून जाऊ दे
देहसोहळे, प्रीतसणांचा निरोप घेऊ दे

सूर्य निघाला क्षितिजसखीच्या मिठीत जागाया
दुरावणाऱ्या त्या किरणांचा निरोप घेऊ दे

सुकून गेला प्रेमझरा अन् दुरावला माळी
ध्वस्त शिवारातील तणांचा निरोप घेऊ दे

निसटत जायी सौख्य करांतून होउनी वाळू
रिक्त मुठीला नितळ कणांचा निरोप घेऊ दे

निर्दयतेने तुडवत गेले उरातली स्वप्ने
पैल निघाल्या त्या चरणांचा निरोप घेऊ दे